पडदा उघडतो. एक स्त्री विंगेतून प्रवेश करते. आणि रंगमंचाच्या मधोमध असलेल्या
तुळशी वृंदावनापाशी येते. तोवर तिच्यावर केंद्रीत झालेला प्रकाशझोत पूर्णतः प्रखर
होतो... पाचवारी पातळ, गळ्यातील काळ्यामण्यांची पोत नि लटकता चष्मा, कपाळावरचं
छोटस्सं गोल-गोल कुंकू नि डोक्यावरचे पिकलेले केस, गालावरचं मंदसं स्मित नि काहीसं
कुबड असलेली ती स्त्री साधारण ६०-६५ वर्षांची गृहिणी व प्रेमळ आजी असल्याचा पहिला
अंदाज प्रेक्षक येथे बांधतो. तिच्या हातातील उद्बत्ती, एकंदर प्रकाशयोजना आणि
वातावरण निर्मिती करणारं पार्श्वसंगीत या गोष्टी दीर्घांकातील सायंकाळ दर्शवितात.
तुळशीला ओवाळत जसजशी ही आजी पुढे येते तसतशी रंगमंचवरील प्रत्येक वस्तू दृश्यमान
होते. उजव्या बाजूला कपाट व त्यावरची तस्बीर, मधोमध- तुळशी वृंदावनाच्या पुढे एक
सोफा व त्याच्यापुढील टेबल आणि डाव्या बाजूला झाकलेली एक वस्तू. (त्या वस्तूतच पुढचं
नाटक दडलेलं आहे.) अखेर सारा रंगमंच सायंकाळच्या वातावरणासह प्रेक्षकांसमोर सज्ज
होतो. (या सगळ्यात दीड-दोन मिनिटे निघून जातात.) आणि आजीचं स्वगत सुरु होतं. अगदी
सहजगत्या...
‘तालीम’ या नाट्यसंस्थेद्वारे साकारलेला आणि डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या
कथेवर आधरीत पै पैशाची गोष्ट हा एकपात्री दीर्घांक असून ज्येष्ठ अभिनेत्री इला
भाटे या प्रमुख भूमिकेत आहे. याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन विपुल महागांवकर यांनी
केले आहे.
... आजीचं अनौपचारिक स्वगत सुरु होतं. जान्हवी- तिचं नाव. (कुणाच्यातरी
संदर्भातून ती स्वतःच्या नावाचा उल्लेख करते.) बोलता-बोलता सांगून जावं तशी ही
‘जान्हवी आजी’ तिच्या कुटुंबियांची जुजबी ओळख प्रेक्षकांना करुन देते. आणि एक
संदर्भ घेऊन डाव्या बाजूच्या झाकलेल्या वस्तुजवळ जाते. व प्रेक्षकांसमोर ती उघड
करते. तोच क्षण या दीर्घांकाची ख-या अर्थाने नांदी असल्याचे म्हणावयास काही हरकत
नाही.
ती एक ट्रंक आहे. त्यातील वस्तू अनेकविध अदृश्य पात्रांच्या व्यक्तिरेखेसह
बाहेर येतात. त्या वस्तुंमागे कुणाच्या ना कुणाच्यातरी आठवणींची नाळ जोडली आहे.
त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर पात्रांचाही मग त्यात संदर्भ येतो. हा संदर्भ
जान्हवी आजीच्या बोलण्यातून प्रेक्षकांना तत्काळ कळतो. प्रत्येकाची साधारण
व्यक्तिरेखा ही त्यांच्या बोलण्या-चालण्याच्या धाटणीनुसार प्रेक्षकांसमोर उभी
राहते. ‘जान्हवी आजी’ अर्थात इला भाटे यांनी या विविध व्यक्तिरेखा वकुबीने सादर
केल्या आहेत. ‘जान्हवी’ या प्रमुख पात्राव्यतिरिक्त इलाताईंनी जवळपास नऊ-दहा
व्यक्तिछटा आपल्या अभिनयातून जीवंत केल्या आहेत.
त्या ट्रंकेतील वस्तुंचा त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी व या
दीर्घांकानुरुप असलेल्या पै-पैशाच्या आर्थिक गणितांशी आपसूकच संबंध येतो. जान्हवी
आजी, तिची आई, जान्हवी आजीची मुलं-नातवंड अशा या चार पिढ्या, त्यांतले परस्पर बंध
व त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि मुख्य म्हणजे या पिढ्यांतील आर्थिक तफावत ही
प्रत्येक वस्तुगणिक जान्हवी आजीच्या स्वगतातून आपल्यासमोर येते. इलाताईंचा
रंगमंचावरील सहज वावर व सकस अभिनय यांमुळे जान्हवी आजी व तिच्या सभोवतालच्या
नात्यांतील कंगोरे प्रेक्षकांमोर अत्यंत तरलतेने उलगडतात. या कंगो-यांची गुंफण जरी
प्रेमभावाने विणली गेली असली तरी त्यातील महत्वाचा धागा म्हणजे नात्याची आर्थिक
बाजू! जी कुठेतरी जान्हवी आजीला भेडसावते. त्यामुळे झालेली तिची काहीशी चलबिचल
मनःस्थिती सबंध दीर्घांकात व्यापलेली असून प्रेक्षकाला ती शेवटपर्यंत खिळवून
ठेवते.
पन्नास हजारात परतीच्या तिकीटासह होणारा परदेशी विमान प्रवास, १ हजार १२५
रुपयांत महागातील महाग साडी, ५० रुपयांत भारतीने (आजीच्या मुलीने) तिच्या
मैत्रीणींना दिलेली ‘आइस्क्रीम पार्टी’ आणि फाईव्हस्टार हॉटेलमध्ये कुटुंबातील
सात-आठ सदस्यांच्या जेवणाचं आलेलं बाराशे रुपये इतकं बिल या आर्थिक तपशीलांवरुन
दीर्घांकाचा काळ हा १९९०-९५ सालादरम्यानचा असलेला दिसतो. जागतिकीकरणानंतरचा हा
कालखंड. त्यावेळी नव्याने उदयास आलेला उच्च मध्यम वर्ग. आणि त्यातील प्रस्थापित व
नुकतीच प्रवेश केलेली कुटुंबं. ज्या
कुटुंबात जान्हवी आजीच्या आईच्या काळात महिन्याचा खर्च पन्नास आणे; तिथे स्वतः
जान्हवी आजीच्या काळात तो खर्च पन्नास रुपयांवर पोहोचला होता. या दोन्ही पिढ्यांत
क्रयवस्तुंच्या संकल्पना व गरजा जरी बदलल्या असल्या तरी तरी दोन्ही पिढ्या
हिशेबांस पक्क्या! परंतु आजीनंतरच्या पिढीत हिशेब नाहीच. नुसता खर्चच! शिवाय त्यात
ढब्बू, भोकाचं नाणं, चवली-पावली-पै-आणा ही चलने कालबाह्य झालेली. अशावेळी आपली
मुलं-नातवंड कितीही नाती जपणारी, प्रेमभावाने सर्वांचं करणारी असली तरी बदललेली
आर्थिक गणितं आणि त्यापेक्षाही अंगावर येणारी त्यातील तफावत- जिच्यामुळेच ‘जनरेशन
गॅप’ ही संज्ञा बहुअंशी सार्थ ठरते- अशा अतीव सुखासीनतेच्या अनामिक भयाने
आयुष्याच्या संध्याकाळी जान्हवी आजीचं रुखरुखलेलं, हळवं झालेलं मन अखेरपर्यंत
पै-पैशाची गोष्ट करीत राहतं.