Tuesday, 3 January 2017

नववर्षाभिनंदन

नववर्षाभिनंदन
                                                       (शुभेच्छुक- शाननशोनन)


नमस्कार मंडळी! सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा!!! (त्यासाठीही तीन तारीख उजाडावी लागली! असोत.. क्षमस्व!) आणि मुख्य म्हणजे माझ्या या आधीच्या लेखावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप-खूप मनःपूर्वक धन्यवाद!
...तर या नववर्षाच्या उत्साहपूर्ण शुभेच्छांची देवाण-घेवाण सर्वांनीच आपल्या आप्तस्वकीयांसमवेत आपापल्या परीने, खास शैलीत, ऑनलाईन-बिनलाईन राहून- 'आता इथवर तर आलोय; वाटलच तर पुढे ढकला' अशा स्वरुपातील निरोपांसह (अर्थात Forwarded Messages ने) केली असणार...
... माझ्याही नववर्षाची सुरुवात मामाकडे रंगलेल्या 'नॉट अॅट होम'च्या डावाने झाली. रात्री बाराच्या ठोक्याला  डाव मध्येच थांबवून आम्ही सर्वांना 'Virtual Wish' करु लागलो. ओळखीचे-जवळचे-अधिक जवळचे- सर्वांना शुभेच्छा दिल्या. ... सर्वांना?... खरचं?.. काहीतरी चुकल्यासारखं.., अनावधानाने राहून गेल्यासारखं वाटलं...
... अरे हो! खरचं की!! म्हणता-म्हणता तीन वर्ष झाली की आता!!!... पण जर आज आज्जी असती तर...
हा केवळ विचार मनात आला; आणि तिच्याबद्दल लिहिण्यासाठी हात अधीर झाला...

आज्जी... आज्जीचा केवळ विचार मनात येणं म्हणजेच.., दिवसाची अतिशय सुंदर सुरुवात, दुपारच्या जेवणानंतरची तृप्त ढेकर आणि रात्रीची मनस्वी शांतता...(व्वा! सॉलिडच भन्नाट वाक्य सुचलं राव! पण खरयं) आज्जी किनई माझा सर्वात आवडता प्राणी! हो प्राणीच!! सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा काहीतरी हटके आणि इंटरेस्टींग अशा ह्युमन्सना जनरली 'अजब प्राणी' असचं म्हणतात. आज्जीही तशीच होती. मुळात 'आज्जी' या प्रवर्गाला साजेशी अशी कुठलीच गुणसूत्रे तिच्यात नव्हती. ना तिने मला कधी गोष्टी सांगितल्या, ना कधी ती माझ्यासाठी अंगाई गीत गायली. 'म्हातारपण अतिशय वाईट हो!' हे तिच्यासमोर तिच्याहूनही लहान आणि नुकत्याच आज्जी झालेल्या बायका म्हणायच्या; पण तिच्या हयातीत चुकूनसुद्धा हे वाक्य मी कधी तिच्या तोंडी ऐकलं नाही. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही, ती एकतर नीट समजावून तरी घ्यावी; नाहीतर 'आपल्याला त्यातलं काही कळत नाही बुवा', हे निदान मान्य तरी करावं. उग्गाच आपली अक्कल पाजळू नये, असा तिचा शिक्षकी खाक्या असल्याने ती रित्सर डॉक्टरांचे सल्ले घ्यायची आणि काटेकोरपणे औषधांचं वेळापत्रक आणि पथ्ये सांभाळायची. ना तिचा औषधांचा 'बटवा' होता; ना त्यामुळे कधी 'अहो, तुम्ही हे औषध घ्या, शेखर (माझे बाबा) तू हे घे रे, चारुश्री-अश्विनी तुम्ही हे घ्या गं' असा 'बटवारा' झाला. (व्वा! क्या बात है! 'बटवा'- 'बटवारा' जमतयं की!)
...तर अशी ही माझी आज्जी. ह्या तर काहीच नाही! अजूनही ब-याच गोष्टी होत्या, ज्या तिला आज्जी म्हणून अजिबातच 'डिफाईन' करायच्या नाहीत. (कवळ्या काढल्यावर मात्र ती गोडु-गोडुशी आज्जीबाईच दिसायची.)

आज्जी... सहावारी साडीतली गव्हाळ रंगाची, काहीश्या उभट आणि लंबगोलाकार चेह-याची, बसक्या अंगाची नि सदान्-कदा डोळ्यांवर चष्मा असलेली नकट्या नाकाची... वर्णन करायचच झालं तर हे असच काहीसं!  पण हे फारच वरवरचं... तिचं अंतरंग मात्र खूपच निराळं होतं... Quite interesting! उदाहरण द्यायचच झालं तर-
... तिला आजोबांविषयी नितान्त आदर. पण तिने कधीच वड पुजला नाही. कधीकधी तर ती मला असही म्हणायची, 'लग्न म्हणजेच सगळं काही नसतं. त्यापेक्षाही स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वत्व जपणं महत्त्वाचं. त्या लता दीदींकडे बघ'.., मीही त्यावर होकारार्थी मान हलवायचे. म्हणजे आमच्याकडे गाण्याचं वातावरण असूनही आज्जीने गाण्यासाठी कधी लता दीदींचा आदर्श घे असं सांगितलं नाही. वास्तविक लता-आशा वा माणिक वर्मा या तत्सम गानविदुषींपेक्षाही तिला वैजयंती माला आणि हेलन आवडायची. म्हणजे नाट्यक्षेत्रात ज्यांच्या नावे प्रदान केला जाणारा पुरस्कार शिरसावंद्य मानला जातो अशा नटवर्य मामा पेंड्से यांची कन्या आणि पं.भीमसेन जोशी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आजन्म संगीत-साधना करणारे दादा वझे यांची कुलवधू जेव्हा त्यांच्याच समक्ष 'मला हेलन अतिशय आवडते. अजूनही काय 'ग्रेसफुल' आहे ती', हे मला अगदी बिनदिक्कत सांगायची ना,.. तेव्हा जामच भारी वाटायचं राव! उग्गाच नाही ती माझा 'आवडता प्राणी'! अर्थात् यावर कुणाचाच कधी आक्षेप नसला तरी कन्या-कुलवधूपेक्षाही तिचा स्वतःचा शिक्षकी पेशाच तिला या अभिव्यक्ततेची मुभा देत असावा....
... आज्जी वेळेच्या बाबतीत इतकी काटेकोर होती की, त्याविषयी 'अस्मादिकांनी न वदलेलेच योग्य'! म्हणजे सकाळी उठलं की पहिले घर झाडणं, मग देवासमोरची रांगोळी, आंघोळ आटोपून देवाची पूजा, न्याहारी, दुपारचं जेवण, त्यानंतर अकरा वेळा ||श्री गणेशाय नमः|| वहीत लिहिणं (आज्जीची जणु ती रोजनिशीच होती), मग वामकुक्षी, संध्याकाळचा गणपती मंदीरावरुन ठरलेला फेरफटका आणि बुधवार असला की संध्याकाळचा भजनाचा क्लास. रिकाम्या वेळेत विणकाम करणं, ताक केलं की त्यातलं थोडं सुमन आत्यासाठी आठवणीने एका बाटलीत काढून ठेवणं, भजनांचा रियाज, मनःशक्ती-विवेक वाचणं, एखाद्या खास दिवसाचा बेत आखणं.., काही ना काही सुरुच असायचं.
... आज्जीच्या वागण्यात कमालीची शिस्तबद्धता, बोलणं स्थिर आणि प्रगल्भ, विचार तत्त्वनिष्ठ असले तरी त्यात काही ना काही नाविन्य आणि एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता असायची.स्वभाव कणखर आणि प्रॅक्टीकल असला तरी त्याहूनही ती संवेदनशील होती. म्हणजे बाबांचं गाणं ऐकताना किंवा माझे लेख-कविता वाचताना तिला आनंदाश्रू आवरायचेच नाहीत. आणि तिनेही कधी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आजोबांबद्दल बोलताना तर... इतकी हळवी व्हायची... एकदा तर मला म्हणालीसुद्धा- आमचं शेवटचच बोलणं होतं ते- 'अजून कुणालाच सांगितलं नाहीये. फक्त तुलाच सांगते बरं.., पुढचा जन्म असतो-नसतो माहित नाही. पण मला जर का पुढचा जन्म मिळाला; आणि तोही एक स्त्री म्हणून तर त्या जन्मीही मला पती म्हणून तुझेच आजोबा हवेत बरं'... आणि ती थांबली... तिचं स्वगत पूर्ण झालं असावं...
.
.
.
.
.
....hhhhh.... Sounds so emotional ना?
तर मंडळी, अशी ही माझी आज्जी. कुछ खट्टी-कुछ मिठी! पण 'लय भारी'!!!
So, my dear आज्जी... नववर्षाच्या तुला खूप-खूप शुभेच्छा! आणि I'm dam sure, की स्वर्गातल्या गंधर्वांना तू बाबांच्या गायकीबद्दल आणि रंभा-उर्वशींना हेलनच्या नृत्यकौशल्याबद्दलच सांगत असणार!..
                                                                                                                        -तुझीच
                                                                                                                     शाननशोनन

16 comments:

  1. Ashi aaji kharch sarvana milu de ...aaji ani natich ek vegle नाते baghyla milale

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर ! Feeling emotional.
    आज्जी आणि नातीचं भावनिक नातं. आज्जी म्हणजे संस्काराची खान असते.ते प्रत्येकालाचं मिळतं नसते. ज्याला मिळालं त्याचं नशीब. तुला ते मिळालं.पण लेखातील भावना वाचून माझ्या आज्जीची आठवण झाली...!

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर ! Feeling emotional.
    आज्जी आणि नातीचं भावनिक नातं. आज्जी म्हणजे संस्काराची खान असते.ते प्रत्येकालाचं मिळतं नसते. ज्याला मिळालं त्याचं नशीब. तुला ते मिळालं.पण लेखातील भावना वाचून माझ्या आज्जीची आठवण झाली...!

    ReplyDelete
  4. You are lucky to have such lovely grandmother. Preserve these memories

    ReplyDelete
  5. You are lucky that you had such a lovely grandmother. Preserve these memories for posterity

    ReplyDelete
  6. अरे कसल लिहिलय यार तू..मी आजीला फक्त फोटोत पाहिलय..पण आता तू छान ओळख करून दिलीस. .thank you..आणि आजीला वंदन
    . Happy new year too..

    ReplyDelete
  7. चारुश्री ~ तू अप्रतीम लिहिते आहेस. असं वाटतं की, As if..., तू स्वतः आमच्याशी प्रत्यक्ष बोलते आहे. खूप आवडली मला तुझी लिहिण्याची style. व्व्वा...! ~ तू "कोणा सारखी" ही लिहीत नाहीस. तू फक्त "चारुश्री वझे" सारखी लिहिते आहेस. मी तुझे दोन्ही blog वाचले. फार आनंद वाटला. तुझी सदैव प्रगती होत राहो, आणि तुला सर्वत्र सुयश प्राप्त होत राहो ~ ही परमेश्वरचरणीं प्रार्थना. अनेकोत्तम आशीर्वाद...!!!

    ReplyDelete
  8. चारु अप्रतिम ...
    आजी हे रसायनच अजब असते.
    अशीच छान छान लिहीत रहा .
    समृद्ध होत रहा.

    ReplyDelete
  9. नववर्षाला आजीच्या आठवणीने सुरूवात करावी, यातच सगळे आले की गं.....

    ReplyDelete
  10. The writing is nice,minute details have come up quite good.one can relate to one's grand-mother by reading this.
    God bless u charushree

    ReplyDelete
  11. चारुश्री, खुपच छान लेख ! मी आणि शेखर कॉलेज मधे एकत्र होतो तेव्हा मी तुझ्या आज्जीला बरेच वेळा भेटलो.तुझी लिहिण्याची पद्धत पण खुप वेगळी आहे. अशीच लिहित रहा !!

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. Kya baat hai Charushree....Tablyachya class madhe astanna aaji ani ajobancha barya paiki sahawaas labhlela. Aaj tya aathvani tajya kelyas.

    ReplyDelete

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...