Monday, 10 September 2018

मैत्र


   (उजवीकडून) आजोबा आणि डिंगोरकर आजोबा (ज्येष्ठ पखवाजवादक). दोघेही वयवर्षे ८४. नि त्यांच्यातलं ६० वर्षांचं अतिशय भावपूर्ण मैत्र. ख-या अर्थाने एकमेकांचे सुहृद.. रेल्वेत आर्टिस्ट कन्सेशन व तत्सम कामांनिमित्त एकमेकांशी झालेल्या ओळखीचं दोघांच्याही सांगितिक व्यासंगाने पुढे मैत्रीत रूपांतर झालं. मुरांबा जसा दिवसागणिक अधिकाधिक मुरत जातो, तशी आजमितीस त्यांच्यातली ही ६० वर्षांची मैत्री विश्वास, आदर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयीची आपुलकी, या संमिश्र पाकात घोळलेली आहे. आणि वयोपरत्वे तिच्यातल्या माधुर्याला हळवेपणाचीही किनार लाभली आहे..
   मी लहानपणापासून डिंगोरकर आजोबांना पाहत आलेय. आमच्या संस्थेतंही (आयोजन संगीत सभा) एकदा त्यांनी पखवाजवादन सादर केलेलं. फारच लहान होते मी तेव्हा. पहिल्याच रांगेत बसलेले. विशेष काही कळलं नव्हतं; पण जाम भारी वाटलेलं.. आयोजनच्या, काही अपवाद वगळता, प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. हळुहळु वयोपरत्वे त्यांचं येणं कमी होत गेलं. (आताशा आयोजनचेही कार्यक्रम होत नाहीत.) परंतु, ते डोंबिवलीत राहात असल्याने तिथल्या शक्य तेवढ्या कार्यक्रमांमध्ये ते अजूनही आपली हजेरी लावतात..
   या ७ सप्टेंबरला (शुक्रवारी) कै.पं.सदाशिव पवार (बाबांचे तबलावादनातील गुरू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सदाशिव अॅकेडमीतर्फे बाबांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. अर्थातच डिंगोरकर आजोबाही तिथे आलेले. बाबांचा सत्कार त्यांच्याच हस्ते झाला. कितीतरी वर्षांनी त्यांची-बाबांची भेट झाली. दरम्यानच्या काळात आज्जीच्या निधनाचं त्यांना कळल्यावर आजोबांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांना झालेली. परंतु आमच्या नवीन घराचा पत्ता त्यांच्याकडे नव्हता.. कार्यक्रमात ब-याच वर्षांनी बाबांशी भेट झाल्यावर प्रथम त्यांनी आमचा पत्ता बाबांकडून एका कागदावर लिहून घेतला. आणि काल ते आजोबांना भेटायलाही आले..
   .. आल्या-आल्या आधी आजोबांची चौकशी. मग आजोबा खोलीबाहेर येताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. मग निवांत बसले. एकमेकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.. मी आणि आईही तिथेच होतो. आमचीही छान विचारपूस केली त्यांनी. मला खाऊही दिला.. मग बोलता-बोलता म्हणाले- "मध्यंतरी पाटलांकडून (पाटील आजोबा) वहिनींच्या निधनाचं कळलं.. त्या माऊलीच्या हातचं अन्न जेवलोय मी. हे ऐकून धक्काच बसला.. कधी दादांना भेटतोयसं झालं. पण तुमचा नवा पत्ता नव्हता माझ्याजवळ. मग परवा कार्यक्रमात आधी पत्ता लिहून घेतला एका कागदावर शेखरकडून. त्या दिवशी रात्री झोप नाही मला. दादांना भेटण्याची इतकी इच्छा झाली म्हणून सांगतो.. आमचं नातंच वेगळंय.. ते इतकं प्रेमाचं आहे ना, की.."- तोवर त्यांना इतकं भरून आलं की, त्यांचे सद्गतीत अश्रूच पुढलं बरंच काही सांगून गेले.. मघाशी म्हटल्याप्रमाणे दोघांच्याही मैत्रीला आता एक हळवीशी किनार लाभली आहे..
   .. सोशल मिडियावरल्या आभासी गप्पा नि एकूणच, नात्यांच्याही आभासी जगात या दोन सुहृदांच्या भावोत्कट मैत्रीची मी काल साक्षीदार झाले. नि माझीही मैत्रीची व्याख्या ब-यांच अंशी समृद्ध झाली.. कदाचित काल माणूस म्हणूनही मी मला नव्याने उमजले असावे..
  
  

2 comments:

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...