Tuesday, 27 June 2017

ती...

मेन डोअर बंद करून ती खोलीतल्या आपल्या बाळाच्या पाळण्याजवळ येते. बाळ शांतपणे झोपलंय.. पाळण्यातली त्याची ती छोटाश्शी मुद्रा त्यावेळी अधिकच लोभसवाणी दिसत होती. मग तिलाही राहवलं नाही. हळुवारपणे तिने आपली तर्जनी त्याच्या कपाळापासून नाकापर्यंत फिरवली. आणि मग स्वतःशीच खुद्कन् हसली. तर्जनी फिरवताना तिला झालेला तो नाजूक-मुलायम स्पर्श.. जगातली कित्ती गोडुश्शी निर्मिती आपण केलीये!.., हा आनंद तिच्या त्या लाघवी हास्यात होता..
.. तिचं लक्ष मग बाजूच्या शोकेसमध्ये एका खणात ठेवलेल्या तिच्या मोबाईलकडे गेलं. शक्य तेवढ्या दबक्या पावलांनी तिथे जात ती तो मोबाईल उचलते नि दरवाजाच्या दिशेने जाताना टाच वर करून पाळण्यात डोकावते. बाळ शांतपणे झोपलेलं असतं. मग सुटकेचा निःश्वास सोडून ती हळूच खोलीबाहेर येते नि दार लोटून घेते. हॉलमधल्या सोफ्यावर बसून ती मोबाईलमधली लेटेस्ट व्हिडिओ फाईल उघडते. आणि व्हिडिओ सुरु होतो..
- ती नुकतीच बाळंतीण झालीये. अद्याप शुद्ध न आल्याने ती निपचित पडून आहे. मग कॅमेरा तिच्यावरून हलवला जातो. आणि तिच्या उजव्या बाजूला पाच-सहा जणांच्या घोळक्यावर फोकस होतो. ती मंडळी कशालातरी वेटोळा घालून कमरेत वाकलेली असतात. कॅमेरा हळुहळू त्यांच्या जवळ जातो. मग त्यातल्या दोघांच्यामधून वाट काढत त्यांना बाजूला सारतो.., हाss!! अय्या!! हा तर बाळाचा पाळणा!! ते नुकतंच जन्मलेलं इवलुस्सं बाळ.. कित्ती गोड!!.. झूम करून कॅमेरा त्याच्यावर फोकस होतो. ..ते रडतंय.. कॅमेरा काही काळ त्याच्यावरंच स्थिर.. मग तो हलवला जातो आजुबाजुच्या मंडळींवर. त्यांचे चेहरे मात्र हास्याने आनंदून गेलेले असतात. कारण ती.., कुणाचीतरी सून, कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बहीण; तर कुणाची बायको.., आता आई झालीये. आणि अशा तिच्या नवजात बाळाचा या जगातला पहिलाच टाहो ना! -
.. हे सगळं शूटींग ती मोबाईलवर पाहत होती. पण मधूनच तिने ते बॅकवर्ड केलं. झूम करत कॅमेराचा फोकस जिथे बाळावर होतो ना तिथवर नेऊन तिने तो व्हिडिओ पॉज केला. मग कानावरले केस मागे सारत व्यवस्थित बांधले; नि व्हिडिओ 'स्टार्ट' करून लगेचच मोबाईल कानाजवळ नेला. ..पण.., अर्धा-पाऊण मिनिट निघूनही जातो.. कानापासून दूर नेत ती मोबाईलची स्क्रीन पुन्हा आपल्यासमोर धरते, तोवर व्हिडिओही पुढे गेलेला असतो. तेव्हा त्यात हास्याने आनंदून गेलेले ते चेहरे दिसत असतात. ..ती मात्र काहीशी निराश होते...
.. अचानक तिची नजर समोरच्या खिडकीत जाते. कुणाचीतरी वरात तिथून चाल्लेली. काही बायका आणि पुरूषमंडळी फारच बेफाम नाचत होती. त्यांचा तो हर्षोल्हास पाहून तिच्याही निराश चेह-यावर नकळतपणे स्मित उमटलं. मोबाईल बाजूला ठेवत ती खिडकीपाशी आली. ..आता मात्र ते दृश्य आणखीनच विस्तारलेलं. उड्या-कम-नाच करणा-या त्या मंडळींसोबतच तिला त्यांच्यामागे घोड्यावर स्वार झालेल्या नि मुंडावळ्यांमध्ये चेहरा पूर्णतः झाकलेल्या त्या नवरदेवाचंही दर्शन झालं. ..त्याच्यापुढ्यातला लहान मुलगाही बसल्याजागी नाचतोय.., त्याच्या आजुबाजुने चालणारी मुलं- बहुदा त्याचे मित्र असावेत- त्याची थट्टा मस्करी करत येणा-या-जाणा-या आणि कुतूहलाने ती वरात बघणा-या इतर पादचा-यांकडे माना वर करून फारच ऐटीत चालताहेत. ..ते पाहून तिला हसूच आलं. ..मग तिची नजर नवरदेवापुढ्यातल्या वादक मंडळींवर गेली. ढोल-ताशे-तुतारी-पिपाणी नि अजूनही काहीबाही होतं. ती मग त्यांच्याकडेच पाहत बसते. तिचं लक्ष मग तुतारी फुंकणा-या त्या चेह-यांकडे, ढोलताशे वाजविणा-या त्या हातांवर जातं. .. त्या हातांची भराभ्भर वाढत चाल्लेली लय, त्यासोबत पिपाणी फुंकणा-यांच्या गालांचा होत असलेला मोठाल्ला फुगा नि त्यांच्या पुढ्यातल्या मंडळींचं अधिकच बेभान होऊन नाचणं.. .. तिची नजर क्रमशः त्या हातांच्या वाढणा-या लयीवर, गालांच्या होणा-या मोठाल्ल्या फुग्यावर नि वेगाने थिरकणा-या त्या पायांवरून भिरभिरायला लागते.. हे सगळं जसजसं वाढायला लागतं, तिची नजर आणिकच अस्थिर होते. ..मग हळुहळू भुवयाही काहीश्या वक्र होतात. ..त्या हातांची वाढत चाल्लेली लय, त्या गालांचा अधिकाधिक होणारा मोठाल्ला फुगा, नि त्यावर त्या मंडळींचे काहीच्च्या काही वेगाने थिरकत चाल्लेले पाय.. काहीशी अनामिक भीती तिच्या संपूर्ण चेह-यावर पसरते. त्या वाढत जाणा-या वेगाबरोबर-लयीबरोबर ती इतकी वाढते.., इतकीss ..,की, एका क्षणी ती धावच घेते.. माहित नाही नक्की काय; पण कुठल्याश्यातरी अंतःप्रेरणेने ती धाव घेते, आपल्या बाळाच्या खोलीकडे.. खोलीचं दार उघडून ती पाळण्यापाशी येते आणि बघते तर.., तिचं बाळ अक्षरशः कळवळत असतं. तत्क्षणी ती बाळाला उचलते, आपल्या कुशीत घेते, घट्ट धरते... असेच काही क्षण जातात...
... त्या बिचा-याची साखरझोप वरातीच्या दणदणाटामुळे उडून जाते. पण जसजसा तो आवाज वाढत जातो, त्या तान्ह्या जिवाला तो गोंगाट- तो कोलाहल असह्य होतो. ..नि एका मर्यादेपलीकडे त्या आजुबाजुचं सगळंच असुरक्षित वाटू लागतं. तो रडू लागतो..,जोरजोरात.. जागच्या जागी जिवाच्या आकांताने वळवळ करतो. परंतु त्याच्या या सादेला कुणाचाच प्रतिसाद नाही म्हटल्यावर तो आणखीनच बिथरतो.. कारण, ते सगळंच त्याच्यासाठी भयाण असतं...
पण.., जसा त्याला आईच्या हाताचा स्पर्श होतो.., जसा तो तिच्या कुशीत शिरतो.. व्यक्त होता येत नसलं तरी भावना-संवेदना या जन्मतःच आपल्या सोबत असतात.. कारण तिच्या ऊबदार स्पर्शाने, तिच्या मायेच्या कुशीत तो आपोआपच आश्वस्त होतो. ..काही क्षण असेच निघून जातात. तोवर वरातही घरावरून पुढे गेलेली असते.
.. मिठी सैल करून ती मग बाळाला आपल्यासमोर धरते. ..आजुबाजूने लपेटलेल्या तिच्या हातांवर ते तान्हुलं शरीर अलवार विसावतं.., इवलेस्से ते पाणावलेले डोळे आईला पाहून काहीश्या वेगळ्याच आनंदात चमकू लागतात.., छोट्याश्श्या गोल-गोल वाटीएवढ्या चेह-यावरचं हसु जणु मणभर पसरतं..,नि वीतभरही नसलेले त्याचे ते नाजूक वेलींसारखे पाय आईच्या नाकाशी, गालांशी, ओठांशी खेळायला लागतात..
.. आपल्या बाळाचं हे गोजिरवाणं रुपडं पाहून ती हरखूनच जाते. तिच्या डोळ्यांत आपसूकच पाणी तरळतं. नि
अश्रूंची संतत धारच सुरु होते. ते अश्रू.. बरंच काही असतं त्यात.. अनेकानेक व्यमिश्र भावनांनी ओघळत असतात ते!.. ..कारण.., तिने आपल्या बाळाचं पहिलं रडणं ऐकलेलं नसतं, नाही त्याच्या या वेदना-त्याचं कळवळणं तिला ऐकू येत.., आणि पुढेही ती काहीच ऐकू शकणार नसते. ..ना त्याचे पहिले-वहिले शब्द, त्याचे निरागस-भाबडे बोल, त्याचं तिच्याशी बोलणं..,ना ही त्याने तिला दिलेली हाक.. तिला माहितीये, आपण हे काहीच ऐकू शकत नाही, ऐकू शकणारही नाही.. पण.., आपला स्पर्श, त्याच्यावरचं आपलं जिवापाड प्रेम; नि आपली मायेची कुशी, हे त्याच्यासाठीचं जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण आहे, हे मात्र तिला पक्क ठाऊक असतं. कारण, 'आई' ही तर शेवटी ज्ञानेंद्रियांपल्याडचंच जाणणारी असते ना!..
.. मग त्याचे असंख्य गोड-गोड पापे घेत तिने, तिच्या साईन लॅंग्वेजमध्ये त्याला आय.., लव्ह.., यु.., सोsssssss.., मच... .., असं म्हटलं. त्यानेही, त्यावर छानसे डोळे मिचकावले. ..बहुदा त्यालाही आता तिची 'मुकीभाषा' समजायला लागली असावी.. आणि 'ती'सुद्धा!...

  

4 comments:

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...