१-०८-२०२१
काल कौशल इनामदार
यांच्या ‘कौशलकट्टा’ या युट्युब चॅनेलवर पुलंबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक
आठवणींविषयीचा भाग मी बघत होते. पुलंच्या ८०व्या वाढदिवसाप्रित्यर्थ दादर-माटुंगा
कल्चरल सेंटरमध्ये पुलंच्या नाटकांचा, साहित्याचा, त्यांच्या गीतांचा असा पुलमय कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. त्या कार्यक्रमात पुलकीत गीते सादर करण्याची संधी कौशल यांना मिळाली.
आणि त्या संधीबरोबरंच सुनीताबाईंची एक सूचनाही त्यांना पोचती झाली. ती अशी की-
केवळ पुलकीत गीते सादर न करता ‘बिल्हण’ ही संगीतिका कौशल यांनी सादर करावी; जी
त्या अगोदर सुमारे ५० वर्षांपूर्वी आकाशवाणीवर सादर झाली होती. मंगेश
पाडगांवकरांनी ही संगीतिका लिहिली असून पुलंनी तिला संगीतबद्ध केलं होतं.
त्याबाबतचे अधिक तपशील आणि त्याच्या अवतीभवती गुंफलेले किस्से हे कौशल यांच्या युट्युब
चॅनेलवर आपल्याला ऐकायला मिळतीलंच. त्याचा जरूर आस्वाद घ्यावा!
तर सांगायचा मुद्दा असा
की,
‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ हे मराठीतील अजरामर भावगीत हे मूळतः
याच संगीतिकेतलं. आजच्या घडीला हे गाणं कैकांच्या ओठी रुळलेलं आहे. त्यातीलंच एक
कडवं-
‘आठवते पुनवेच्या
रात्री
लक्षदीप विरघळले
गात्री..’
परंतु बिल्हण या
संगीतिकेत- या गाण्याच्या मूळ संहितेत मात्र-
‘आठवते पुनवेच्या
रात्री
लक्षचंद्र विरघळले
गात्री..’
असं पाडगांवकरांनी
लिहिलं होतं.
..
कौशल यांनी ही आठवण
सांगताच हे कडवं मी पुन्हा-पुन्हा गाऊ लागले. ‘लक्षदीप’ आणि ‘लक्षचंद्र’ हे दोन्ही
शब्द घेऊन एकामागून एक मी कडव्याच्या ओळी गुणगुणू लागले. आणि त्या घडीला हे कडवं
मला दोन वेगळ्याच भावार्थांनी अनुभूत झालं-
‘आठवते पुनवेच्या
रात्री
लक्षदीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या
विश्वाचे
रहस्य मज उलगडले’
पुनवेच्या त्या
चंद्रप्रकाशात उजळून निघालेली आपल्यातील प्रित अशी काही दैदीप्यमान होती की, जगातील
लक्षदीप त्यात विरघळून जावेत. या तेजोमय प्रेरणेतून आविष्कृत झालेलं भावगम विश्व
नि प्रितीच्या त्या दैदीप्यमान वैश्विकतेची अंतस्थ प्रचिती, त्या
पुनवरात्री तुझ्या बाहुपाशात मला झाली.
..
‘आठवते पुनवेच्या
रात्री
लक्षचंद्र विरघळले
गात्री
मिठीत तुझिया या
विश्वाचे
रहस्य मज उलगडले’
पुनवेच्या त्या रात्री
प्रितीच्या मर्मबंध आलिंगनात कैक युंगांचे लक्षचंद्र गात्रागात्रांत विरघळले.
विश्वाशी जडलेले आदिम रुधिरबंध नि त्यातून निरंतर पाझरणारी रुचिर प्रित- तुझ्या
त्या मुग्ध कवेत विश्वमूलाच्या धमन्यांमधलं हे रहस्य माझ्या आत झिरपलं.
..
एकीकडे पुनवप्रितीची
दैदीप्यमान वैश्विक अनुभूती; तर दुसरीकडे तिचा विश्वमूलाशी असलेला आदिम बंध. केवळ
एका शब्दाच्या फेरबदलानेदेखील अनुभवाच्या अभिव्यक्तीत किती तफावत आढळू शकते!
अर्थात्, हा मला प्रतित झालेला भावार्थ आहे.
कविता खरोखरीच स्वैर
असते, हे अशावेळी अगदी खासंच पटतं. शब्दांच्या साच्यात जरी ती प्रमाणबद्ध असली
तरी तिच्या अनुभूतींमधला तिचा आत्मा हा मुक्त आहे. एक कविता नि तिच्या अनेकानेक
प्रचितीछटा. माझ्या रसिकमनावर जी छटा उमटली तिच्यातील रंगसंगतीला उलगडण्याचा हा एक
छोटास्सा प्रयत्न!
Sundar blog
ReplyDeleteVery nice!! Keep it up ����
ReplyDeleteThank you so much!!
ReplyDeleteखुपचं सुरेख अतिशय तरल भावस्पर्शी संवेदनेने गुंफलेल्या शब्दछटा!
ReplyDeleteधन्यवाद ताई 😊😊
ReplyDelete