Thursday, 16 April 2020

शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..



  सध्या माझं शांता शेळके यांच्या 'पूर्वसंध्या' या काव्यसंग्रहाचं वाचन सुरु आहे. खरंतर त्याला केवळ 'वाचन' असं नाही म्हणता येणार. कारण केवळ वाचनात एक प्रकारचा रुक्षपणाच अधिक असतो. परंतु शांताबाईंसारख्या मनस्वी लेखिका-कवयित्रीच्या साहित्याचं आपण केवळ वाचन करूच शकत नाही. उलट आपल्याही नकळत आपण त्यांच्या साहित्याचा मनस्वीय आस्वाद घेऊ लागतो. ही आस्वादाची प्रक्रिया अगदी सहज घडून येते. याचं मुख्य कारण म्हणजे मुळातच शांताबाईंच्या लेखनात असलेली अंगभूत सहजता!..
   'पूर्वसंध्या'तील कवितांचा आस्वाद घेताना मी त्याबरोबरंच शांताबईंचा 'धूळपाटी' हा आत्मचरित्रपर असलेला ललित-लेखसंग्रहदेखील वाचला. त्यात शांताबाईंनी वर्णिलेल्या एका दृश्यप्रसंगाची आणि पूर्वसंध्यामधील दोन कवितांची माझ्या मनात सांगड घातली गेली. या दोहोंचा परस्परांशी थेट संबंध असेलंच वा तसा तो आहे, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण माझ्या मनात तो संबंध प्रस्थापित झाला. जणु हे माझंच 'संदर्भ-स्वगत' आहे, असं म्हणा!..
.. 
  " मागच्या माडीतली एक विचित्र आठवण मी कधीच विसरणार नाही. या माडीला लागून स्वयंपाक घरावर टाकलेले पत्र्याचे आडवे छप्पर होते. ... एकदा मागल्या माडीत मी झोपले असताना रात्री अचानक मला जाग आली. चूळ भरण्यासाठी मी पत्र्यावर आले आणि बाहेरचा देखावा बघून चकित, स्तिमित झाले की तिथेच बसून राहिले. ती चांदणी रात्र होती. शांत चांदणे फुलले होते. ... त्या शांत नि:स्तब्ध वातावरणात माझे मन असे भारावून गेले की मी तिथेच बसून राहिले. ... त्या रात्री मी काय पाहिले, काय अनुभवले, तिथे तशी मी का बसून राहिले होते याचा मला या क्षणापर्यंत उलगडा झालेला नाही. ... "  
[ 'धूळपाटी' पृ.क्र.- ४७,४८ ]

'धूळपाटी'मधील ' आठवणी आजोळच्या' या लेखात शांताबाईंनी खेडचं, तिथल्या त्यांच्या आजोळचं, त्यांच्या वाड्याचं वर्णन केलं आहे. वाड्याच्या माडीचा उल्लेख त्यांनी जिथे-जिथे केला आहे तिथे- आभाळ, रात्रीचं फुललेलं शांत चांदणं, तिथे त्यांनी व्यतीत केलेला त्यांचा एकांत - यांचा संदर्भ हमखास येतो. वर नमूद केलेलं दृश्य हे कुठेतरी त्यांच्या मनाच्या बोधपूर्व स्तरात ( Subconscious mind) कोरलं गेलेलं असणार. त्यांच्या स्तिमित होण्याचा थेट उलगडा जरी त्यांना झालेला नसला तरी ते दृश्य- ती घटना आठवणीच्या रुपात मनात खोलवर रुजली असणारंच. ही आठवणंच मग एखाद्या अवचित प्रसंगी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होते. त्या घटनादृश्याची अभिव्यक्ती त्या माध्यमातून नकळतपणे रेखाटली जाते. त्यातूनही 'कविता' हे तर स्वगताचंच माध्यम! त्यामुळे आठवणींचा थेट उलगडा जरी झाला नसला तरी त्यांचा कुठला ना कुठला संदर्भ हा या अभिव्यक्तीत हमखास दडलेला असतो-
' उमगत नाही कधीच मला
अर्थ त्या शांत समंजस ता-यांचा
आणि त्यांच्या आत्ममग्न गाण्याचाही
मात्र माझ्याप्रमाणेच असते ऐकत-बघत
विस्तारलेले अफाट आभाळ, दिशा दाही '
[ कविता- ता-यांचे शांत कळप ]
  कवयित्रीचं तिच्या आजोळच्या वाड्यातल्या माडीतून दिसणा-या चांदण्यांना नि त्या चांदण्यांनी भारलेल्या त्या दृश्याला पाहून स्तिमित होणं, स्तब्ध होणं.. कदाचित त्यावेळी तिच्याही नकळत त्या ता-यांचं नीरव-आत्ममग्न गाणंच ती ऐकत असेल.., त्या स्तब्धतेच्या ग्लानीतच ती नकळतपणे आश्चर्यचकीतंही झाली असेल.., वा आत्यंतिक नवलाईचीच ती स्तिमितता-स्तब्धता असेल.. 
...
  
' लखलखत्या असंख्य चांदण्या अवघ्या आभाळभर
आणि असंख्य प्रतिबिंबांची हृदयस्थ प्रवाहात थरथर
अवघे तारांगण अलगद खाली उतरलेले
आणि प्रत्येक चांदणीत माझेच मन मोहरलेले

मी आभाळ, मी चांदणी, मीच अनन्त अवकाश
मी तुफान वादळवारा, मीच हलका निःश्वास

अनन्त युगे ओलांडून झालेली मी आरपार
अनुभवलाच नव्हता कधी असा असीम विस्तार '
[ कविता- लखलखत्या असंख्य चांदण्या ]
  आभाळ, रात्रीचं त्यात फुललेलं शांत चादणं- माडीतून दिसणा-या या निसर्गप्रतिमांशी एकरूप झाल्यावर नि त्यातून होणा-या कुठल्याश्या अनुभूतीनेच कवयित्री त्या समयी स्तिमित झाली असेल.. त्यावेळची तिची स्तब्धता म्हणजे स्वतःच्याच अगोचर अस्तित्वाची तिला झालेली अंतस्थ अनुभूती असेल..
...
   अशा प्रकारे वरील दोन्ही कवितांचं अनुभवविश्व जरी भिन्न असलं तरी कवयित्रीच्या मनातला त्यांचा दृश्यसंदर्भ हा कदाचित एकच असावा. मनात खोलवर रुजलेल्या या दृश्यरुपी आठवणीचा सुप्त प्रभावच शांताबाईंच्या कवितांमधून, त्यातील काव्यप्रतिमांमधून नि त्यांच्या काव्यभाषेतून सशब्द झाला असावा. वा लेखनसमयीच्या त्यांच्या मनःपटलावर तो दृश्यसंदर्भ अवतरलाही असेल. मनाच्या खोल तळ्यातून ते चांदणं अवचित झिरपलंही असेल.. मला मात्र या चांदण्याने फारंच मोहीत केलंय, हे खरं!..
...

47 comments:

  1. सुंदर...👌🏻🙂

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच शब्दांमध्ये मग्न होण्यास भाग पाडणारा लेख ,अप्रतिम !!

    ReplyDelete
  3. चांगलं लिहिलंय. रसग्रहण छान आहे.

    मात्र मला पहिल्या परिच्छेदातील 'केवळ वाचनात एक प्रकारचा रुक्षपणाच अधिक असतो' हे विधान पटले नाही.
    कारण असे की रुक्षता वा रसमयता ही क्रियेत नसून कर्त्याच्या मनोभूमिकेत असते. म्हणजेच वाचन रुक्ष वा रसाळ वाटणे हा वैयक्तिक अनुभवाचा भाग आहे, वाचन ह्या क्रियेचा अंगभूत गुणधर्म नव्हे.

    ReplyDelete
    Replies
    1. 'केवळ वाचन' या शब्दाकडे मी वेगळ्या अर्थदृष्टीने पाहते. पण माझ्या वैयक्तिक अर्थसंदर्भाचं generalized statement करणं बरोबर नाही. कारण प्रत्येकाचा स्वतःचा म्हणून दृष्टीकोन असतो- स्वतंत्र मत असतं. मला नक्कीचं पटलं तुमचं म्हणणं.. मनापासून धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी😊🙏

      Delete
  4. शांताबाईंच्या कविता खरे तर आम्ही 'वाचत'च होतो. त्यांच्या कविता अनुभवणं काय असतं आणि त्यातला आनंद काय असतो हे या लेखाने लक्षात आणून दिलं. खूप छान लिहलंस. विशेष सांगावसं वाटतंय ते म्हणजे तू जपलेलं मराठी भाषेचं मराठीपण.अभिनंदन.

    ReplyDelete
  5. खुपच छान लिखाण..सुंदर रसग्रहण

    ReplyDelete
  6. Satish Deshpande, kalyan18 April 2020 at 21:22

    खूप छान. शांताबाईंच्या मनातील तरलता तू ओळखली हे निश्चित .
    अभिनंदन

    ReplyDelete
  7. अप्रतिम

    ReplyDelete
  8. स्वगत. .. चारुश्रीने शांतपणे ...सहज.. अलगद..लिलया..समजून..उमजून...केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद.
    चारुश्री तुझ्या ब्लागच मनापासून स्वागत.
    शशिकांत नाटेकर... डोंबिवली.

    ReplyDelete
  9. खुपच छान रसग्रहण 👍👌🌹

    ReplyDelete
  10. शहरातल्या सगळ्या धकाधकीत हे चांदणं कुठेतरी हरवलंय. प्रत्यक्ष डोळ्यांनाच काय पण मनामधेही धूसर झालेलं हे चांदणं, तुझ्या लेखाच्या निमित्ताने मन:पटलावर नकळतपणे तरळून गेलं. या अनुभवाबद्दल धन्यवाद. तुझ्या लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त कायम राहो. हीच शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद😊🙏

      Delete
  11. खूप अभ्यासपूर्ण चांगलं रसग्रहण,तुझी लेखन शैली पण छान,चा

    ReplyDelete
  12. चारूता सुंदर लिहिलंय स तू.शानताबाईंचे नाव ऐकले की मनात एक आल्हाद उमटतो.
    त्यांच्या बालकविता देखील सुंदर आहेत.माझ्या लेकीला मी शिकवलेल्या होत्या , अजूनही तिला पाठ आहेत इतक्या त्या नादमय आहेत.
    अंजीर पिकला टंच टपोरा
    चवही त्याची गोड किती
    उंबर करते ऐट उगा पण
    फीकेच अंजीरा पुढती.


    ReplyDelete
    Replies
    1. वा!!!.. शांताबाईंचं मोठेपण हे अद्वितिय आहे.😊😊

      Delete
  13. खूपच छान चारूश्री
    सदैव लिहीत रहा,

    ReplyDelete
  14. खूपच छान चारूश्री
    सदैव लिहीत रहा,

    ReplyDelete
  15. khup chaaan lihila ahes chrushree.
    keep writing......:)

    ReplyDelete
  16. khup mast charushree keep it up...

    ReplyDelete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...