Friday, 3 March 2017

'धक्का'तंत्र

नमस्कार मंडळी! सर्वांना मराठी राज्यभाषादिनाच्या, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक आणि 'Belated' शुभेच्छा. आणि हो, या आधीच्या ब्लॉगवरील सुंदर-सुंदर प्रतिक्रियांसाठी अगदी मनापासून धन्यवाद. BTW लीना, ब्लॉग पोस्ट करायला जरा उशीरच झाला. त्यामुळे.., माफी मागतेय म्हणून क्षमस्व! 😁😀😀 ( बहुदा यांस विनोद म्हणणं, हेच कदाचित विनोदी ठरेल, नाही!.. असो.)
तर मंडळी, आपल्या आजुबाजुला ब-याचदा अनपेक्षित गोष्टी घडतात. ज्याचा आपल्याला 'धक्का' बसतो. कारण 'धक्का' ही गोष्टच मुळात अनपेक्षित असणं अपेक्षित आहे. कारण तिथेच तिचं अस्तित्त्व असतं.., तिथेच ती वास्तव्य करते.., तिथेच तिचं.., असो!.., आणि बरंच काही..! (भा.पो) (कारण एवढच सुचलं. म्हणून विसरायच्या आत पटकन लिहून टाकलं!!😝) तर मंडळी कधी-कुणाला-कुठे-कशाप्रकारचा धक्का बसेल, काही सांगता येत नाही. म्हणजे 'स्वप्नांच्या पलीकडले', असं काही अस्तित्त्वात असेलच तर ते म्हणजे एकतर 'चित्रपट'; नाहीतर हे 'धक्के'...
... 'अहो वझे, आता मोठा शिशूवर्गही झाला. वार्षिक परीक्षाही संपली. तुमच्या चारुश्रीला अजूनही अक्षरज्ञान नाहीये. रडण्यापलीकडे दुसरं करतेच काय ती? तिची पाटीही ऋत्विजाच पूर्ण करते. माझं ऐका. तिचं वय तसंही कमीच्चे. एवढ्यात पहिलीत पाठविण्याची घाई करु नका. अजून एक वर्ष तिला पुन्हा एकदा मोठ्या शिशूतच बसवा',- गोरे बाईंनी त्यांच्या खास सडेतोड शैलीत सांगितलं. ( सांगितलं कसलं, सुनावलच असेल कदाचित! हंsss खवट्टं!! एवढं बदड-बदड-बदडायच्या. रडणार नाही, तर काय हर्षभराने नाचायला हवं होतं मी?!) मग काय? मातोश्री तशाही अतिहळव्या- 'अरे देवा, कसं होणार हिचं?' ( मला वाटतं, ह्या प्रश्नाची व्युत्पत्ती अंदाजे तेव्हाच झाली असावी. ज्याप्रमाणे प्रवाह बदलला, तरी नदी मात्र तिच असते; अगदी त्याचप्रमाणे प्रसंग बदलले, पण हा प्रश्न मात्र अजूनही आपलं अस्तित्त्व राखून आहे! असो.) आणि बाबांनी तर मनोधारणाच केलेली- ' काही हरकत नाही! पुन्हा एकदा तिला मोठ्या शिशूत बसवुयात. तसंही जरा लवकरच शाळेत घातलयं आपण तिला.'
एवढं सगळं माझ्या आजुबाजुला घडत होतं. मला मात्र याचा थांगपत्ताही नव्हता! माझ्यासाठी मोठ्या शिशुतून पहिलीत जाणं म्हणजे पाटी-पेन्सिलऐवजी वही-पेन्सिल वापरण्यातलं अप्रूप आणि 'चला, आता काही आपल्याला त्या गोरे बाईंचा मार मिळणार नाही', हा निरागस-निखळ आनंद!! त्यामुळे अज्ञानात सुख असतं, हे मी या बाबतीत तरी मान्य करीनच. कारण  या हर्षभरातच मी त्या दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीत 'अ' ते 'ज्ञ'पर्यंतची मुळाक्षरं-व्यंजने, बाराखडी सगळंच्या सगळं मोठमोठ्याने बडबडून लिहिलं. इतक्यांदा लिहिलं-इतक्यांदा लिहिलं की, आई-बाबांना.., 'धक्का'च बसला. आणि अर्थातच माझी रवानगी पहिलीत झाली!😊😊...
... नववीत असताना मी एक लेख लिहिलेला. नाव होतं- 'छंद व उद्दीष्ट- त्यातील आपली ओळख'. लेख-स्वरुपात लिहिण्याचा तो पहिलाच प्रयत्न. त्यामुळे अतिशय उत्साहाने तो मी काळे मॅडमना दाखविला. काळे मॅडम आमच्या कार्येकर क्लासमधल्या मराठी-संस्कृतच्या शिक्षिका. शीर्षक वाचताच त्या कौतुकाने- 'अरेव्वा! आता घरी गेल्यावर सविस्तर वाचून सांगते', असं म्हणाल्या. मीही आनंदाने मान डोलावली. मला वाटलेलं आता दुस-या दिवशी त्या माझं कौतुक करतील, काही सुधारणा असल्यास सांगतील; आणि विषय तिथेच संपेल. पण दुस-या दिवशी त्या वर्गात आल्या. त्यांचं मराठीचं लेक्चर होतं आमच्यावर. आल्या-आल्या त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ज्या काही सूचना होत्या, जिथे सुधारणा आवश्यक होती त्याची नोंदही त्यांनी लेखातच लाल पेनाने केलेली. तो लेखाचा कागद घेऊन मी जागेवर बसणार तितक्यात त्यांनी तो माझ्याकडून परत घेतला. आणि सबंध वर्गासमोर त्यांनी स्वतः तो लेख मोठ्याने वाचला. तासाभराचं त्यांचं लेक्चर. त्या तासाभरात एखाद्या कवितेचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे त्यांनी माझ्या लेखाचं विवेचन केलं. साहजिकच हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धक्काच होता. मला तर खांदे उडवून आम्हा मुलींच्या गणवेशाला नसलेली कॉलरही टाईट कराविशी वाटली!😊😊...
... कॉलेजला जेव्हा दादरवरून जायचं असतं, तेव्हा मधला टिळक ब्रीजखालचा रस्ता ओलांडावा लागतो. आपल्याकडे कुठल्याही ब्रीजखाली निर्वासितांची वस्ती ही हमखास असते. काहींना त्यांची कीव येते; काहींना त्यांचा राग येतो. मला हे दोन्हीही अधून-मधून किंवा कधी सलग  एकामागोमाग एक वाटतं. तर त्या टिळक ब्रीजखालीही अशी वस्ती साहजिकच आहे. त्यांच्या त्या घराला ना भिंत ना दरवाजा. छप्पर म्हणून काय तो टिळक ब्रीज! एखादी फाटकी कळकट्ट-मळकट्ट अंथरलेली चादर, त्याच्या बाजूला छोटीश्शी शेगडी ( त्यावर काय शिजत असेल, देवच जाणे!), त्यामागे असलेला आरसा-कंगवा, एका तान्ह्या बाळाच्या हातात असलेलं भांडं, जे ते नेहमी तोंडात धरून ठेवायचं ( कदाचित तेव्हा त्याचे दात येत असल्याने त्याच्या हिरड्या शिवशिवत असाव्यात.), अशी त्यांची संसारिक सामग्री आणि एकूणच संसार! कधी तिथे लहान मुलांच्या रडण्याचे-भांडण्याचे आवाज असतात. कधी तिथली मोठी मंडळी जोरजोराने एकमेकांना शिव्या घालत असतात. आणि या सगळ्यात वाहने-पादचा-यांची ये-जा मात्र अव्याहत सुरू असते. 'प्रायव्हसी' हा शब्दच या मंडळींच्या गावी नसेल, नाही!  तर असा हा टिळक ब्रीज आला की, माझ्या पावलांची गतीही वाढायची. झरझर चालून तो ओलांडल्यावर हुश्शं वाटायचं.
एकदा तिथूनच जात होते. नेहमीप्रमाणे झर्रर्रदिशी तो ब्रीज ओलांडण्याचं ठरवलं अन् तोच माझी नजर नेमकी तिथे घडत असलेल्या एका दृश्यावर पडली.., आणि स्थिरच झाली. घटना होती, 'त्या मंडळींचं फोटोशूट'! त्यांच्यातलं एक 'कपल' त्यांच्यातल्याच एका इसमाकडून मोबाईलवर फोटो काढून घेत होतं. कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, कधी एकमेकांकडे पाहून, कधी एका बाळाला मांडीवर बसवून; तर कधी त्यांच्यातल्याच साधारण चौदा-पंधरा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन त्यांचं जणु 'फॅमिली फोटोशूट'च चाल्लेलं. त्या फोटोशूची लोकेशन्स म्हणजे ब्रीजखालची पत्र्याची गाळावजा झोपडी, ब्रीजच्या पाय-या आणि त्या समोरचा इलेक्ट्रीक पोल. तो 'कॅमेरामन' जेव्हा 'स्माईल' असं म्हणायचा, तेव्हा तोही त्यांच्यासोबत हसायचा. त्यांचे एरव्हीचे विचकटलेले-त्रासलेले चेहरे त्यावेळी ओठांचा मोठ्ठा 'ई' करून मात्र फारच गोंडस दिसत होते. मीही नकळतच तिथे पाच-सात मिनिटं घुटमळले. एक 'धक्का'च होता तो माझ्यासाठी...
... तर असे बरेच धक्के. धक्क्यांची यादीच सांगायची झाली तर मला एखादं 'धक्का सदर'च लिहावं लागेल कदाचित. अर्थात प्रत्येकाची स्वतःची एक धक्का- यादी असतेच. नसेल तर कधीतरी खास वेळ काढून जरुर करून पाहा. ती यादी कधी खळखळून हसवेल, कधी अंतर्मुख करेल, कधी डोळ्यातून टचकन् पाणीही आणेल. पण राव, बहुत मजा आएगा! नक्कीच!!😊😊😊    

19 comments:

  1. छान...रिअलिस्टिक लिहिलय...

    ReplyDelete
  2. खूप छान वास्तवरुपी मांडणी.
    चारुश्री😇

    ReplyDelete
  3. चारुश्री,
    खुप छान ! धक्क्याचा प्रवास लहानपणापासुन आत्ता पर्यंत!

    ReplyDelete
  4. चारुश्री छानच लिहिलयस....नेहेमीप्रमाणे
    तुझे हे बोली भाषेतील लिखाण वाचायला मजा येते.
    कधी विचार करायला लावणारे कधी गालातल्या गालात हसायला लावणारे..पण प्रत्येक वेळी वाचकांच्या मनाजवळ जाणारे...
    मी वाट पहात असते पुढच्या लेखाची.
    आता पटकन पुन्हा लिही आणि sorry म्हणायची वेळच नको ना आणूस!!!!
    धक्कातंत्र माणसाच्या आयुष्याला गती देतं..असा माझा समज आहे.
    काळेबाईंचा आणि कार्येकर सरांचा उल्लेख आनंद देऊन गेला ..दोघेही हाडाचे शिक्षक .कल्याणमधल्या किती मुलांच्या भविष्याचे शिल्पकार माहित नाही.पण माझ्या लेकीच्या आयुष्याचे सोने करणाऱ्या दोन्ही व्यक्ती !!
    असेच छान छान लिहीत जा.मनापासून शुभेच्छा!!!!;

    ReplyDelete
  5. छान लीहीलय.keep it up

    ReplyDelete
  6. तुझे धक्के ऐकून.लहानपण आठवलं..
    भारी लिहलय...

    ReplyDelete
  7. Nice JOLT... You have a good reading of mind of people around you and reproducing it on paper... just keep it up. dear....

    ReplyDelete
  8. एकदम सुंदर...

    ReplyDelete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...