Tuesday, 13 November 2018

कविता

कधीकाळी आपण
एक कविता रचलेली..,
आठवतंय तुला?..
काही शब्द तू गुंफलेलेस..,
काहींना मीच गुंतवलेलं..
'छान चालीत म्हणायची हं!!'..
दोघांनीही पक्क ठरवलेलं.
वचनच दिलेलं जणु एकमेकांना..
आणि अचानक तू हरवलास;
नि मीही अबोल झाले..
..
पण तुला माहित्येय,
ही कविता कित्ती खोडकर आहे ते!..
'तुम्ही नाही म्हणणार ना?..,
जा, गेलात उडत..
मीच गुणगुणेन स्वतःला'..,
हे असं म्हणत थुईथुई नाचत येते
डोळ्यांतून ओठांपर्यंत..
..ज्या आड सारेच शब्द पार दडून गेले;
नि अर्थ मौनातच गारद झाले..
मग थबकन् खाली पडते
तळहाताच्या रेषांवर..,
जिथे तू हरवलास आणि
माझं बोलणंही थांबलं..
..
पण कविता मात्र अजूनही गुणगुणत राहते..
खट्याळ कुठली!..

- चारुश्री वझे
( श्री उवाच )

Monday, 10 September 2018

मैत्र


   (उजवीकडून) आजोबा आणि डिंगोरकर आजोबा (ज्येष्ठ पखवाजवादक). दोघेही वयवर्षे ८४. नि त्यांच्यातलं ६० वर्षांचं अतिशय भावपूर्ण मैत्र. ख-या अर्थाने एकमेकांचे सुहृद.. रेल्वेत आर्टिस्ट कन्सेशन व तत्सम कामांनिमित्त एकमेकांशी झालेल्या ओळखीचं दोघांच्याही सांगितिक व्यासंगाने पुढे मैत्रीत रूपांतर झालं. मुरांबा जसा दिवसागणिक अधिकाधिक मुरत जातो, तशी आजमितीस त्यांच्यातली ही ६० वर्षांची मैत्री विश्वास, आदर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयीची आपुलकी, या संमिश्र पाकात घोळलेली आहे. आणि वयोपरत्वे तिच्यातल्या माधुर्याला हळवेपणाचीही किनार लाभली आहे..
   मी लहानपणापासून डिंगोरकर आजोबांना पाहत आलेय. आमच्या संस्थेतंही (आयोजन संगीत सभा) एकदा त्यांनी पखवाजवादन सादर केलेलं. फारच लहान होते मी तेव्हा. पहिल्याच रांगेत बसलेले. विशेष काही कळलं नव्हतं; पण जाम भारी वाटलेलं.. आयोजनच्या, काही अपवाद वगळता, प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. हळुहळु वयोपरत्वे त्यांचं येणं कमी होत गेलं. (आताशा आयोजनचेही कार्यक्रम होत नाहीत.) परंतु, ते डोंबिवलीत राहात असल्याने तिथल्या शक्य तेवढ्या कार्यक्रमांमध्ये ते अजूनही आपली हजेरी लावतात..
   या ७ सप्टेंबरला (शुक्रवारी) कै.पं.सदाशिव पवार (बाबांचे तबलावादनातील गुरू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सदाशिव अॅकेडमीतर्फे बाबांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. अर्थातच डिंगोरकर आजोबाही तिथे आलेले. बाबांचा सत्कार त्यांच्याच हस्ते झाला. कितीतरी वर्षांनी त्यांची-बाबांची भेट झाली. दरम्यानच्या काळात आज्जीच्या निधनाचं त्यांना कळल्यावर आजोबांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांना झालेली. परंतु आमच्या नवीन घराचा पत्ता त्यांच्याकडे नव्हता.. कार्यक्रमात ब-याच वर्षांनी बाबांशी भेट झाल्यावर प्रथम त्यांनी आमचा पत्ता बाबांकडून एका कागदावर लिहून घेतला. आणि काल ते आजोबांना भेटायलाही आले..
   .. आल्या-आल्या आधी आजोबांची चौकशी. मग आजोबा खोलीबाहेर येताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. मग निवांत बसले. एकमेकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.. मी आणि आईही तिथेच होतो. आमचीही छान विचारपूस केली त्यांनी. मला खाऊही दिला.. मग बोलता-बोलता म्हणाले- "मध्यंतरी पाटलांकडून (पाटील आजोबा) वहिनींच्या निधनाचं कळलं.. त्या माऊलीच्या हातचं अन्न जेवलोय मी. हे ऐकून धक्काच बसला.. कधी दादांना भेटतोयसं झालं. पण तुमचा नवा पत्ता नव्हता माझ्याजवळ. मग परवा कार्यक्रमात आधी पत्ता लिहून घेतला एका कागदावर शेखरकडून. त्या दिवशी रात्री झोप नाही मला. दादांना भेटण्याची इतकी इच्छा झाली म्हणून सांगतो.. आमचं नातंच वेगळंय.. ते इतकं प्रेमाचं आहे ना, की.."- तोवर त्यांना इतकं भरून आलं की, त्यांचे सद्गतीत अश्रूच पुढलं बरंच काही सांगून गेले.. मघाशी म्हटल्याप्रमाणे दोघांच्याही मैत्रीला आता एक हळवीशी किनार लाभली आहे..
   .. सोशल मिडियावरल्या आभासी गप्पा नि एकूणच, नात्यांच्याही आभासी जगात या दोन सुहृदांच्या भावोत्कट मैत्रीची मी काल साक्षीदार झाले. नि माझीही मैत्रीची व्याख्या ब-यांच अंशी समृद्ध झाली.. कदाचित काल माणूस म्हणूनही मी मला नव्याने उमजले असावे..
  
  

Thursday, 26 July 2018

अवचित कधीतरी...


अवचित कधीतरी 
चहा छान जमून येतो..
नेमकं तेव्हाच रेडिओवर 
आवडीचं गाणं लागलेलं असतं..
खिडकीबाहेर आणि मनाआतही
संतत धारा बरसू लागतात..,
नि हवेची मंदशी झुळुकही
आणिक सुखावह वाटते त्यावेळी..
..
अवचित कधीतरी 
एकांतही असा हवाहवासा वाटतो..
...
 (1)

अवचित कधीतरी
तो थेंब होऊन ओघळतो
तिच्या खिडकीच्या गजांवरून..
अवचित कधीतरी
ती ही गंध होऊन दरवळते
त्याच्या अंगणातल्या ओल्या मातीतून..
..
अवचित कधीतरी
पावसालाही प्रेमात पडावसं वाटतं..
...

(2)
अवचित कधीतरी 
पाऊस असा काही बरसतो की,
सारं मळभ दूर होऊन जातं..
..
निरभ्र आकाश - नितळ झरा
शहारलेली हिरवळ - धुंद वारा..
..
अवचित कधीतरी 
नभीचं इंद्रधनु 
हळुच मनःपटलावरही उमटतं..
...

(3)
अवचित कधीतरी
ती पावसात भिजते..
चिंब..
..
अवचित कधीतरी
पापण्याही ओलावतात मग..
...

(4)
अवचित कधीतरी
आठवण येते..,
बराच वेळ रेंगाळते..
नकळत विरूनही जाते..
..
अवचित कधीतरी 
क्षणही काहीक्षण विसावतो..
...

(5)
अवचित कधीतरी 
तो भेटतो,
बोलतो,
हसतो, छानसा खळखळून..
..
अवचित कधीतरी
खर्चाच्या वहीत 'जमा' अशी नोंद झालेली असते..
...

(6)
अवचित कधीतरी
ती भेटते, 
बोलते,
हसते, छानशी खळखळून..
..
अवचित कधीतरी
उन्हालाही सावलीचा स्पर्श सुखावतो..
...

(7)
अवचित कधीतरी
शब्द मिळतात,
अर्थ सापडतात..,
कविताही सुचून जाते..
..
अवचित कधीतरी
मी ही व्यक्त होते,,
...

(8)
अवचित कधीतरी
आपसूक मागे सुटलेले बंध
अचानक समोर येतात..
आपसूकच मग पुन्हा जुळू लागतात..
..
अवचित कधीतरी 
आयुष्यंही नव्याने उलगडतं..
...
(9)
अवचित कधीतरी
मौनाची भाषा कळू लागते..
एकांत हळुहळु बोलू लागतो मग..
शांततेचंही सूक्ष्म संगीत ऐकू येऊ लागतं..
...
अवचित कधीतरी
मी माझ्यापाशी येते..
मी आणि माझी भेट हाते..
...
(10)

- 'श्री' उवाच

Tuesday, 3 July 2018

पाऊस असा रिमझिमतो...

कधी-कधी काहीतरी चुकतंयसं वाटतं.. निसटून चाल्लयसंही वाटतं.. पण ते मुद्दाम धरून ठेवावं असंही वाटत नाही.. कधी-कधी वाटतंही ते निसटू नये हातून म्हणून😁.. पण ब-याचदा 'Let it go'वालं फिलिंगच जास्त असतं..
.. पाऊस पडत असतानाही कधी-कधी काहीच घडत नाही. ना भरून येत, ना दाटून येत, ना गहिवरून ना उचंबळून येत.. कधी-कधी ही वरवरचीच शांतता असते. आतला कल्लोळ दडून बसलेला असतो कुठेतरी; किंवा जाणिवपूर्वक दडपून टाकलेलाही असतो.. तर कधी-कधी खरोखरंच शांत-स्तब्ध नजरेने आपण पाऊस पाहतो.. किल्मिषांचं जाळं नाही, नात्यातल्या उणी-दुणी नाहीत, उणिवांचा कुठलाच हिशेब नाही, आणि या अशा आठवांची कुठलीच सर नाही.. फक्त पाऊस पाहणं.. अशावेळी अगदीच नकळत हलकसं स्मितंही उमटतं गालांवर.. ते Candid clickने टिपून घ्यावसंही वाटत नाही तेव्हा आपल्याला.. कारण कुणीच नको असतं सोबत.. केवळ पाऊस आणि आपण.. त्याची ती रिमझिम बरसात आणि ती निमिषार्धात मनात साठवणा-या आपल्या पापण्यांची उघडझाप..
.. पाऊस अनुभवणं म्हणजे हेच असतं का?..  

Saturday, 19 May 2018

पत्र

... बघ, पुन्हा अडकले मी या संज्ञा-संकल्पनांच्या फे-यात..
पण का कुणास ठाऊक, तुझा विचार मनात आला ना, की मी आपसूकच काहीशी बौद्धिक होऊन जाते. Generally, अशा वेळेस आजुबाजुचं वातावरण उन्हाळी असूनही, बहुतांशी मनांमध्ये गुलाबी थंडी साजरी होत असते.., पण मला मात्र तुझी 'राजकीय-सामाजिक-आर्थिक..' आणि अशा ब-याच 'इक'-'इय' प्रत्ययान्ति असलेल्या शब्दांबाबतची विश्लेषणे त्यातल्या प्रत्येक मुद्दयासहित तोंडपाठ झालेली असतात.. शाळेत, परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे 21 अपेक्षितातून घोकूनही अनेकदा लक्षात राहायची नाहीत माझ्या!!.. इथे मात्र तू मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मीही विचार करायला लागते.., आपसूकच.. शाळेत कवितेचं रसग्रहणंही मी नवनीतमधून पाठ करायचे.. पाठ करायचे?!.. हसूच येतं आता त्याचं; आणि प्रश्नही पडतो.., इतका बदल कसा झाला माझ्यात?..
... अगदी सुरुवाती-सुरुवातीला आपण कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचो.. अख्खी संध्याकाळ तिथे घालवायचो.. तेव्हा तू , तुझे ते 'इक-इय'वाले जड शब्द, आणि त्याहूनही जड असलेले त्याबाबतचे तुझे विचार.., सगळंच नवीन होतं माझ्यासाठी!!.. तेव्हा आपण दोघंही प्रत्येकी एकच गोष्ट करायचो.. तू केवळ बोलायचास.. भरभरून.., आणि माझी फक्त श्रवणभक्ती सुरु असायची.. ब-याचदा तर सगळंच बाऊन्स जायचं माझ्या.., तरीही ऐकायचे.. ऐकतंच राहावसं वाटायचं.. मग कधी एखादा काहीबाही प्रश्न मी विचारला की त्यावर तू इतका फिदीफिदी हसायचास आणि मुद्दाम मला चिडवत म्हणायचास- 'केवढे 'मोठ्ठे' बालिश प्रश्न पडतात गं तुला?..', यात 'मोठ्ठे'वर जरा जास्तच जोर द्यायचास तू.. पण मग त्यानंतर, 'अशीच निरागस राहा.. कायम..', हे पुढलं वाक्य मात्र अगदीच मनापासून असायचं तुझं.. त्यामुळे, तुझ्यासाठी म्हणून स्वतःला बदलावं, असा विचारच कधी डोकावला नाही मनात!..
... ज्या पोटतिडकीने तू एखादा गंभीर मुद्दा मांडायचास, तितक्याच सहजतेनं तुझं ते मनमुराद हसणं- मनमोकळं बोलणं.. कदाचित तुझ्या या अंतर्बाह्य खरेपणामुळेच मी प्रेमात पडले असेन तुझ्या!!.. तेव्हा पडून गेले..; नकळतंच.. पण आता विचार करते तेव्हा; म्हणजे आत्ताश्या मीही विचार करायला लागलेय थोडा-थोडा.., तर सांगायचं म्हणजे, तुझं हे खरेपण आणखी आवडू लागतं मला.. आणि दरवेळी नव्याने, अंमळ जास्तीच प्रेमात पडते तुझ्या!!...  

- तुझीच
अहो सरकार
(आज या सरकारास 25 वर्षे झालीयेत बरं!!.. आहे ना लक्षात?!..)  

Thursday, 12 April 2018

अनुवाद

एका इंग्रजी काव्याचा स्वैर अनुवाद

कविता आणि संहिता
...
खरंतर दोघीही माझ्या अत्यंत जवळच्या...
पण कधीतरी अवचितच घेरतात मला.
अशावेळी मग, दोघींपैकी कुणी एक..,
ठरवूच शकत नाही मी.
...
संहिता म्हणते,
'चल, एकत्र रचुयात आपण,
भव्य-दिव्य-अजरामर, असं काहीसं'...
तर कविता..,
अलगद हात हातात घेते माझा..,
नि हळूच कुजबुजते-
'चल माझ्यासोबत; हरवुयात दोघीही..,
मग शोधू एकमेकींना'...
...

                                     - लॅंग लीव्ह 
                                      ( अनुवाद- चारुश्री वझे )

Monday, 9 April 2018

काही आठवणी..

काल मी दादरला प्राची मॅडम यांच्या घरी गेले होते. एकवीस बि-हाडांची ती चौ-यांशी वर्षांची वास्तू आणि तीत नांदत असलेली त्यांची चौथी पिढी.. मला रामबागेतल्या आमच्या आंबेकर वाड्याचीच आठवण आली.. म्हणजे वाडा आंबेकरांचा- आम्ही त्यांचे भाडेकरू.. पण आम्हाला मुळी तो कधी परका वाटलाच नाही.. 
तर सांगायचं म्हणजे अगदी असाच होता आमचा वाडा.. आमचं घर.. घरापुढला कठडा, पुढलं दार-मागलं दार, मागल्या दाराला असलेला कडी-कोयंडा, नि त्या दारावरल्या लाकडी फळीवर असलेल्या मिश्र पांढ-या-चाॅकलेटी रंगाच्या दोन चिनीमातीच्या बरण्या.. त्यात काय असायचं देवंच जाणे.. आणि आता घरातला सर्वात महत्वाचा भाग.. पोटमाळा.. घराचा नि एकुणच आमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक..
.. काल प्राची मॅडमचं घर पाहिल्यावर मनःपटलावर आमचा वाडाच दत्त म्हणून उभा राहिला.. वाडा आणि अर्थातच माझं बालपण.. अशावेळी जिच्यामुळे या दोन गोष्टी माझ्यासाठी अगदी खास आहेत तिची आठवण न आल्यावाचून कशी राहील?!!..


प्रिय आज्जी
तू आहेस अजूनही..


तू आहेस अजूनही 
औषधांच्या बटव्यात,
राजाराणीच्या गोष्टीत, 
आकाशात दडून बसलेल्या 
चांदोमामाशी लपाछपी खेळत
हसते आहेस- हसवते आहेस..
तू आहेस अजूनही..


तू आहेस अजूनही
समईच्या मंद ज्योतीत,
पणतीच्या सात्विक प्रकाशात,
नि उद्बत्तीच्या आत्मिक सुगंधात
शुभंकरोति म्हणत,
निरांजनात अखंड तेवत आहेस..
तू आहेस अजूनही..


तू आहेस अजूनही
देवापुढल्या पोथ्यांमध्ये,
चौकटीसमोरच्या रांगोळीत,
सडा शिंपलेल्या अंगणात,
नि कुंडीतल्या मातीत
जरास्सा शिडकावा होताच
दरवळते आहेस.. बहरते आहेस..
तू आहेस अजूनही..


तू आहेस अजूनही
लुटुपुटुच्या भांडणात,
लिप्टीचिप्टीच्या घासात,
घोडा-घोडा नि कांदेबटाट्याच्या
मजेशीर विक्रीत तर
फारच भाबडेपणाने खरेदी करतेस गं..


तू आहेस अजूनही
निंबोणीच्या झाडामागे,
आंब्याच्या बनात,
चॉकलेटच्या बंगल्यात,
नि भोलानाथच्या काल्पनिक सुट्टीतही..


नकट्या नाकातल्या नथीपासून
ते सौभाग्यलक्षणाच्या जोडवीत..
नि, ताकातल्या उकडीपासून
ते उकडीच्या मोदकापर्यंत..,
सर्रास वावर आहे गं तुझा..


खरं तर तू कुठे नाहीस?
प्रत्येक घरात,
प्रत्येक नात्यात,
प्रत्येक संस्कारात,
नि प्रत्येक मनात..


जोपर्यंत, घराच्या भिंती एकजुटीनं उभ्या आहेत,
नात्यांमधला ओलावा टिकून आहे,
संवेदनक्षम संस्कारांची जाण आहे,
नि मनातला एखादा तरी कोपरा
अजूनही हळवा आहे..
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही.. 


-चारुश्री वझे

Wednesday, 4 April 2018

असंच काहीसं.., सुचलेलं.. (2)

किती छान असतं नाही प्रेमात पडणं!!...
.. कुठल्यातरी कारणावरुन पहिले ओळख होते.., मग ‘formal’ मैत्रीबोलण्यातून त्या फॉर्मलिटीत एक कम्फर्टनेस’ येतो... मग हळुहळू संवादाचे विषयही वाढत जातात... एकमेकांचे विचार कळू लागतात.., ते काहीसे जुळू लागल्यावर मग आपसूकच थोडासा इंटरेस्ट वाढू लागतो...
..मग ती मैत्रीही ‘informal’ची वाट धरते.., त्या वाटेवरुन जाता-जाता चेष्टा-थट्टामस्करीची छानशी सोबत मिळते.. हे सोबती मैत्रीला आणखी काहीसं तरल करतात... मग संवादही अधिकाधिक वाढतो.. एकमेकांना थोडेसे आणखी जवळून ओळखायला लागतो.., आणि म्हणूनच की काय संवादासोबत काहीसे वादही झडायला सुरु होतात...
... मग मैत्री जसजशी मुरु लागते तसतसा वाद घालणं आणि वाद मिटवणं हा तिचा जणु फिटनेस स्पोर्ट’ बनून जातो.., मग हा खेळ खेळता-खेळता समोरच्याची मतं जरी न पटणारी असली तरी तो आपल्याही मतांचा आदर करणारा आहेहे एकदा का त्या खेळाडूद्वयींना कळलं की, ‘व्यक्तिमत्व विकास’ व्यवसायातला खेळांचे फायदेमधला फायदा क्र.-खेळाडूंमध्ये संघभावना निर्माण होतेत्यांच्यात सांघिक वृत्ती जोपासली जाते...
... (आयुष्यभराची मैत्री जी म्हणतात ना ती अशीच होऊन जाते.., आपोआप.., आपल्या नकळतच!!... सुरुवातीला आपण ती जोपासतो., नंतर तीच आपली निगा राखते)...
... मग त्या मैत्रीचं स्वतःमध्येच एक छानसं नातं तयार होतं.. जणु ती आपल्या आयुष्याची एक वहिवाटच बनून जाते... ते नातं इतकं छान ट्युन होतं की.., एखाद्या अवचित क्षणी कुठल्याशा सुप्त आकर्षणाची जोड मिळताच ते अधिकाधिक बहरतं.. त्याचा दरवळ इतकाss स्निग्ध होतो की.., हळुवारपणे..अलगदच.., मैत्रीचं पुढलं पाऊल पडतं...
मग तेव्हा, 'बडे अच्छे लगते है.., ये धरती, ये नदियॉं, ये रैना, और.., तुम' हे आपसूकच ओठी रुणुझुणून जातं.. तर कधी 'किती बोलतो आपण दोघे, तरी बोलणे राहून जाते.. तुझ्या नि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते', असं म्हणत असतानाच, 'तू असतीस तर झाले असते, गडे, उन्हाचे गोड चांदणे', यांतलं छानसं कल्पनासुखही अनुभवून घेतो.. या कल्पनेच्या प्रवासात मग 'तुमको देखा तो यह खयाल आया, के, जिंदगी धूप तुम घना साया..'.., आश्वस्त करतं मनाला.. एक वेगळाच दिलासा देऊन जातं..

असंच काहीसं.., सुचलेलं..


     

Thursday, 29 March 2018

असो...

https://youtu.be/sxaALWXEz_w

तुझं कुणासोबत तरी चालणं..,
हातात हात घेऊन, नजरेत नजर मिळवून..
वाईट नाही वाटत..,
पण छोट्याश्या कट्ट्यावर आपण एकत्र घालवलेली संध्याकाळ मात्र तेव्हा आठवते.
.. असो.

एकमेकांमध्ये आकंठ बुडालेलं तुमचं बोलणं..
काय बोलत असाल तुम्ही माहित नाही..
कदाचित एकमेकांच्या डोळ्यात
तुम्ही तुमच्या भविष्याची स्वप्नही रंगवत असाल..
..,
मला मात्र माझ्या बालिश विनोदावर
तुझं खळखळून हसणं आठवतं..
..असो.

तुझ्या बोटांचं सदान् कदा
तिच्या बटांमधलं गुंतलेपण..
पाहिलं की काहीशी ऑक्वर्ड होते मी..,
पण मग ट्रॅडिशनल डे ला मी साडी नेसून आल्यावर,
'वा!!.. क्या बात है, मेरी जान.. आज कुणीतरी तुला नक्की प्रपोज करेल बघ..',
हे तुझं म्हणणं आठवतं..
त्यावेळी मी नकळतपणेच बोलून गेले-
'अरे मग कर की प्रपोज'..
फार आस होती रे माझ्या डोळ्यात..,
पण तुझ्या मिष्किल डोळ्यांना तोही
एक बालिश विनोदच वाटला..
..असो.

तुझं माझ्यासोबत नसणं, किंवा
दुस-या कुणासोबत तरी असणं..
फार दुृःख असं नाही होत..
पण, तुझी सोबत मिळाल्यावर आयुष्य
आहे त्यापेक्षाही आणखी सुंदर वाटतं,
हे नक्की.., आणि ती जर मला मिळाली असती तर...
..असो.

जे आहे.., जसं आहे...
..असो.

Saturday, 17 February 2018

माझे 'रेडिओ'गत

13 फेब्रुवारी- 'जागतिक रेडिओ दिन'. यंदाच्या 13 फेब्रुवारीला मला FTII,पुणेच्या रेडिओकथन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. नातं माझं रेडिओशी, हा स्पर्धेचा विषय असून तिथे सांगितलेली रेडिओबद्दलची माझी ही खास आठवण-

'नमस्कार, आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र. सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनीटं झाली आहेत. सादर करीत आहोत, कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी'...
... पाचवी ते सातवी या तीन वर्षांमध्ये रेडिओशी, चिंतन हा चिंतामणीशी आणि त्यातूनही श्रीराम केळकरांच्या ह्या अनाऊन्सनेंटशी खूप गहिरं नातं निर्माण झालेलं. कारण त्यांची 'सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनीटं झाली आहेत', ही अनाऊन्समेंट झाली रे झाली, की, मी आंघोळ आटपून बाथरूममधून बाहेर यायलाच पाहिजे, हा, कुणीही न घातलेला असा दंडक होता. कारण इथे, तास-मिनीट-सेकंदाचं गणित नव्हतंच मुळी! रेडिओच्या कार्यक्रमांनुसार आमचे कार्यक्रम अध्यहृत असायचे. आजच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं, तर, 'It has already lined-up'.. तर, सहा वाजून पस्तीस मिनीटं ही वेळ आमच्या बिनकाट्याच्या घड्याळ्याने अर्थात् रेडिओने दिल्यावर, आमच्या घरातली साधारण परिस्थिती अशी- मी आंघोळीहून बाहेर यायचे, बाबा पॅसेजमध्ये दात घासत असायचे आणि आई माझा डबा भरत असायची. मग, एकीकडे आवरताना रेडिओवरची प्रार्थना मी ही आळवायचे- 'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,..' 'म्हंss, करा करा, जरा प्रार्थना कराच देवाला. तशीही आपल्याकडे बुद्धीची काहीशी कमतरताच आहे'.. दात घासणं किंवा दाढी करणं, काहीही असो. ते करता-करताच बाबा माझी मुद्दाम अशी टर्र उडवायचे. त्यामुळे प्रार्थना आणि माझी खिल्ली हे अध्यहृतच! क्वचितच कधीतरी बाबांनी ही संधी दवडली असेल. मग प्रार्थनेनंतर वामनराव पैंचं प्रवचन सुरू व्हायचं. एरव्ही 'झालं आता प्रवचन सुरू!', असं आपण उपहासाने म्हणतो. पण वामनराव पैंच्या प्रवचनात खरोखरंच विचारपूर्ण असेच उपदेश असायचे. मग ते सुरू असताना 'ऐकलंस का, आत्ता काय म्हणाले ते?', ह्या आईच्या प्रश्नावर मी केस विंचरता-विंचरता 'होss गंs आई' किंवा दूध पिताना मान डोलावूनच होकार द्यायचे. त्यावर 'नुसत्या नंदीबैलासारख्या माना नका डोलावू. प्रत्यक्ष आचरणातंही ते दिसू दे, म्हणजे झालं..' आता, बाबांचा डबा भरता-भरता आईची ही मार्मिक टिपण्णी असायची. कारण माझ्यानंतर तेही ऑफिससाठी बाहेर पडायचे. तर, अशा रीतीने 6.45 पर्यंत 'चिंतन हा चिंतामणीचा' पहिला भाग संपायचा. त्यानंतर लगेचच दत्तू काका म्हणजे माझे रिक्षावाले काका मला घ्यायला यायचे. त्यामुळे 6.35 ते 6.45 या दहा मिनीटात माझं आवरून, आईने कपात ओतलेलं दूध पिऊन, तासिकेनुसार दप्तर भरलंय ना, हे चेक करून आणि पुन्हा डबा-बाटली त्यात भरून मी गेटपाशी जाऊन उभी राहिले, की, माझी शाळा मोहिम फत्ते व्हायची. ..या दहा मिनीटात आमच्या तिघांचीही कामं आणि आमच्यातले 'सुखद-संवाद' रेडिओनुसार  lined-up असायचे. ..
.. तर, रेडिओबद्दलची ही माझी अतिशय खास आठवण. कारण कळत-नकळत ती पुन्हा मला माझ्या शाळेतल्या दिवसांत घेऊन जाते..  

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...