काल मी दादरला प्राची मॅडम यांच्या घरी गेले होते. एकवीस बि-हाडांची ती चौ-यांशी वर्षांची वास्तू आणि तीत नांदत असलेली त्यांची चौथी पिढी.. मला रामबागेतल्या आमच्या आंबेकर वाड्याचीच आठवण आली.. म्हणजे वाडा आंबेकरांचा- आम्ही त्यांचे भाडेकरू.. पण आम्हाला मुळी तो कधी परका वाटलाच नाही..
तर सांगायचं म्हणजे अगदी असाच होता आमचा वाडा.. आमचं घर.. घरापुढला कठडा, पुढलं दार-मागलं दार, मागल्या दाराला असलेला कडी-कोयंडा, नि त्या दारावरल्या लाकडी फळीवर असलेल्या मिश्र पांढ-या-चाॅकलेटी रंगाच्या दोन चिनीमातीच्या बरण्या.. त्यात काय असायचं देवंच जाणे.. आणि आता घरातला सर्वात महत्वाचा भाग.. पोटमाळा.. घराचा नि एकुणच आमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक..
.. काल प्राची मॅडमचं घर पाहिल्यावर मनःपटलावर आमचा वाडाच दत्त म्हणून उभा राहिला.. वाडा आणि अर्थातच माझं बालपण.. अशावेळी जिच्यामुळे या दोन गोष्टी माझ्यासाठी अगदी खास आहेत तिची आठवण न आल्यावाचून कशी राहील?!!..
प्रिय आज्जी
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही
औषधांच्या बटव्यात,
राजाराणीच्या गोष्टीत,
आकाशात दडून बसलेल्या
चांदोमामाशी लपाछपी खेळत
हसते आहेस- हसवते आहेस..
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही
समईच्या मंद ज्योतीत,
पणतीच्या सात्विक प्रकाशात,
नि उद्बत्तीच्या आत्मिक सुगंधात
शुभंकरोति म्हणत,
निरांजनात अखंड तेवत आहेस..
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही
देवापुढल्या पोथ्यांमध्ये,
चौकटीसमोरच्या रांगोळीत,
सडा शिंपलेल्या अंगणात,
नि कुंडीतल्या मातीत
जरास्सा शिडकावा होताच
दरवळते आहेस.. बहरते आहेस..
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही
लुटुपुटुच्या भांडणात,
लिप्टीचिप्टीच्या घासात,
घोडा-घोडा नि कांदेबटाट्याच्या
मजेशीर विक्रीत तर
फारच भाबडेपणाने खरेदी करतेस गं..
तू आहेस अजूनही
निंबोणीच्या झाडामागे,
आंब्याच्या बनात,
चॉकलेटच्या बंगल्यात,
नि भोलानाथच्या काल्पनिक सुट्टीतही..
नकट्या नाकातल्या नथीपासून
ते सौभाग्यलक्षणाच्या जोडवीत..
नि, ताकातल्या उकडीपासून
ते उकडीच्या मोदकापर्यंत..,
सर्रास वावर आहे गं तुझा..
खरं तर तू कुठे नाहीस?
प्रत्येक घरात,
प्रत्येक नात्यात,
प्रत्येक संस्कारात,
नि प्रत्येक मनात..
जोपर्यंत, घराच्या भिंती एकजुटीनं उभ्या आहेत,
नात्यांमधला ओलावा टिकून आहे,
संवेदनक्षम संस्कारांची जाण आहे,
नि मनातला एखादा तरी कोपरा
अजूनही हळवा आहे..
तू आहेस अजूनही..
तू आहेस अजूनही..
-चारुश्री वझे
No comments:
Post a Comment