... श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येते सरसर शिरवे,
क्षणांत फिरुनी ऊन पडे...
पूर्ण कविता जरी पाठ नसली
तरी दाटून आलेलं आभाळ पाहताच कवितेच्या या पहिल्या दोन ओळी आपसूकच ओठांना
स्फूर्तात. वर्षाऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की, मन कसं अगदी चिंब पावसाळी होऊन
जातं.. गहिवरल्या आभाळाकडे पाहताच पाण्याचा इवलास्सा टिपूस पडण्याचा काय तो अवकाश;
श्वासांनी तर आधीच ओल्या मातीचा दरवळ हुंगलेला असतो.. असं हे वेडस्सं पावसाळी
मन...
पाऊस म्हणजे अनेकांच्या
आयुष्याचा अविभाज्य भाग. कधी तो नव्या आठवणी देऊन जातो; तर कधी जुन्याच आठवणींना
पुन्हा नव्याने उजाळा देतो. पण काही ना काही देऊन जातोच हा ‘जलद’.. त्याच्या प्रवासात
तो स्वतः रिता होतो; मात्र आपली ओंजळ काठोकाठ भरून पावते. त्याचं रितेपण
अनेकांच्या खातेवहीत ‘जमा’ अशी नोंद करून जातं...
... आकाशात काहीश्या
काळ्या-सावल्या काय पसरल्या; विचारांची तर राजधानी एक्स्प्रेसच सुरु झाली की!..
त्या भरधाव वेगातच तिने एक वळण घेतलं., फारच सहजतेने.. पण तिची गतीच काहीशी
मंदावली नि काही क्षण रेंगाळलीच ती तिथे!.. माझं बालपण असावं बहुदा...
जिथे पाऊस म्हणजे केवळ मज्जा.. आणि या मजेचा
मोठा भाग म्हणजे ‘शाळेला मिळालेली सुट्टी’... जिथे रस्त्यावर तुडुंब भरलेल्या
पाण्यातून सुस्साट वेगाने एखादी गाडी जाताना तिचं पाणी उडवून जाणं, यात एक अजबच
आनंद व्हायचा! एखादा पराक्रम गाजवल्यासारखाच जल्लोष असायचा त्यात!! गुडघ्याभर
पाण्यातून मुद्दाम जोरजोरात पाय आपटत चालणं, सोबत कुणीही असो; त्यांच्यावर पाणी
उडवणं, मग सोबत आई असल्यास तिने जोरदार धपाटा जरी दिला; तरी संधी मिळता
पुन्हा-पुन्हा तीच खोड काढणं... .. आपसूकच मी लहान होऊन गेले...
- सध्या व्हॉटस्अॅपवर एक पोस्ट भलतीच व्हायरल
झालीये- ‘काल मी पावसाला विचारलं तुझं वय काय?’-
... मध्यंतरी राजकीय ते व्यक्तिशः सर्वच पातळ्यांवर निराशेच्या-दुःखाच्या अतीव
झळा पोहचविणा-या प्रचंड दुष्काळानंतर त्या वर्षीच्या जून-ऑगस्टदरम्यान जो काही
मुसळधार पाऊस पडला त्याला तोडच नव्हती. अचंबा वाटणयाइतपत त्याचं ते अविरत कोसळणं
होतं! तेव्हा एक दिवस आई अगदी वैतागून म्हणाली- ‘आज नको रे बाबा पाऊस पडायला. साधं
आभाळ जरी आलं, तरी बाहेर पडायलाही अगदी नको वाटतं. आणि नुसतं घरी बसूनही कंटाळा
येतो’. .. तिच्या जागी आजोबा असते तर ते- ‘छेss! पुरेच झाला आता हा पाऊस!! सोसवत
नाही गं या वयात’.., असंच काहीसं म्हणाले असते...
- ‘मंद मंद तुज वाहुन नेइल
वारा जेव्हा अपुल्यासंगे.,
डावें घालिल सखा जिवाचा
चातक गाइल अति अनुरागें...
तुझ्या प्रयाणा मार्ग
सोयिचा
अतां सांगतो ऐक,घना रे.,
श्रवणयोग्य संदेश मागुती
कथितों
तोही ऐकुन घे, रे’ –
... दहावीत शंभर मार्काच्या संस्कृतच्या अभ्यासक्रमात असलेलं महाकवि
कालिदासाचं ‘मेघदूत’; ज्याचा शांता शेळके यांनी मराठीतून केलेला हा अनुवाद तर
अप्रतिमच! आमच्या संस्कृत शिक्षिका- केतकर मॅडम यांचं शिकवणंही अत्यंत भावपूर्ण..,
विषयाला साजेसं!!
नववी-दहावीच्या वयातच साधारणतः होणारी
शारीरिक-मानसिक स्थित्यंतरं, आपल्याला स्वतःतलाच जाणवू लागलेला नवखेपणा आणि
त्याचवेळी भर पावसाळी वातावरणात शिकवलं गेलेलं कालिदासाचं मेघदूत... मग तेव्हा
यक्ष आणि त्याच्या पत्नीतला विरह, या ओल्याचिंब ऋतूतच अधिक तीव्रतेने उफाळून
येणारी त्यांच्यातली पुनर्मिलनाची ओढ.., नववी-दहावीच्या त्या नवसंवेदित मनांमध्ये
या उत्कट आणि तितक्याच तरल भावना आपसूकच रुंजी घालू लागतात. आणि आपणही त्या
काव्याचाच एक भाग बनून जातो!.., मग तेव्हा खिडकीतून
दाटून आलेल्या त्या कृष्णमेघांकडे बघितल्यावर उगाच उदास होणारं आपलं मन., आणि
त्याचक्षणी ते मळभ दूर सारून रिमझिम बरसणारा पाऊस.. अशा वेळी त्यातली एखादी सर जरी
आपण झेलली वा तिचा शिडकावा जरी आपल्यावर झाला तरी अंतर्यामी निर्माण होणारा एक
वेगळाच आनंद.., फारच हवाहवासा वाटतो तो क्षण... त्यावेळी पाऊस काहीसा औरच भासतो.
त्या इवल्याश्या सरीनेदेखील अगदी चिंब झाल्यासारखं होतं...
- त्या व्हॉटस्अॅप
पोस्टमध्ये पावसाने त्याला विचारलेल्या त्या एकाच प्रश्नावर अनेक उत्तरं दिली.
शेवटी स्मितहास्य देऊन तो म्हणाला, ‘पाऊस तू जसा अनुभवशील तेच माझं वय’-
... किती अजब आहे ना हे सगळं! म्हणजे, पाऊस सगळीकडे
सारखाच असतो; प्रत्येकाचं त्या-त्या क्षणांतलं भिजणं मात्र वेगळं असतं...
कधी-कधी
वाटतं पाऊस-काळ आणि आपण, आपल्या तिघांतही एक नातंय. म्हणजे पाऊस आहे तसाच राहतो,
काळ सतत पुढे जातो आणि आपण.., आपण काळासोबत जाताना प्रवास मात्र पावसाच्या
परिघातूनच करतो. त्या परिघातून फिरताना आपल्याला त्याची विविध रुपं दिसतात.., जसं
की, पाऊस म्हणजे कधी मज्जा, कधी प्रेमातला बहर- तर कधी विरहातलं दुःख, कधी निर्मळ
आनंद- तर कधी वेदनादायी यातना.., आणि बरंच काही!... पण खरं तर ती आपलीच मानसिक
स्थित्यंतरं असतात- पुढे जाणारा काळ आणि स्तब्ध पाऊस यांतून निर्माण होणारी...
... आता काय म्हणावं बरं यांस?.., वेडंस्सं ते
पावसाळी मन!! अजून काय?...
-चारुश्री वझे (पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-लोकप्रभा)
Excellent...
ReplyDeleteBeautifully explained
Thanq so much
ReplyDeleteसुजाण संवेदना ☺️👌👌
ReplyDeleteThanq Dada😊
Delete