Wednesday, 30 August 2023

सांजसखी

रंगताना रंग ओले
रंगवेड्या नभावरी 
पाहता श्रांत बैसते
सांजसखी काठावरी

पसरते भवताली 
संध्यामग्न सायधुके 
जळांत वाहून जाते 
घनगर्द नवलाई

उरता काहीबाही 
बुडते खोल डोही
परतीचा मार्ग धरिते 
सांजसखी निर्मोही 

----------------------

नेमका निखळतो चंद्र 
नेमकी साधतो वेळ
सांजेच्या वळत्या पाऊली
ओथंबते चंद्रावळ

---------------------- 

थबकते सांज देखता
खोल-सखोल तळाशी
रंगल्याली कोर चमके
तरळती युगराशी 

ती बिंब बिंब स्पर्शुनी
जाता पाण्यावर ओलावुनी
चंद्र लख्खं लख्खं गहिवरतो
तिच्या ढळत्या समयी

----------------------

रंगांत रंगल्या जळांत
आता एकसंध रंग
निथळे शुभ्र चंद्रकांती
सखीच्या ओलखुणांत

- चारुश्री

Saturday, 1 July 2023

कविता

आज पाऊस अचानक... कविता झाला...
कैक अंतरावरून माझ्यापाशी सांडत राहिला...

पहिले काही अंतरे तसेच वाहून गेले...
सोबत काहीबाही घेऊनही गेले...

काही ओळींचा संतत शिडकावा होत होता...
शिंपडीत राहिल्या त्या सरी 
ओळखी-अनोळखीसे थेंब...

जरा सभोवार अंगणात डोकावून पाहिलं,
क्षणार्धात उघड-मिटणारी 
शुभ्र पर्जन्यफुलं
कुठलेसे शब्द मातीत जिरवीत होती...
दडवण्यासाठी किंवा खोलातून उमलण्यासाठी...

कैक अर्थांचे रव असेच निनादत राहिले
कितीतरी वेळ...

मनसोक्त कोसळून घेतलं पावसाने...
वरलं आकाशही अखेर 
निरभ्र, कोरं-करकरीत झालं... 

तरीही पुन्हा नीट निरखून पाहिलं 
तर पुसटशी नक्षी हलताना दिसली...
मग नजर आणिक बारीक करून पाहिलं...
अरे!! ही तर माझीच कविता!!!
तीच पाऊस होऊन पडली की काय?
असं म्हणेपर्यंत 
आभाळ पुन्हा एकदा गच्च दाटून आलं...

- चारुश्री

Wednesday, 21 June 2023

भिन्न षड्ज



गर्द वृक्षाच्या निबीड शाखेत 
निपचित पहुडलेलं एक पान,
अनाहूत स्त्रवावी त्याच्या पर्णरेखांतून 
उष्ण रंगांची ओली सळसळ...
गच्च व्हावी शीर अन् शीर, 
भेदावे सर्वच फाटे...
सुषिर होऊन प्राण श्वासावा
प्राणपणाने; 
नि फाटून जावं 
पडलेल्या सखोल चिरेतून आरपार...
मग पुन्हा तरारून यावं,
चिरांसहीत - खाचांसहीत 
वळणदार रेघांसहीत
एकसंध प्राणासहीत
तल्लीन व्हावं,
व्यामिश्रतेच्या उष्ण रंगांत...
पानभर पसरावी 
सजीव थरथर, 
सशब्द व्हावीत पर्णकंपने...
ऐकताना भिन्न षड्ज, 
गानसरस्वतीचा!

- चारुश्री

Sunday, 23 April 2023

- - (अपरिचिता.)



प्रिय कृष्णा,
कालचक्रास आरपार भेदून
तू राहिला आहेस अगदी नितळ!
का मीच तशी होऊन पोहोचल्येय इथवर? 
माहीत नाही.

काळाच्या पल्याड -
क्षितिजसमान झालेली तुझी नौका
आणि अद्याप कालतीरावरली मी...
मिटल्या डोळ्यांत 
सारंच विरघळून जात असलं;
तरी पापणी उचलता क्षणी 
अथांगाच्या टोकाशी भरून राहिलेला तू 
दिसतोस मला.
पण राहा तिथे - तसाच... 
तुझ्या जागी अढळ...

मी आहे इथे या किनाऱ्यावर. 
पाण्यात पाय सोडून बसल्येय.
तुझ्या निळाईकडे बघतच रिती करत्येय 
युगानुयुगे प्राणपणाने जपलेली
माझी ओंजळ... 
त्वदियम् वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्प्यते।

नीरव लाटा 
वाहून नेताहेत
माझे कित्येक जड श्वास संथपणे...
ते लुप्त होताना -
क्षितिजावर उमटणाऱ्या आर्त तरंगांनी, 
सरसरत मागे येऊन पावलांना लुचणाऱ्या
नाजूक - हळव्या लहरींनी, 
अंतर्बाह्य शहारत्येय मी! 
पण मग सावरते स्वतःला.

खूप चाल्ल्येय आजवर!
अविरत... अव्याहत...

आता मात्र या इथे 
अशीच बसून राहणारे...
तूही तिथेच राहा. तसाच...
तुझ्या जागी अढळ...

दरम्यान बरेच कालप्रवाह
सरायचे बाकीयेत...
सरत राहतील...
काहीबाही वाहून आणतील -
बरंचसं घेऊन जातील -
नितळ होत राहील
सगळंच!...

या प्रदीर्घ प्रवासात
यथावकाश लिहीन पुन्हा कधीतरी... 
किंवा 
लिहावसं वाटावं 
असं काही उरणारच नाही कदाचित!...

तूर्तास रजा घेते.

तुझी, 
---
---
-- (अपरिचिता.)



- चारुश्री वझे

Sunday, 26 June 2022

स्वरार्घ्य

प्रातःषड्जा नमन करुनी
रिषभ-पहाट फुलताना
मंदमंदसा दरवळ येई
गंधार-पुष्प बहरताना..

जाग येतसे वसुंधरेला
अरुणकिरण शलाकांनी
मध्यम-नक्षी मोहक भासे
तीव्र-शुद्ध कवडशांनी..

मध्यान्हीच्या स्थिर समयी
अचल पंचम गूंजतसे
कातरवेळी अधीर धैवत
मनां हुरहूर लावतसे..

निषाद-रात्री नभीमंडपी
तारका लुकलुकताना
आठव होई दिनभराचा
सुरेल प्रवास तरळताना..

अखेर होई दर्शन 
त्या अथांग संगीत-सरितेचे
ब्रह्ममुहूर्ता समयी ती
भू-वरी ह्या विलसतसे..   

तिचे ओजस्वी रूप पाहतां 
चक्षु दिपती पळभरी 
अनेक जन्म घेऊनि परि
संगीत-साधना राहे अधुरी..

अशावेळी मी तिच्या किनारी
शांत बसुनि राहतसे..
तिचीच ओंजळ घेऊनि 
तिजला स्वरार्घ्य मी अर्पितसे..
 
- चारुश्री वझे

Tuesday, 7 June 2022

आभाळ आणि त्याची चांदणी

 आकाश निळे तो हरी

अन् एक चांदणी राधा

बावरी 

युगानुयुगिची मनबाधा

...

रात्रीच्या गडद निळ्या आभाळात चमचमणाऱ्या चांदण्या.. आणि त्यापासून थोडी दूर - थोडी अलिप्त अशी एक तारका.. तिचं चमचमणं - लखलखणं वेगळंय काहीसं.. ती लकाकते तेव्हा तिची आभा त्या निळ्या आभाळाहूनंही गडद निळी असते.. सावळ्याकडेच झुकणारी जणु!.. आणि तिचा प्रकाश?!.. फारंच स्तिमित करणारा आहे..

असं काय आहे तिच्या त्या प्रकाशात?.. 

म्हटला तर एकाक्षणी फारंच अवखळ वाटतो तो.., तर दुसऱ्या क्षणीच कुठलीशी हुरहुर पाझरून जातो.. समाधानाने ओथंबलेल्या उत्कट सुखाचं शुभ्रत्व असतं त्यात..; आणि तरीही एक सूक्ष्म हळवी सल हळहळते त्या शुभ्रतेतूनंच.. आणि मग विरघळून जाते चहुबाजुच्या गडद-सावळ्या आभेत.. नितळ - निरामय आनंदाचा उभार आहे त्या तरल प्रकाशात.., आणि वेदनेपलीकडची शांतताही स्थिर आहे त्याच तरलतेत..

या साऱ्या संमिश्रतेचं अतीव निर्मळतेने जतन करत ती तारका लुकलुकते आहे.. तिचा तो प्रकाश त्यामुळेच स्तिमित करणारा आहे. 
...
अशावेळी वर आभाळकडे बघताना फार प्रकर्षाने जाणवतं की, त्या विस्तीर्ण आभाळाच्या हृदयस्थ ती एकच चांदणी व्यापून राहिली आहे.. आणि चांदणीच्या त्या इवल्याश्या आभेत मात्र अवघं अवकाश भरून राहिलं आहे.. 

आकाश निळे तो हरी

अन् एक चांदणी राधा

बावरी 

युगानुयुगिची मनबाधा

...

( पु. शि. रेग्यांच्या या काव्यपंक्तींवरलं माझं हे स्वगत...) 

Monday, 7 February 2022

स्वरलता...

भारतरत्न. लता दीदींच्या पवित्र स्मृतीस माझ्या या शब्द-कळ्यांची आदरांजली...   

कधी शौर्यता
ज्वलंत होतंसे स्वरांनी..
कधी शांत-शीतल
झरतंसे अंगाई..
कधी बालगीते-
कधी संतवाणी..
कधी प्रेमगूंजन-
कधी विरहविराणी..
जिने माळियेली
ही हृद्य भावसुमने..,
अशी स्वरलता
आता न होणे..

दरवळावा तिचा षड्ज 
उगवत्या दिशेसी..
मध्यान्ही मिळावी
साथ पंचमाची..
निषादीय चांदण्यांची
स्वप्निल धुंदी..
सप्तकांनी सजावी 
रोज दैनंदिनी..
जिच्या या स्वरशृंखलांची
आसमानी तोरणे..,
अशी स्वरलता
आता न होणे..

तिचा स्वरनिनाद
घुमतसे वंद्यस्थानी..
एकजूट - एकसंध
राष्ट्राभिमानी..
जिची गानप्रतिभा 
ही एकचि अनंते..,
अशी स्वरलता
आता न होणे..

- चारुश्री वझे

Sunday, 26 September 2021

अनुभूती : पुनवप्रित

 

१-०८-२०२१


काल कौशल इनामदार यांच्या ‘कौशलकट्टा’ या युट्युब चॅनेलवर पुलंबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक आठवणींविषयीचा भाग मी बघत होते. पुलंच्या ८०व्या वाढदिवसाप्रित्यर्थ दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पुलंच्या नाटकांचा, साहित्याचा, त्यांच्या गीतांचा असा पुलमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात पुलकीत गीते सादर करण्याची संधी कौशल यांना मिळाली. आणि त्या संधीबरोबरंच सुनीताबाईंची एक सूचनाही त्यांना पोचती झाली. ती अशी की- केवळ पुलकीत गीते सादर न करता ‘बिल्हण’ ही संगीतिका कौशल यांनी सादर करावी; जी त्या अगोदर सुमारे ५० वर्षांपूर्वी आकाशवाणीवर सादर झाली होती. मंगेश पाडगांवकरांनी ही संगीतिका लिहिली असून पुलंनी तिला संगीतबद्ध केलं होतं. त्याबाबतचे अधिक तपशील आणि त्याच्या अवतीभवती गुंफलेले किस्से हे कौशल यांच्या युट्युब चॅनेलवर आपल्याला ऐकायला मिळतीलंच. त्याचा जरूर आस्वाद घ्यावा!

तर सांगायचा मुद्दा असा की, ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ हे मराठीतील अजरामर भावगीत हे मूळतः याच संगीतिकेतलं. आजच्या घडीला हे गाणं कैकांच्या ओठी रुळलेलं आहे. त्यातीलंच एक कडवं-

‘आठवते पुनवेच्या रात्री

लक्षदीप विरघळले गात्री..’

परंतु बिल्हण या संगीतिकेत- या गाण्याच्या मूळ संहितेत मात्र-

‘आठवते पुनवेच्या रात्री

लक्षचंद्र विरघळले गात्री..’

असं पाडगांवकरांनी लिहिलं होतं.

..

कौशल यांनी ही आठवण सांगताच हे कडवं मी पुन्हा-पुन्हा गाऊ लागले. ‘लक्षदीप’ आणि ‘लक्षचंद्र’ हे दोन्ही शब्द घेऊन एकामागून एक मी कडव्याच्या ओळी गुणगुणू लागले. आणि त्या घडीला हे कडवं मला दोन वेगळ्याच भावार्थांनी अनुभूत झालं-

‘आठवते पुनवेच्या रात्री

लक्षदीप विरघळले गात्री

मिठीत तुझिया या विश्वाचे

रहस्य मज उलगडले’

पुनवेच्या त्या चंद्रप्रकाशात उजळून निघालेली आपल्यातील प्रित अशी काही दैदीप्यमान होती की, जगातील लक्षदीप त्यात विरघळून जावेत. या तेजोमय प्रेरणेतून आविष्कृत झालेलं भावगम विश्व नि प्रितीच्या त्या दैदीप्यमान वैश्विकतेची अंतस्थ प्रचिती, त्या पुनवरात्री तुझ्या बाहुपाशात मला झाली.

..

‘आठवते पुनवेच्या रात्री

लक्षचंद्र विरघळले गात्री

मिठीत तुझिया या विश्वाचे

रहस्य मज उलगडले’

पुनवेच्या त्या रात्री प्रितीच्या मर्मबंध आलिंगनात कैक युंगांचे लक्षचंद्र गात्रागात्रांत विरघळले. विश्वाशी जडलेले आदिम रुधिरबंध नि त्यातून निरंतर पाझरणारी रुचिर प्रित- तुझ्या त्या मुग्ध कवेत विश्वमूलाच्या धमन्यांमधलं हे रहस्य माझ्या आत झिरपलं.

..

एकीकडे पुनवप्रितीची दैदीप्यमान वैश्विक अनुभूती; तर दुसरीकडे तिचा विश्वमूलाशी असलेला आदिम बंध. केवळ एका शब्दाच्या फेरबदलानेदेखील अनुभवाच्या अभिव्यक्तीत किती तफावत आढळू शकते! अर्थात्, हा मला प्रतित झालेला भावार्थ आहे.

कविता खरोखरीच स्वैर असते, हे अशावेळी अगदी खासंच पटतं. शब्दांच्या साच्यात जरी ती प्रमाणबद्ध असली तरी तिच्या अनुभूतींमधला तिचा आत्मा हा मुक्त आहे. एक कविता नि तिच्या अनेकानेक प्रचितीछटा. माझ्या रसिकमनावर जी छटा उमटली तिच्यातील रंगसंगतीला उलगडण्याचा हा एक छोटास्सा प्रयत्न!


Sunday, 28 February 2021

कधीतरीच...

 काहीतरी घडतं

आजुबाजुला - कुठेतरी

केव्हातरी - कधीतरी...

...

ऐकणं होतं, बघणं होतं,

अनुभवणं होतं, सोसणंही होतं...

आणि अचानक थरथरू लागतं

मनातलं पान..

बिथरू लागतं जागच्या जागी..

आवेग जसजसा वाढू लागतो त्याचा,

तशी आजुबाजुने वेढलेली सर्व सुस्त आवरणं

गळून पडतात एकेक करून... 

खूप खोलवर दडलेलं काहीतरी 

उफाळून येऊ लागतं..

मनातल्या त्या पानावर मग सरमिसळ होते-

कल्पना - संकल्पना - अनुभव -

संस्कार - मतं - भावना -

आणि अशा कैक प्रवाहांची..

ओळखीचे - अनोळखी,

आकळणारे - न कळणारे -

असे कित्येक ओघ मिसळू लागतात

त्या पानावर...

सरते शेवटी वहीच्या कागदावर

काहीच थेंबांची शिंपडणी होते...

म्हणायला नवं सर्जनंच असतं ते;

पण तरीही सूक्ष्मसा आदिम गंध 

येतोच त्याला...

कुठल्याश्या निर्गुणाची सगुण प्रतिमाच

साकारली गेलीये की काय,

असाही भास होतो मग...

असं  बरंच काहीसं होत असतं,

लिहितेवेळी...

...

काहीबाही घडून येतं

आतल्या आत - कुठेतरी

केव्हातरी आणि..,

कधीतरीच!...


Tuesday, 1 December 2020

एका इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद

 

An answer to a critic of sorts

 

A lady will perhaps meet a man

Because of the way he writes

And soon the lady might be suggesting

Another way of writing.

 

But if the man loves the lady

He will continue to write the way he does

And if the man loves the poem

He will continue to write the way he must

 

And if the man loves the lady and the poem

He knows what love is

Twice as much as any other man

 

I know what love is

This poem is to tell the lady that.

 

-Charles Bukowski

 

 

 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

 

 

तत्सम चिकित्सकांना उत्तर

 

ती कुणी एक भेटेल त्याला

त्याच्या लेखनशैलीवर भाळून.

आणि कदाचित तत्क्षणीच

त्याला वेगळ्याच कुठल्यातरी शैलीशी

अवगतही करून देईल ती..

 

पण जर त्याचं तिच्यावर प्रेम असेल

तर तो आपल्या लेखनाचा

ओघ कायम राखील..

आणि जर त्याचं काव्याकृतीवर प्रेम असेल

तर तो आपल्या लेखनाचा

साचा अबाधित ठेवील..

 

आणि जर त्याचं ती आणि काव्याकृती

या दोहोंवरही प्रेम असेल

तर, त्याला कळलंय प्रेम म्हणजे काय ते..

इतर पुरुषांपेक्षा जरा दुप्पटीने जास्तंच!..

 

मला माहितीये

प्रेम म्हणजे काय असतं..

हेच, की ही कविता त्या कुण्या ‘ती’ला ऐकवणं...


अनुवाद- चारुश्री वझे

 

 

 

Thursday, 16 April 2020

शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..



  सध्या माझं शांता शेळके यांच्या 'पूर्वसंध्या' या काव्यसंग्रहाचं वाचन सुरु आहे. खरंतर त्याला केवळ 'वाचन' असं नाही म्हणता येणार. कारण केवळ वाचनात एक प्रकारचा रुक्षपणाच अधिक असतो. परंतु शांताबाईंसारख्या मनस्वी लेखिका-कवयित्रीच्या साहित्याचं आपण केवळ वाचन करूच शकत नाही. उलट आपल्याही नकळत आपण त्यांच्या साहित्याचा मनस्वीय आस्वाद घेऊ लागतो. ही आस्वादाची प्रक्रिया अगदी सहज घडून येते. याचं मुख्य कारण म्हणजे मुळातच शांताबाईंच्या लेखनात असलेली अंगभूत सहजता!..
   'पूर्वसंध्या'तील कवितांचा आस्वाद घेताना मी त्याबरोबरंच शांताबईंचा 'धूळपाटी' हा आत्मचरित्रपर असलेला ललित-लेखसंग्रहदेखील वाचला. त्यात शांताबाईंनी वर्णिलेल्या एका दृश्यप्रसंगाची आणि पूर्वसंध्यामधील दोन कवितांची माझ्या मनात सांगड घातली गेली. या दोहोंचा परस्परांशी थेट संबंध असेलंच वा तसा तो आहे, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण माझ्या मनात तो संबंध प्रस्थापित झाला. जणु हे माझंच 'संदर्भ-स्वगत' आहे, असं म्हणा!..
.. 
  " मागच्या माडीतली एक विचित्र आठवण मी कधीच विसरणार नाही. या माडीला लागून स्वयंपाक घरावर टाकलेले पत्र्याचे आडवे छप्पर होते. ... एकदा मागल्या माडीत मी झोपले असताना रात्री अचानक मला जाग आली. चूळ भरण्यासाठी मी पत्र्यावर आले आणि बाहेरचा देखावा बघून चकित, स्तिमित झाले की तिथेच बसून राहिले. ती चांदणी रात्र होती. शांत चांदणे फुलले होते. ... त्या शांत नि:स्तब्ध वातावरणात माझे मन असे भारावून गेले की मी तिथेच बसून राहिले. ... त्या रात्री मी काय पाहिले, काय अनुभवले, तिथे तशी मी का बसून राहिले होते याचा मला या क्षणापर्यंत उलगडा झालेला नाही. ... "  
[ 'धूळपाटी' पृ.क्र.- ४७,४८ ]

'धूळपाटी'मधील ' आठवणी आजोळच्या' या लेखात शांताबाईंनी खेडचं, तिथल्या त्यांच्या आजोळचं, त्यांच्या वाड्याचं वर्णन केलं आहे. वाड्याच्या माडीचा उल्लेख त्यांनी जिथे-जिथे केला आहे तिथे- आभाळ, रात्रीचं फुललेलं शांत चांदणं, तिथे त्यांनी व्यतीत केलेला त्यांचा एकांत - यांचा संदर्भ हमखास येतो. वर नमूद केलेलं दृश्य हे कुठेतरी त्यांच्या मनाच्या बोधपूर्व स्तरात ( Subconscious mind) कोरलं गेलेलं असणार. त्यांच्या स्तिमित होण्याचा थेट उलगडा जरी त्यांना झालेला नसला तरी ते दृश्य- ती घटना आठवणीच्या रुपात मनात खोलवर रुजली असणारंच. ही आठवणंच मग एखाद्या अवचित प्रसंगी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होते. त्या घटनादृश्याची अभिव्यक्ती त्या माध्यमातून नकळतपणे रेखाटली जाते. त्यातूनही 'कविता' हे तर स्वगताचंच माध्यम! त्यामुळे आठवणींचा थेट उलगडा जरी झाला नसला तरी त्यांचा कुठला ना कुठला संदर्भ हा या अभिव्यक्तीत हमखास दडलेला असतो-
' उमगत नाही कधीच मला
अर्थ त्या शांत समंजस ता-यांचा
आणि त्यांच्या आत्ममग्न गाण्याचाही
मात्र माझ्याप्रमाणेच असते ऐकत-बघत
विस्तारलेले अफाट आभाळ, दिशा दाही '
[ कविता- ता-यांचे शांत कळप ]
  कवयित्रीचं तिच्या आजोळच्या वाड्यातल्या माडीतून दिसणा-या चांदण्यांना नि त्या चांदण्यांनी भारलेल्या त्या दृश्याला पाहून स्तिमित होणं, स्तब्ध होणं.. कदाचित त्यावेळी तिच्याही नकळत त्या ता-यांचं नीरव-आत्ममग्न गाणंच ती ऐकत असेल.., त्या स्तब्धतेच्या ग्लानीतच ती नकळतपणे आश्चर्यचकीतंही झाली असेल.., वा आत्यंतिक नवलाईचीच ती स्तिमितता-स्तब्धता असेल.. 
...
  
' लखलखत्या असंख्य चांदण्या अवघ्या आभाळभर
आणि असंख्य प्रतिबिंबांची हृदयस्थ प्रवाहात थरथर
अवघे तारांगण अलगद खाली उतरलेले
आणि प्रत्येक चांदणीत माझेच मन मोहरलेले

मी आभाळ, मी चांदणी, मीच अनन्त अवकाश
मी तुफान वादळवारा, मीच हलका निःश्वास

अनन्त युगे ओलांडून झालेली मी आरपार
अनुभवलाच नव्हता कधी असा असीम विस्तार '
[ कविता- लखलखत्या असंख्य चांदण्या ]
  आभाळ, रात्रीचं त्यात फुललेलं शांत चादणं- माडीतून दिसणा-या या निसर्गप्रतिमांशी एकरूप झाल्यावर नि त्यातून होणा-या कुठल्याश्या अनुभूतीनेच कवयित्री त्या समयी स्तिमित झाली असेल.. त्यावेळची तिची स्तब्धता म्हणजे स्वतःच्याच अगोचर अस्तित्वाची तिला झालेली अंतस्थ अनुभूती असेल..
...
   अशा प्रकारे वरील दोन्ही कवितांचं अनुभवविश्व जरी भिन्न असलं तरी कवयित्रीच्या मनातला त्यांचा दृश्यसंदर्भ हा कदाचित एकच असावा. मनात खोलवर रुजलेल्या या दृश्यरुपी आठवणीचा सुप्त प्रभावच शांताबाईंच्या कवितांमधून, त्यातील काव्यप्रतिमांमधून नि त्यांच्या काव्यभाषेतून सशब्द झाला असावा. वा लेखनसमयीच्या त्यांच्या मनःपटलावर तो दृश्यसंदर्भ अवतरलाही असेल. मनाच्या खोल तळ्यातून ते चांदणं अवचित झिरपलंही असेल.. मला मात्र या चांदण्याने फारंच मोहीत केलंय, हे खरं!..
...

Monday, 9 September 2019

अवचित कधीतरी


फार काही अपेक्षा नाहीये माझी
पण एखादा पाऊस होऊन ये ना कधीतरी..
कदाचित तेव्हा तुलाही कळेल,
'आभाळ दाटून येणं' म्हणजे काय असतं ते!!..
तुलाही असह्य होईल तो ताण..,
नि मग मनसोक्त बरसताना
अलगद होणा-या त्या रितेपणाचाही
मनस्वी आनंद घेशील तू..
माझं रडणंही निव्वळ व्यर्थ नसतं, हे,
कदाचित समजेल तुला...

फारसा हट्ट नाहीच्चे मुळी माझा,
तुझ्या पावसातला एख्खादा जरी थेंब
माझ्या गालावर येऊन पडला ना,
तरी चिंब होऊन जाईन मी..
हां, आता नेहमीसारख्याच तेव्हाही ओलावतील माझ्या पापण्या,
कदाचित!!..,
आणि अगदीच न राहवून एख्खादा टिपूसही ओघळेल
माझ्या काजळकड्यावरून..
पण तो जेव्हा तुझ्या थेंबाला येऊन मिळेल ना..,
तुलाही जाणवेल त्यातली स्निग्धता.., कदाचित!!...

तू पाऊस होऊन जेव्हा मातीत मिसळशील ना
तुझ्या ओल्या स्पर्शाने माझ्यासारखीच तीही शहारून जाईल बघ..
नि त्यावेळी तिच्या दरवळीचे ते मुग्ध धुमारे..
तेच कदाचित सांगतील तुला, माझं खरंच कित्ती प्रेम आहे तुझ्यावर!!..
शब्दाविना सांगण्याची नि अर्थावाचून समजून घेण्यातली
जी गंमत असते ना, तीही कळेल बघ तुला...
खरंच येशील का रे असा एखादा पाऊस होऊन अवचित कधीतरी?...

- चारुश्री वझे

Thursday, 30 May 2019

माझा वेळ

सहसा वेळ 'मिळतो' मला
पण आज मला वेळ 'भेटला' !!...
म्हणाला, "hey, काय म्हणतेस, कशीयेस?"..
मला थोडं विचित्रच वाटलं..
मी पाहतच राहिले त्याच्याकडे
माझ्या 'वैचित्र्यपूर्ण' नजरेने..
तसा एकदम माझ्या जवळ आला..
आणि बाजुलाच बसला.. खेटून!!..
मग मीही घुश्शातच विचारलं,
"काय काम आहे?"..
काहीसं मिष्किल हसत तो म्हणाला,
"विशेष काही नाही.. आज मी निवांतंय..
तूही आरामशीरेस.. म्हटलं यावं तुझ्यापाशी..,
बसावं तुझ्याशेजारी.., बोलावं तुझ्याशी..
.. ए, गप्पा मारुयात का आपण?..
थोडं तुझं - थोडं माझं share करु..
what say?"...
मी बधिरल्यासारखी पाहतंच राहिले त्याच्याकडे..
एकटक.. कुठलीच प्रतिक्रिया न देता..
मग तोच बोलता झाला-
''आपण किती एकमेकांसोबत असतो, नाई!!..
मात्र जगतो किती एकमेकांसाठी माहित नाही..
पण असतो मात्र एकमेकांसोबत.. कायम..
कधी माझ्यामागून तू पळत येतेस..
कधी माझ्यासोबतंच धावतेस..
तर कधी accelerator इतका वाढवतेस,
की काहीच्च्या काही पुढे निघून जातेस यार!!..
मग मीच कसाबसा गाठतो तुला..
करकच्च धरून सावरतो तुझा आवेग..
बदल्यात 'thank you' म्हणण्याचीही तसदी घेत नाहीस तू..
अर्थात्, दोस्तीत 'no sorry - no thanks', असंच असतं म्हणा !..
.. पण..
आपण आहोत का गं एकमेकांचे मित्र?"..
- असं म्हणून तो थांबला..
आणि मी पुन्हा तशीच पाहत राहिले त्याच्याकडे.. एकटक..
..
आज मला पहिल्यांदाच जाणवलं,
'माझा वेळ' हा खरंच कित्ती माझाय!!..
एरव्ही, वेळ मिळाल्यावर आनंद होतो..
आज, वेळ भेटल्यावर आश्वस्त वाटलं..
बहुधा, आमच्यात मैत्री होऊ लागलीये!!...
...

- श्री उवाच

Sunday, 3 March 2019

..
कारण,
खूप बोलायचं होतं..
बोलण्यासारखंही खूप काही होतं..
शब्द तर अक्षरशः धुमाकूळ घालत होते..
पण आश्चर्य म्हणजे तू समोर आलास
तरी, एकही शब्द बाहेर पडला नाही तोंडून..
दातात अडकले की लाळेवाटे गिळले गेले,
देवंच जाणे..
.. हां, किंवा संपावर गेले असावेत बहुधा..
आपल्यातला संवादच मान्य नसावा त्यांना..
तू गेलास निघून.
बरंच काही बोलून.. बरचसं न बोलताच..
मीही परतले माघारी.
मग मात्र इतके भसाभसा बाहेर पडले ना शब्द..
..
पुन्हा एक कविता उमटली कागदावर..
विनाकारण
..

- श्री उवाच


Tuesday, 13 November 2018

कविता

कधीकाळी आपण
एक कविता रचलेली..,
आठवतंय तुला?..
काही शब्द तू गुंफलेलेस..,
काहींना मीच गुंतवलेलं..
'छान चालीत म्हणायची हं!!'..
दोघांनीही पक्क ठरवलेलं.
वचनच दिलेलं जणु एकमेकांना..
आणि अचानक तू हरवलास;
नि मीही अबोल झाले..
..
पण तुला माहित्येय,
ही कविता कित्ती खोडकर आहे ते!..
'तुम्ही नाही म्हणणार ना?..,
जा, गेलात उडत..
मीच गुणगुणेन स्वतःला'..,
हे असं म्हणत थुईथुई नाचत येते
डोळ्यांतून ओठांपर्यंत..
..ज्या आड सारेच शब्द पार दडून गेले;
नि अर्थ मौनातच गारद झाले..
मग थबकन् खाली पडते
तळहाताच्या रेषांवर..,
जिथे तू हरवलास आणि
माझं बोलणंही थांबलं..
..
पण कविता मात्र अजूनही गुणगुणत राहते..
खट्याळ कुठली!..

- चारुश्री वझे
( श्री उवाच )

Monday, 10 September 2018

मैत्र


   (उजवीकडून) आजोबा आणि डिंगोरकर आजोबा (ज्येष्ठ पखवाजवादक). दोघेही वयवर्षे ८४. नि त्यांच्यातलं ६० वर्षांचं अतिशय भावपूर्ण मैत्र. ख-या अर्थाने एकमेकांचे सुहृद.. रेल्वेत आर्टिस्ट कन्सेशन व तत्सम कामांनिमित्त एकमेकांशी झालेल्या ओळखीचं दोघांच्याही सांगितिक व्यासंगाने पुढे मैत्रीत रूपांतर झालं. मुरांबा जसा दिवसागणिक अधिकाधिक मुरत जातो, तशी आजमितीस त्यांच्यातली ही ६० वर्षांची मैत्री विश्वास, आदर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयीची आपुलकी, या संमिश्र पाकात घोळलेली आहे. आणि वयोपरत्वे तिच्यातल्या माधुर्याला हळवेपणाचीही किनार लाभली आहे..
   मी लहानपणापासून डिंगोरकर आजोबांना पाहत आलेय. आमच्या संस्थेतंही (आयोजन संगीत सभा) एकदा त्यांनी पखवाजवादन सादर केलेलं. फारच लहान होते मी तेव्हा. पहिल्याच रांगेत बसलेले. विशेष काही कळलं नव्हतं; पण जाम भारी वाटलेलं.. आयोजनच्या, काही अपवाद वगळता, प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. हळुहळु वयोपरत्वे त्यांचं येणं कमी होत गेलं. (आताशा आयोजनचेही कार्यक्रम होत नाहीत.) परंतु, ते डोंबिवलीत राहात असल्याने तिथल्या शक्य तेवढ्या कार्यक्रमांमध्ये ते अजूनही आपली हजेरी लावतात..
   या ७ सप्टेंबरला (शुक्रवारी) कै.पं.सदाशिव पवार (बाबांचे तबलावादनातील गुरू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सदाशिव अॅकेडमीतर्फे बाबांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. अर्थातच डिंगोरकर आजोबाही तिथे आलेले. बाबांचा सत्कार त्यांच्याच हस्ते झाला. कितीतरी वर्षांनी त्यांची-बाबांची भेट झाली. दरम्यानच्या काळात आज्जीच्या निधनाचं त्यांना कळल्यावर आजोबांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांना झालेली. परंतु आमच्या नवीन घराचा पत्ता त्यांच्याकडे नव्हता.. कार्यक्रमात ब-याच वर्षांनी बाबांशी भेट झाल्यावर प्रथम त्यांनी आमचा पत्ता बाबांकडून एका कागदावर लिहून घेतला. आणि काल ते आजोबांना भेटायलाही आले..
   .. आल्या-आल्या आधी आजोबांची चौकशी. मग आजोबा खोलीबाहेर येताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. मग निवांत बसले. एकमेकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.. मी आणि आईही तिथेच होतो. आमचीही छान विचारपूस केली त्यांनी. मला खाऊही दिला.. मग बोलता-बोलता म्हणाले- "मध्यंतरी पाटलांकडून (पाटील आजोबा) वहिनींच्या निधनाचं कळलं.. त्या माऊलीच्या हातचं अन्न जेवलोय मी. हे ऐकून धक्काच बसला.. कधी दादांना भेटतोयसं झालं. पण तुमचा नवा पत्ता नव्हता माझ्याजवळ. मग परवा कार्यक्रमात आधी पत्ता लिहून घेतला एका कागदावर शेखरकडून. त्या दिवशी रात्री झोप नाही मला. दादांना भेटण्याची इतकी इच्छा झाली म्हणून सांगतो.. आमचं नातंच वेगळंय.. ते इतकं प्रेमाचं आहे ना, की.."- तोवर त्यांना इतकं भरून आलं की, त्यांचे सद्गतीत अश्रूच पुढलं बरंच काही सांगून गेले.. मघाशी म्हटल्याप्रमाणे दोघांच्याही मैत्रीला आता एक हळवीशी किनार लाभली आहे..
   .. सोशल मिडियावरल्या आभासी गप्पा नि एकूणच, नात्यांच्याही आभासी जगात या दोन सुहृदांच्या भावोत्कट मैत्रीची मी काल साक्षीदार झाले. नि माझीही मैत्रीची व्याख्या ब-यांच अंशी समृद्ध झाली.. कदाचित काल माणूस म्हणूनही मी मला नव्याने उमजले असावे..
  
  

Thursday, 26 July 2018

अवचित कधीतरी...


अवचित कधीतरी 
चहा छान जमून येतो..
नेमकं तेव्हाच रेडिओवर 
आवडीचं गाणं लागलेलं असतं..
खिडकीबाहेर आणि मनाआतही
संतत धारा बरसू लागतात..,
नि हवेची मंदशी झुळुकही
आणिक सुखावह वाटते त्यावेळी..
..
अवचित कधीतरी 
एकांतही असा हवाहवासा वाटतो..
...
 (1)

अवचित कधीतरी
तो थेंब होऊन ओघळतो
तिच्या खिडकीच्या गजांवरून..
अवचित कधीतरी
ती ही गंध होऊन दरवळते
त्याच्या अंगणातल्या ओल्या मातीतून..
..
अवचित कधीतरी
पावसालाही प्रेमात पडावसं वाटतं..
...

(2)
अवचित कधीतरी 
पाऊस असा काही बरसतो की,
सारं मळभ दूर होऊन जातं..
..
निरभ्र आकाश - नितळ झरा
शहारलेली हिरवळ - धुंद वारा..
..
अवचित कधीतरी 
नभीचं इंद्रधनु 
हळुच मनःपटलावरही उमटतं..
...

(3)
अवचित कधीतरी
ती पावसात भिजते..
चिंब..
..
अवचित कधीतरी
पापण्याही ओलावतात मग..
...

(4)
अवचित कधीतरी
आठवण येते..,
बराच वेळ रेंगाळते..
नकळत विरूनही जाते..
..
अवचित कधीतरी 
क्षणही काहीक्षण विसावतो..
...

(5)
अवचित कधीतरी 
तो भेटतो,
बोलतो,
हसतो, छानसा खळखळून..
..
अवचित कधीतरी
खर्चाच्या वहीत 'जमा' अशी नोंद झालेली असते..
...

(6)
अवचित कधीतरी
ती भेटते, 
बोलते,
हसते, छानशी खळखळून..
..
अवचित कधीतरी
उन्हालाही सावलीचा स्पर्श सुखावतो..
...

(7)
अवचित कधीतरी
शब्द मिळतात,
अर्थ सापडतात..,
कविताही सुचून जाते..
..
अवचित कधीतरी
मी ही व्यक्त होते,,
...

(8)
अवचित कधीतरी
आपसूक मागे सुटलेले बंध
अचानक समोर येतात..
आपसूकच मग पुन्हा जुळू लागतात..
..
अवचित कधीतरी 
आयुष्यंही नव्याने उलगडतं..
...
(9)
अवचित कधीतरी
मौनाची भाषा कळू लागते..
एकांत हळुहळु बोलू लागतो मग..
शांततेचंही सूक्ष्म संगीत ऐकू येऊ लागतं..
...
अवचित कधीतरी
मी माझ्यापाशी येते..
मी आणि माझी भेट हाते..
...
(10)

- 'श्री' उवाच

Tuesday, 3 July 2018

पाऊस असा रिमझिमतो...

कधी-कधी काहीतरी चुकतंयसं वाटतं.. निसटून चाल्लयसंही वाटतं.. पण ते मुद्दाम धरून ठेवावं असंही वाटत नाही.. कधी-कधी वाटतंही ते निसटू नये हातून म्हणून😁.. पण ब-याचदा 'Let it go'वालं फिलिंगच जास्त असतं..
.. पाऊस पडत असतानाही कधी-कधी काहीच घडत नाही. ना भरून येत, ना दाटून येत, ना गहिवरून ना उचंबळून येत.. कधी-कधी ही वरवरचीच शांतता असते. आतला कल्लोळ दडून बसलेला असतो कुठेतरी; किंवा जाणिवपूर्वक दडपून टाकलेलाही असतो.. तर कधी-कधी खरोखरंच शांत-स्तब्ध नजरेने आपण पाऊस पाहतो.. किल्मिषांचं जाळं नाही, नात्यातल्या उणी-दुणी नाहीत, उणिवांचा कुठलाच हिशेब नाही, आणि या अशा आठवांची कुठलीच सर नाही.. फक्त पाऊस पाहणं.. अशावेळी अगदीच नकळत हलकसं स्मितंही उमटतं गालांवर.. ते Candid clickने टिपून घ्यावसंही वाटत नाही तेव्हा आपल्याला.. कारण कुणीच नको असतं सोबत.. केवळ पाऊस आणि आपण.. त्याची ती रिमझिम बरसात आणि ती निमिषार्धात मनात साठवणा-या आपल्या पापण्यांची उघडझाप..
.. पाऊस अनुभवणं म्हणजे हेच असतं का?..  

Saturday, 19 May 2018

पत्र

... बघ, पुन्हा अडकले मी या संज्ञा-संकल्पनांच्या फे-यात..
पण का कुणास ठाऊक, तुझा विचार मनात आला ना, की मी आपसूकच काहीशी बौद्धिक होऊन जाते. Generally, अशा वेळेस आजुबाजुचं वातावरण उन्हाळी असूनही, बहुतांशी मनांमध्ये गुलाबी थंडी साजरी होत असते.., पण मला मात्र तुझी 'राजकीय-सामाजिक-आर्थिक..' आणि अशा ब-याच 'इक'-'इय' प्रत्ययान्ति असलेल्या शब्दांबाबतची विश्लेषणे त्यातल्या प्रत्येक मुद्दयासहित तोंडपाठ झालेली असतात.. शाळेत, परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे 21 अपेक्षितातून घोकूनही अनेकदा लक्षात राहायची नाहीत माझ्या!!.. इथे मात्र तू मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मीही विचार करायला लागते.., आपसूकच.. शाळेत कवितेचं रसग्रहणंही मी नवनीतमधून पाठ करायचे.. पाठ करायचे?!.. हसूच येतं आता त्याचं; आणि प्रश्नही पडतो.., इतका बदल कसा झाला माझ्यात?..
... अगदी सुरुवाती-सुरुवातीला आपण कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचो.. अख्खी संध्याकाळ तिथे घालवायचो.. तेव्हा तू , तुझे ते 'इक-इय'वाले जड शब्द, आणि त्याहूनही जड असलेले त्याबाबतचे तुझे विचार.., सगळंच नवीन होतं माझ्यासाठी!!.. तेव्हा आपण दोघंही प्रत्येकी एकच गोष्ट करायचो.. तू केवळ बोलायचास.. भरभरून.., आणि माझी फक्त श्रवणभक्ती सुरु असायची.. ब-याचदा तर सगळंच बाऊन्स जायचं माझ्या.., तरीही ऐकायचे.. ऐकतंच राहावसं वाटायचं.. मग कधी एखादा काहीबाही प्रश्न मी विचारला की त्यावर तू इतका फिदीफिदी हसायचास आणि मुद्दाम मला चिडवत म्हणायचास- 'केवढे 'मोठ्ठे' बालिश प्रश्न पडतात गं तुला?..', यात 'मोठ्ठे'वर जरा जास्तच जोर द्यायचास तू.. पण मग त्यानंतर, 'अशीच निरागस राहा.. कायम..', हे पुढलं वाक्य मात्र अगदीच मनापासून असायचं तुझं.. त्यामुळे, तुझ्यासाठी म्हणून स्वतःला बदलावं, असा विचारच कधी डोकावला नाही मनात!..
... ज्या पोटतिडकीने तू एखादा गंभीर मुद्दा मांडायचास, तितक्याच सहजतेनं तुझं ते मनमुराद हसणं- मनमोकळं बोलणं.. कदाचित तुझ्या या अंतर्बाह्य खरेपणामुळेच मी प्रेमात पडले असेन तुझ्या!!.. तेव्हा पडून गेले..; नकळतंच.. पण आता विचार करते तेव्हा; म्हणजे आत्ताश्या मीही विचार करायला लागलेय थोडा-थोडा.., तर सांगायचं म्हणजे, तुझं हे खरेपण आणखी आवडू लागतं मला.. आणि दरवेळी नव्याने, अंमळ जास्तीच प्रेमात पडते तुझ्या!!...  

- तुझीच
अहो सरकार
(आज या सरकारास 25 वर्षे झालीयेत बरं!!.. आहे ना लक्षात?!..)  

Thursday, 12 April 2018

अनुवाद

एका इंग्रजी काव्याचा स्वैर अनुवाद

कविता आणि संहिता
...
खरंतर दोघीही माझ्या अत्यंत जवळच्या...
पण कधीतरी अवचितच घेरतात मला.
अशावेळी मग, दोघींपैकी कुणी एक..,
ठरवूच शकत नाही मी.
...
संहिता म्हणते,
'चल, एकत्र रचुयात आपण,
भव्य-दिव्य-अजरामर, असं काहीसं'...
तर कविता..,
अलगद हात हातात घेते माझा..,
नि हळूच कुजबुजते-
'चल माझ्यासोबत; हरवुयात दोघीही..,
मग शोधू एकमेकींना'...
...

                                     - लॅंग लीव्ह 
                                      ( अनुवाद- चारुश्री वझे )

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...