Wednesday, 6 December 2017

आभाळ

आज सक्काळ-सकाळी आभाळ खूपच दाटून आलं. हल्ली त्यालाही काही काळवेळ राहीली नाहीये. म्हणजे डिसेंबरात हवा सर्द होते, वातावरणात धुकं दाटतं, दुपारच्या हवेतही गारवा असतो; पण आकाशात काळे ढग निर्माण होऊन सलग दोन दिवस पाऊस अक्षरशः कोसळावा म्हणजे अजबच प्रकार झाला की! माणूस हा लहरी असतोच.., पण, बहुदा निसर्गही आता माणसाळलेला दिसतोय!.. पण बिचारा सूर्य त्यामुळे झाकोळला गेलेला. आता सूर्यालाही 'बिचारा' म्हणायला लागावं म्हणजे.., म्हणूनच कदाचित ब-याचजणांना त्या आभाळाचं वावगं असतं. आभाळ म्हटलं की अगदी नको-नको होतं त्यांना. पण तिचं तसं नाहीए.
.. 'ती'.., आपल्यासारखीच्चे. पण तिची कधीच तक्रार नसते त्याच्याबद्दल. एरव्ही रस्त्यावर कुठल्याही बाईकवीर-वीरांगनेने जराशी रॉंगसाईडने गाडी घातली रे घातली की हेल्मेटच्या काचेआडून अतिवक्र वळण घेतलेल्या भुवयांखालचे तिचे गुरगुरणारे टप्पोरे डोळे दाटलेल्या त्या आभाळाकडे पाहून साधे कुरकुरतही नाहीत. कुठलाही आवेश न आणता- आवेग न धरता फारच स्तब्धपणे पाहते ती त्या आभाळाकडे. त्यामागचं कारण विचारल्यावर काय तर म्हणे, ते आभाळ तिला संयम शिकवतं. संयम.., आणि आभाळ? असो. ज्याची-त्याची फिलॉसॉफी...
.. आज कधी नव्हे ते तिने स्वतःहून सुट्टी घेतलेली. नाहीतर रोजची तिची धावपळ अशी काही असते, की प्रश्नच पडावा, नक्की कोण कुणाच्या मागे धावतंय? ती घड्याळाच्या काट्यांप्रमाणे धावते की, काटेच 'सलाम मेमसाहब' म्हणत तास-मिनिट-सेकंदाचे ठोके तिच्यासाठी वेळच्यावेळी वाजवतात?!.. पण आज ती घरीच होती. आणि अनायसे आजच तिला संयम शिकविणा-या त्या काळ्याकुट्टं सावल्यांनीही आकाशात गर्दी केली होती. पण आजचं आभाळ तसं अन्प्लिझंटच होतं. आता सरप्राईजेस वगळता अवेळी घडणारी प्रत्येक गोष्ट सुखावहच कशी ठरेल? ती ही काहीशी नाराज झाली खरी. पण वेळ कुठलीही असो, कॉफीच्या भरगच्च मगासह रिकाम्या बाल्कनीतून वर, त्या आभाळाकडे एकटक पाहत बसणं, हा बाईसाहेबांचा मुळातलाच आवडता छंद. ..एरव्ही वेळेचं काटेकोर गणित मांडण्यात तिचा हात कुणीच धरु शकत नाही, हा भाग वेगळा. ..पण काय अजब कॉम्बिनेशन आहे ना!- भरगच्च कॉफीचा मग आणि रिकामी बाल्कनी- एकांत, सोबत एकटेपणा. पण या सा-याला छेद देत हातातली ती वाफाळणारी कॉफी मात्र नकळतच तिच्या श्वासांशी हितगुज करीत होती. बाय द वे, कॉफी आहे म्हटल्यावर तिचे घुटके घेत छानपैकी गुणगुणणं तर आलंच. पण मघाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही आवेश न आणता- आवेग न धरता ती तिच्याच धुंदीत- तिच्याच लयीत गुणगुणु लागली. तिच्या अगदी मनाजवळचं; नव्हे मनातलंच गाणं- 'हंss.. बडेs अच्छेss लगते है.., ये धरतीs ये नदीयॉंss ये रैनाss और..' .. 'काश, हे त्यालाही कळलं असतं तर..' , ती वर पाहून स्वतःशीच पुटपुटली.
.. निसर्ग बहुदा जास्तच माणसाळलेला दिसतोय. कारण, ती अगदीच सहज बोलून गेली.., वर मात्र आभाळंच अधिक दाटून आलं. ..   

Friday, 30 June 2017

पावसाळी मन...


... श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे...

पूर्ण कविता जरी पाठ नसली तरी दाटून आलेलं आभाळ पाहताच कवितेच्या या पहिल्या दोन ओळी आपसूकच ओठांना स्फूर्तात. वर्षाऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की, मन कसं अगदी चिंब पावसाळी होऊन जातं.. गहिवरल्या आभाळाकडे पाहताच पाण्याचा इवलास्सा टिपूस पडण्याचा काय तो अवकाश; श्वासांनी तर आधीच ओल्या मातीचा दरवळ हुंगलेला असतो.. असं हे वेडस्सं पावसाळी मन...

पाऊस म्हणजे अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. कधी तो नव्या आठवणी देऊन जातो; तर कधी जुन्याच आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देतो. पण काही ना काही देऊन जातोच हा ‘जलद’.. त्याच्या प्रवासात तो स्वतः रिता होतो; मात्र आपली ओंजळ काठोकाठ भरून पावते. त्याचं रितेपण अनेकांच्या खातेवहीत ‘जमा’ अशी नोंद करून जातं...

... आकाशात काहीश्या काळ्या-सावल्या काय पसरल्या; विचारांची तर राजधानी एक्स्प्रेसच सुरु झाली की!.. त्या भरधाव वेगातच तिने एक वळण घेतलं., फारच सहजतेने.. पण तिची गतीच काहीशी मंदावली नि काही क्षण रेंगाळलीच ती तिथे!.. माझं बालपण असावं बहुदा...
जिथे पाऊस म्हणजे केवळ मज्जा.. आणि या मजेचा मोठा भाग म्हणजे ‘शाळेला मिळालेली सुट्टी’... जिथे रस्त्यावर तुडुंब भरलेल्या पाण्यातून सुस्साट वेगाने एखादी गाडी जाताना तिचं पाणी उडवून जाणं, यात एक अजबच आनंद व्हायचा! एखादा पराक्रम गाजवल्यासारखाच जल्लोष असायचा त्यात!! गुडघ्याभर पाण्यातून मुद्दाम जोरजोरात पाय आपटत चालणं, सोबत कुणीही असो; त्यांच्यावर पाणी उडवणं, मग सोबत आई असल्यास तिने जोरदार धपाटा जरी दिला; तरी संधी मिळता पुन्हा-पुन्हा तीच खोड काढणं... .. आपसूकच मी लहान होऊन गेले...
-    सध्या व्हॉटस्अॅपवर एक पोस्ट भलतीच व्हायरल झालीये- ‘काल मी पावसाला विचारलं तुझं वय काय?’-

... मध्यंतरी राजकीय ते व्यक्तिशः सर्वच पातळ्यांवर निराशेच्या-दुःखाच्या अतीव झळा पोहचविणा-या प्रचंड दुष्काळानंतर त्या वर्षीच्या जून-ऑगस्टदरम्यान जो काही मुसळधार पाऊस पडला त्याला तोडच नव्हती. अचंबा वाटणयाइतपत त्याचं ते अविरत कोसळणं होतं! तेव्हा एक दिवस आई अगदी वैतागून म्हणाली- ‘आज नको रे बाबा पाऊस पडायला. साधं आभाळ जरी आलं, तरी बाहेर पडायलाही अगदी नको वाटतं. आणि नुसतं घरी बसूनही कंटाळा येतो’. .. तिच्या जागी आजोबा असते तर ते- ‘छेss! पुरेच झाला आता हा पाऊस!! सोसवत नाही गं या वयात’.., असंच काहीसं म्हणाले असते...

-    ‘मंद मंद तुज वाहुन नेइल
वारा जेव्हा अपुल्यासंगे.,
डावें घालिल सखा जिवाचा
चातक गाइल अति अनुरागें...

तुझ्या प्रयाणा मार्ग सोयिचा
अतां सांगतो ऐक,घना रे.,
श्रवणयोग्य संदेश मागुती कथितों
तोही ऐकुन घे, रे’ –

... दहावीत शंभर मार्काच्या संस्कृतच्या अभ्यासक्रमात असलेलं महाकवि कालिदासाचं ‘मेघदूत’; ज्याचा शांता शेळके यांनी मराठीतून केलेला हा अनुवाद तर अप्रतिमच! आमच्या संस्कृत शिक्षिका- केतकर मॅडम यांचं शिकवणंही अत्यंत भावपूर्ण.., विषयाला साजेसं!!
 नववी-दहावीच्या वयातच साधारणतः होणारी शारीरिक-मानसिक स्थित्यंतरं, आपल्याला स्वतःतलाच जाणवू लागलेला नवखेपणा आणि त्याचवेळी भर पावसाळी वातावरणात शिकवलं गेलेलं कालिदासाचं मेघदूत... मग तेव्हा यक्ष आणि त्याच्या पत्नीतला विरह, या ओल्याचिंब ऋतूतच अधिक तीव्रतेने उफाळून येणारी त्यांच्यातली पुनर्मिलनाची ओढ.., नववी-दहावीच्या त्या नवसंवेदित मनांमध्ये या उत्कट आणि तितक्याच तरल भावना आपसूकच रुंजी घालू लागतात. आणि आपणही त्या काव्याचाच एक भाग बनून जातो!.., मग तेव्हा खिडकीतून दाटून आलेल्या त्या कृष्णमेघांकडे बघितल्यावर उगाच उदास होणारं आपलं मन., आणि त्याचक्षणी ते मळभ दूर सारून रिमझिम बरसणारा पाऊस.. अशा वेळी त्यातली एखादी सर जरी आपण झेलली वा तिचा शिडकावा जरी आपल्यावर झाला तरी अंतर्यामी निर्माण होणारा एक वेगळाच आनंद.., फारच हवाहवासा वाटतो तो क्षण... त्यावेळी पाऊस काहीसा औरच भासतो. त्या इवल्याश्या सरीनेदेखील अगदी चिंब झाल्यासारखं होतं...

-    त्या व्हॉटस्अॅप पोस्टमध्ये पावसाने त्याला विचारलेल्या त्या एकाच प्रश्नावर अनेक उत्तरं दिली. शेवटी स्मितहास्य देऊन तो म्हणाला, ‘पाऊस तू जसा अनुभवशील तेच माझं वय’-

... किती अजब आहे ना हे सगळं! म्हणजे, पाऊस सगळीकडे सारखाच असतो; प्रत्येकाचं त्या-त्या क्षणांतलं भिजणं मात्र वेगळं असतं...
 कधी-कधी वाटतं पाऊस-काळ आणि आपण, आपल्या तिघांतही एक नातंय. म्हणजे पाऊस आहे तसाच राहतो, काळ सतत पुढे जातो आणि आपण.., आपण काळासोबत जाताना प्रवास मात्र पावसाच्या परिघातूनच करतो. त्या परिघातून फिरताना आपल्याला त्याची विविध रुपं दिसतात.., जसं की, पाऊस म्हणजे कधी मज्जा, कधी प्रेमातला बहर- तर कधी विरहातलं दुःख, कधी निर्मळ आनंद- तर कधी वेदनादायी यातना.., आणि बरंच काही!... पण खरं तर ती आपलीच मानसिक स्थित्यंतरं असतात- पुढे जाणारा काळ आणि स्तब्ध पाऊस यांतून निर्माण होणारी...

... आता काय म्हणावं बरं यांस?.., वेडंस्सं ते पावसाळी मन!! अजून काय?...
-चारुश्री वझे
(पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-लोकप्रभा)

Tuesday, 27 June 2017

ती...

मेन डोअर बंद करून ती खोलीतल्या आपल्या बाळाच्या पाळण्याजवळ येते. बाळ शांतपणे झोपलंय.. पाळण्यातली त्याची ती छोटाश्शी मुद्रा त्यावेळी अधिकच लोभसवाणी दिसत होती. मग तिलाही राहवलं नाही. हळुवारपणे तिने आपली तर्जनी त्याच्या कपाळापासून नाकापर्यंत फिरवली. आणि मग स्वतःशीच खुद्कन् हसली. तर्जनी फिरवताना तिला झालेला तो नाजूक-मुलायम स्पर्श.. जगातली कित्ती गोडुश्शी निर्मिती आपण केलीये!.., हा आनंद तिच्या त्या लाघवी हास्यात होता..
.. तिचं लक्ष मग बाजूच्या शोकेसमध्ये एका खणात ठेवलेल्या तिच्या मोबाईलकडे गेलं. शक्य तेवढ्या दबक्या पावलांनी तिथे जात ती तो मोबाईल उचलते नि दरवाजाच्या दिशेने जाताना टाच वर करून पाळण्यात डोकावते. बाळ शांतपणे झोपलेलं असतं. मग सुटकेचा निःश्वास सोडून ती हळूच खोलीबाहेर येते नि दार लोटून घेते. हॉलमधल्या सोफ्यावर बसून ती मोबाईलमधली लेटेस्ट व्हिडिओ फाईल उघडते. आणि व्हिडिओ सुरु होतो..
- ती नुकतीच बाळंतीण झालीये. अद्याप शुद्ध न आल्याने ती निपचित पडून आहे. मग कॅमेरा तिच्यावरून हलवला जातो. आणि तिच्या उजव्या बाजूला पाच-सहा जणांच्या घोळक्यावर फोकस होतो. ती मंडळी कशालातरी वेटोळा घालून कमरेत वाकलेली असतात. कॅमेरा हळुहळू त्यांच्या जवळ जातो. मग त्यातल्या दोघांच्यामधून वाट काढत त्यांना बाजूला सारतो.., हाss!! अय्या!! हा तर बाळाचा पाळणा!! ते नुकतंच जन्मलेलं इवलुस्सं बाळ.. कित्ती गोड!!.. झूम करून कॅमेरा त्याच्यावर फोकस होतो. ..ते रडतंय.. कॅमेरा काही काळ त्याच्यावरंच स्थिर.. मग तो हलवला जातो आजुबाजुच्या मंडळींवर. त्यांचे चेहरे मात्र हास्याने आनंदून गेलेले असतात. कारण ती.., कुणाचीतरी सून, कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बहीण; तर कुणाची बायको.., आता आई झालीये. आणि अशा तिच्या नवजात बाळाचा या जगातला पहिलाच टाहो ना! -
.. हे सगळं शूटींग ती मोबाईलवर पाहत होती. पण मधूनच तिने ते बॅकवर्ड केलं. झूम करत कॅमेराचा फोकस जिथे बाळावर होतो ना तिथवर नेऊन तिने तो व्हिडिओ पॉज केला. मग कानावरले केस मागे सारत व्यवस्थित बांधले; नि व्हिडिओ 'स्टार्ट' करून लगेचच मोबाईल कानाजवळ नेला. ..पण.., अर्धा-पाऊण मिनिट निघूनही जातो.. कानापासून दूर नेत ती मोबाईलची स्क्रीन पुन्हा आपल्यासमोर धरते, तोवर व्हिडिओही पुढे गेलेला असतो. तेव्हा त्यात हास्याने आनंदून गेलेले ते चेहरे दिसत असतात. ..ती मात्र काहीशी निराश होते...
.. अचानक तिची नजर समोरच्या खिडकीत जाते. कुणाचीतरी वरात तिथून चाल्लेली. काही बायका आणि पुरूषमंडळी फारच बेफाम नाचत होती. त्यांचा तो हर्षोल्हास पाहून तिच्याही निराश चेह-यावर नकळतपणे स्मित उमटलं. मोबाईल बाजूला ठेवत ती खिडकीपाशी आली. ..आता मात्र ते दृश्य आणखीनच विस्तारलेलं. उड्या-कम-नाच करणा-या त्या मंडळींसोबतच तिला त्यांच्यामागे घोड्यावर स्वार झालेल्या नि मुंडावळ्यांमध्ये चेहरा पूर्णतः झाकलेल्या त्या नवरदेवाचंही दर्शन झालं. ..त्याच्यापुढ्यातला लहान मुलगाही बसल्याजागी नाचतोय.., त्याच्या आजुबाजुने चालणारी मुलं- बहुदा त्याचे मित्र असावेत- त्याची थट्टा मस्करी करत येणा-या-जाणा-या आणि कुतूहलाने ती वरात बघणा-या इतर पादचा-यांकडे माना वर करून फारच ऐटीत चालताहेत. ..ते पाहून तिला हसूच आलं. ..मग तिची नजर नवरदेवापुढ्यातल्या वादक मंडळींवर गेली. ढोल-ताशे-तुतारी-पिपाणी नि अजूनही काहीबाही होतं. ती मग त्यांच्याकडेच पाहत बसते. तिचं लक्ष मग तुतारी फुंकणा-या त्या चेह-यांकडे, ढोलताशे वाजविणा-या त्या हातांवर जातं. .. त्या हातांची भराभ्भर वाढत चाल्लेली लय, त्यासोबत पिपाणी फुंकणा-यांच्या गालांचा होत असलेला मोठाल्ला फुगा नि त्यांच्या पुढ्यातल्या मंडळींचं अधिकच बेभान होऊन नाचणं.. .. तिची नजर क्रमशः त्या हातांच्या वाढणा-या लयीवर, गालांच्या होणा-या मोठाल्ल्या फुग्यावर नि वेगाने थिरकणा-या त्या पायांवरून भिरभिरायला लागते.. हे सगळं जसजसं वाढायला लागतं, तिची नजर आणिकच अस्थिर होते. ..मग हळुहळू भुवयाही काहीश्या वक्र होतात. ..त्या हातांची वाढत चाल्लेली लय, त्या गालांचा अधिकाधिक होणारा मोठाल्ला फुगा, नि त्यावर त्या मंडळींचे काहीच्च्या काही वेगाने थिरकत चाल्लेले पाय.. काहीशी अनामिक भीती तिच्या संपूर्ण चेह-यावर पसरते. त्या वाढत जाणा-या वेगाबरोबर-लयीबरोबर ती इतकी वाढते.., इतकीss ..,की, एका क्षणी ती धावच घेते.. माहित नाही नक्की काय; पण कुठल्याश्यातरी अंतःप्रेरणेने ती धाव घेते, आपल्या बाळाच्या खोलीकडे.. खोलीचं दार उघडून ती पाळण्यापाशी येते आणि बघते तर.., तिचं बाळ अक्षरशः कळवळत असतं. तत्क्षणी ती बाळाला उचलते, आपल्या कुशीत घेते, घट्ट धरते... असेच काही क्षण जातात...
... त्या बिचा-याची साखरझोप वरातीच्या दणदणाटामुळे उडून जाते. पण जसजसा तो आवाज वाढत जातो, त्या तान्ह्या जिवाला तो गोंगाट- तो कोलाहल असह्य होतो. ..नि एका मर्यादेपलीकडे त्या आजुबाजुचं सगळंच असुरक्षित वाटू लागतं. तो रडू लागतो..,जोरजोरात.. जागच्या जागी जिवाच्या आकांताने वळवळ करतो. परंतु त्याच्या या सादेला कुणाचाच प्रतिसाद नाही म्हटल्यावर तो आणखीनच बिथरतो.. कारण, ते सगळंच त्याच्यासाठी भयाण असतं...
पण.., जसा त्याला आईच्या हाताचा स्पर्श होतो.., जसा तो तिच्या कुशीत शिरतो.. व्यक्त होता येत नसलं तरी भावना-संवेदना या जन्मतःच आपल्या सोबत असतात.. कारण तिच्या ऊबदार स्पर्शाने, तिच्या मायेच्या कुशीत तो आपोआपच आश्वस्त होतो. ..काही क्षण असेच निघून जातात. तोवर वरातही घरावरून पुढे गेलेली असते.
.. मिठी सैल करून ती मग बाळाला आपल्यासमोर धरते. ..आजुबाजूने लपेटलेल्या तिच्या हातांवर ते तान्हुलं शरीर अलवार विसावतं.., इवलेस्से ते पाणावलेले डोळे आईला पाहून काहीश्या वेगळ्याच आनंदात चमकू लागतात.., छोट्याश्श्या गोल-गोल वाटीएवढ्या चेह-यावरचं हसु जणु मणभर पसरतं..,नि वीतभरही नसलेले त्याचे ते नाजूक वेलींसारखे पाय आईच्या नाकाशी, गालांशी, ओठांशी खेळायला लागतात..
.. आपल्या बाळाचं हे गोजिरवाणं रुपडं पाहून ती हरखूनच जाते. तिच्या डोळ्यांत आपसूकच पाणी तरळतं. नि
अश्रूंची संतत धारच सुरु होते. ते अश्रू.. बरंच काही असतं त्यात.. अनेकानेक व्यमिश्र भावनांनी ओघळत असतात ते!.. ..कारण.., तिने आपल्या बाळाचं पहिलं रडणं ऐकलेलं नसतं, नाही त्याच्या या वेदना-त्याचं कळवळणं तिला ऐकू येत.., आणि पुढेही ती काहीच ऐकू शकणार नसते. ..ना त्याचे पहिले-वहिले शब्द, त्याचे निरागस-भाबडे बोल, त्याचं तिच्याशी बोलणं..,ना ही त्याने तिला दिलेली हाक.. तिला माहितीये, आपण हे काहीच ऐकू शकत नाही, ऐकू शकणारही नाही.. पण.., आपला स्पर्श, त्याच्यावरचं आपलं जिवापाड प्रेम; नि आपली मायेची कुशी, हे त्याच्यासाठीचं जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण आहे, हे मात्र तिला पक्क ठाऊक असतं. कारण, 'आई' ही तर शेवटी ज्ञानेंद्रियांपल्याडचंच जाणणारी असते ना!..
.. मग त्याचे असंख्य गोड-गोड पापे घेत तिने, तिच्या साईन लॅंग्वेजमध्ये त्याला आय.., लव्ह.., यु.., सोsssssss.., मच... .., असं म्हटलं. त्यानेही, त्यावर छानसे डोळे मिचकावले. ..बहुदा त्यालाही आता तिची 'मुकीभाषा' समजायला लागली असावी.. आणि 'ती'सुद्धा!...

  

Sunday, 2 April 2017

असंच काहीसं .., सुचलेलं...

नमस्कार मंडळी! सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. (कालचा ‘जागतिक मूर्ख दिन’ सर्वांनी साजरा केला असणारच!!😆😆 त्याच्याही ‘Belated शुभेच्छा’..!)
तर मंडळी, ब-याचदा आपल्याला असंच काहीतरी सुचून जातं. उग्गाचच्या उगाच..; म्हणजे हे उगाचच आहे, असं आपल्यालाच पहिले वाटतं. पण जसजसं आपण ते आजमावून पाहू लागतो ना.., ब-याचदा काडीचंही तथ्य नसतं त्यात .. पण..; कधीतरी-कुठेतरी एखाद्या वळणावर अचानकपणे त्यातला एखादा इंटरेस्टींग फॅक्टर अनाहूतासारखा भेटतो. .. आणि मग.., मग काय! कागद-पेन आणि आपण अशा ‘श्रेष्ठत्रयींचा’ .. (आपणही?) .. (म्हणायला काय जातयं?!) .. एकमेकांसोबतचा संसार सुरु होतो. आणि त्यातून जे फलित होतं, ते म्हणजे हे शीर्षक. अर्थात् ‘असंच काहीसं .., सुचलेलं...’

... आज्जी गेल्यापासून आजोबा काहीसे एकाकी झाल्येत. आणि आताशा त्यांना हे एकाकीपण अधिकच जाणवायला लागलंय.. ;पण कधी-कधी मला गंमतच वाटते. म्हणजे गंमत अशी की, मी जे आज्जी-आजोबांना बघितलंय.., ते फारच तटस्थपणे वागायचे एकमेकांशी. कदाचित माझ्या दोन पिढ्यां-अगोदरचं हे नात असल्याने मला तसं वाटत असावं की काय? माहित नाही... पण हल्ली नकळतपणे आज्जीची आठवण येऊन आजोबांच हळवं होणं... एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्याला केवळ एका छानश्या सोबतीची गरज असते, नाही! .. मग ती सोबत कधी मनमुराद हसवणारी असेल, कधी आपली स्ट्रेन्थ वाढवणारी असेल, कधी सकारात्मकता निर्माण करणारी असेल ..
.. नि अचानक माझ्या डोळ्यांसमोर आला तो ‘लॉस्ट अॅण्ड फाऊण्ड’चा ट्रेलर.., खास करून ती शेवटची ओळ.., ‘खरंच, हवं असतं कुणीतरी’...

... कुणीतरी हवं असतं आपल्याला...
भांड-भांड-भांडायला..,
भरभरून बोलायला...
हसताना टाळी द्यायला;
नि कधी दादागिरीने टपलीत मारणारं..,
हवं असतं कुणीतरी...

फसलेल्या पदार्थावर
आधी नाक मुरडणारं..,
पण त्याच्या कहाण्या मात्र
अगदी मिटक्या मारून सांगणारं..,
हवं असतं कुणीतरी...

वाफाळलेल्या चहासोबत
वायफळ गप्पा मारायला..,
नि सीसीडीतल्या कॉफीचा बहाणा करून
‘मन की बात’ बयॉं करायला.., समोर ..,
हवं असतं कुणीतरी...

घसरून पडल्यावर आधी पोटभर फिदिफिदी हसून
मग उचलायला येणारं..,
नि जखम पाहता आपसूकच वटारलेल्या डोळ्यांत
‘अरेsssssब्बापरे!!!’...
तरीही, ‘हात्तीच्या!!!.. एवढीश्शीच्चे की!!.. होईल बरी लवकर’..;
असं फुशारक्या मारणारं..,
हवं असतं कुणीतरी...

.. अश्रू पाहणारे तर अनेक असतात..,
ते जाणणारं हवं असतं कुणीतरी...

कुठलाही आडपडदा न ठेवता खुलेआम व्यक्त होताना..;
तर कधी अबोलपणेच संवाद साधणारं..,
हवं असतं कुणीतरी...

कुणीतरी हवं असतं..,
या ना त्या असंख्य कारणांसाठी...
आपल्यानंतर कुणी असेल का आठवण काढणारं?..,
अशा बिनभरवशी प्रश्नापेक्षा
आपल्याला छानशी सोबत आहे..,
या शाश्वत उत्तरासाठीच..,
हवं असतं कुणीतरी..

खरंच हवं असतं कुणीतरी...

Thursday, 30 March 2017

पै-पैशाची गोष्ट- एक दीर्घांक


पडदा उघडतो. एक स्त्री विंगेतून प्रवेश करते. आणि रंगमंचाच्या मधोमध असलेल्या तुळशी वृंदावनापाशी येते. तोवर तिच्यावर केंद्रीत झालेला प्रकाशझोत पूर्णतः प्रखर होतो... पाचवारी पातळ, गळ्यातील काळ्यामण्यांची पोत नि लटकता चष्मा, कपाळावरचं छोटस्सं गोल-गोल कुंकू नि डोक्यावरचे पिकलेले केस, गालावरचं मंदसं स्मित नि काहीसं कुबड असलेली ती स्त्री साधारण ६०-६५ वर्षांची गृहिणी व प्रेमळ आजी असल्याचा पहिला अंदाज प्रेक्षक येथे बांधतो. तिच्या हातातील उद्बत्ती, एकंदर प्रकाशयोजना आणि वातावरण निर्मिती करणारं पार्श्वसंगीत या गोष्टी दीर्घांकातील सायंकाळ दर्शवितात. तुळशीला ओवाळत जसजशी ही आजी पुढे येते तसतशी रंगमंचवरील प्रत्येक वस्तू दृश्यमान होते. उजव्या बाजूला कपाट व त्यावरची तस्बीर, मधोमध- तुळशी वृंदावनाच्या पुढे एक सोफा व त्याच्यापुढील टेबल आणि डाव्या बाजूला झाकलेली एक वस्तू. (त्या वस्तूतच पुढचं नाटक दडलेलं आहे.) अखेर सारा रंगमंच सायंकाळच्या वातावरणासह प्रेक्षकांसमोर सज्ज होतो. (या सगळ्यात दीड-दोन मिनिटे निघून जातात.) आणि आजीचं स्वगत सुरु होतं. अगदी सहजगत्या...
‘तालीम’ या नाट्यसंस्थेद्वारे साकारलेला आणि डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या कथेवर आधरीत पै पैशाची गोष्ट हा एकपात्री दीर्घांक असून ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे या प्रमुख भूमिकेत आहे. याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन विपुल महागांवकर यांनी केले आहे.  
... आजीचं अनौपचारिक स्वगत सुरु होतं. जान्हवी- तिचं नाव. (कुणाच्यातरी संदर्भातून ती स्वतःच्या नावाचा उल्लेख करते.) बोलता-बोलता सांगून जावं तशी ही ‘जान्हवी आजी’ तिच्या कुटुंबियांची जुजबी ओळख प्रेक्षकांना करुन देते. आणि एक संदर्भ घेऊन डाव्या बाजूच्या झाकलेल्या वस्तुजवळ जाते. व प्रेक्षकांसमोर ती उघड करते. तोच क्षण या दीर्घांकाची ख-या अर्थाने नांदी असल्याचे म्हणावयास काही हरकत नाही.
ती एक ट्रंक आहे. त्यातील वस्तू अनेकविध अदृश्य पात्रांच्या व्यक्तिरेखेसह बाहेर येतात. त्या वस्तुंमागे कुणाच्या ना कुणाच्यातरी आठवणींची नाळ जोडली आहे. त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर पात्रांचाही मग त्यात संदर्भ येतो. हा संदर्भ जान्हवी आजीच्या बोलण्यातून प्रेक्षकांना तत्काळ कळतो. प्रत्येकाची साधारण व्यक्तिरेखा ही त्यांच्या बोलण्या-चालण्याच्या धाटणीनुसार प्रेक्षकांसमोर उभी राहते. ‘जान्हवी आजी’ अर्थात इला भाटे यांनी या विविध व्यक्तिरेखा वकुबीने सादर केल्या आहेत. ‘जान्हवी’ या प्रमुख पात्राव्यतिरिक्त इलाताईंनी जवळपास नऊ-दहा व्यक्तिछटा आपल्या अभिनयातून जीवंत केल्या आहेत.
त्या ट्रंकेतील वस्तुंचा त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी व या दीर्घांकानुरुप असलेल्या पै-पैशाच्या आर्थिक गणितांशी आपसूकच संबंध येतो. जान्हवी आजी, तिची आई, जान्हवी आजीची मुलं-नातवंड अशा या चार पिढ्या, त्यांतले परस्पर बंध व त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि मुख्य म्हणजे या पिढ्यांतील आर्थिक तफावत ही प्रत्येक वस्तुगणिक जान्हवी आजीच्या स्वगतातून आपल्यासमोर येते. इलाताईंचा रंगमंचावरील सहज वावर व सकस अभिनय यांमुळे जान्हवी आजी व तिच्या सभोवतालच्या नात्यांतील कंगोरे प्रेक्षकांमोर अत्यंत तरलतेने उलगडतात. या कंगो-यांची गुंफण जरी प्रेमभावाने विणली गेली असली तरी त्यातील महत्वाचा धागा म्हणजे नात्याची आर्थिक बाजू! जी कुठेतरी जान्हवी आजीला भेडसावते. त्यामुळे झालेली तिची काहीशी चलबिचल मनःस्थिती सबंध दीर्घांकात व्यापलेली असून प्रेक्षकाला ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
पन्नास हजारात परतीच्या तिकीटासह होणारा परदेशी विमान प्रवास, १ हजार १२५ रुपयांत महागातील महाग साडी, ५० रुपयांत भारतीने (आजीच्या मुलीने) तिच्या मैत्रीणींना दिलेली ‘आइस्क्रीम पार्टी’ आणि फाईव्हस्टार हॉटेलमध्ये कुटुंबातील सात-आठ सदस्यांच्या जेवणाचं आलेलं बाराशे रुपये इतकं बिल या आर्थिक तपशीलांवरुन दीर्घांकाचा काळ हा १९९०-९५ सालादरम्यानचा असलेला दिसतो. जागतिकीकरणानंतरचा हा कालखंड. त्यावेळी नव्याने उदयास आलेला उच्च मध्यम वर्ग. आणि त्यातील प्रस्थापित व नुकतीच प्रवेश केलेली कुटुंबं.  ज्या कुटुंबात जान्हवी आजीच्या आईच्या काळात महिन्याचा खर्च पन्नास आणे; तिथे स्वतः जान्हवी आजीच्या काळात तो खर्च पन्नास रुपयांवर पोहोचला होता. या दोन्ही पिढ्यांत क्रयवस्तुंच्या संकल्पना व गरजा जरी बदलल्या असल्या तरी तरी दोन्ही पिढ्या हिशेबांस पक्क्या! परंतु आजीनंतरच्या पिढीत हिशेब नाहीच. नुसता खर्चच! शिवाय त्यात ढब्बू, भोकाचं नाणं, चवली-पावली-पै-आणा ही चलने कालबाह्य झालेली. अशावेळी आपली मुलं-नातवंड कितीही नाती जपणारी, प्रेमभावाने सर्वांचं करणारी असली तरी बदललेली आर्थिक गणितं आणि त्यापेक्षाही अंगावर येणारी त्यातील तफावत- जिच्यामुळेच ‘जनरेशन गॅप’ ही संज्ञा बहुअंशी सार्थ ठरते- अशा अतीव सुखासीनतेच्या अनामिक भयाने आयुष्याच्या संध्याकाळी जान्हवी आजीचं रुखरुखलेलं, हळवं झालेलं मन अखेरपर्यंत पै-पैशाची गोष्ट करीत राहतं.    


Color Of The Sky

रुईया फिल्म सोसायटी’ (RFS) तर्फे ३१ जुलै व १ ऑगस्ट २०१४ या दोन दिवसांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मला सर्वात जास्त आवडलेल्या ‘Color Of The Sky’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाविषयी...
‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’... काहीवेळा शब्दातूनही जेव्हा एखादी गोष्ट सांगता येत नाही तेव्हा ती शब्दातीत असते. त्या मागच्या भावना फक्त समजून घ्यायच्या असतात. त्या गोष्टीतलं मर्म जाणून घ्यायचं असतं. पण त्यासाठी मुळात त्या गोष्टीचं प्रकटीकरण हे सहज-सुलभ असावं लागतं. आणि हेच वैशिष्ट्य आहे डॉ. बिजू यांच्या ‘Color Of The Sky’ या चित्रपटाचं.
 एक चोर... माणूस म्हणून चांगला.., पण परिस्थितीमुळे चोरी करण्यासाठी प्रवृत्त झालेला असा तो, चोरी करण्यासाठी म्हणून एका वृध्द शिल्पकाराच्या होडीत शिरतो.., त्या चोरामागील चांगल्या माणसाला हेरून तो शिल्पकार चक्क त्याला स्वतःच्या घरी घेऊन  जातो (इतक्या वर्षांच्या प्रमाणिक कलासाधनेतूनच त्याला ही सूक्ष्म नजर प्राप्त झाली, हेच बहुदा दिग्दर्शकाला सांगायचं असावं.).., आणि तेथूनच सुरु होतो, त्या चोराचा माणूस बनण्याचा प्रवास...
 यात चोराची व्यक्तीरेखा इंद्रजित याने; तर शिल्पकार नेदुमुडी वेणू यांनी साकारला आहे.
 एक बेट... त्याच्या किना-यालगतच असलेलं त्या वृद्धाचं छोटसं-टुमदार घर... घरा-आजुबाजुचा रम्य निसर्ग... आणि त्या घरातील तिघेजणं- एक प्रौढवयीन पुरुष, एक तरुण मुलगी- जी मुकी आहे आणि एक लहान मुलगा. या तिघांचे एकमेकांशी आणि त्या शिल्पकाराशी असलेले संबंध, त्यातली मजा-निरागसता ही प्रत्येकाने तो चित्रपट पाहूनच अनुभवावी.
 सुरुवातीला हे तिघेही घरी आलेल्या त्या चोराला स्वीकारत नाहीत. त्यालाही खरंतर तिथे राहायचं नसतं. पण अडचण असते ती दोन बेटांतील त्या समुद्राची! त्याला ना पोहोता येतं; नाही होडी चालवता येत. त्यातूनही आपल्याला त्या वृद्धाने त्याच्या घरी का आणलं, यामागचं कारण न समजल्याने त्या बिचा-याची चांगलीच पंचाईत होते. तो वृद्ध सो़डता कुणीच त्याच्याशी बोलत नाही, ना त्याला कुठलाच प्रतिसाद देत. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होते.... 
 पण हळुहळु हे चित्र बदलत जातं. ते कसं बदलतं हे प्रत्यक्षच पाहण्यासारखं आहे. पण तो माणूस म्हणून चांगला असल्याने सगळ्यांच्याच मनात त्याच्याविषयीची आस्था निर्माण होते. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादातून आणि त्या वृद्ध शिल्पकाराने कळत-नकळतपणे दिलेल्या शिकवणीतून त्या चोराला स्वतःतील माणूस समजतो. निसटून गेलेली स्वतःचीच चांगली प्रतिमा त्याला गवसते. आणि तो वृद्ध आपल्याला त्याच्या घरी का घेऊन आला, हेही त्याच्या लक्षात येतं. कुठलंही नातं नसताना निःस्वार्थीपणे केलेले संस्कार, दिलेलं प्रेम यामुळे तोही अखेर त्या घरातलाच एक अविभाज्य भाग बनतो... 
 चित्रपट मल्याळी असूनही त्यातील सूक्ष्म-नाजूक भावना प्रेक्षकांना अगदी थेट कळतात. याचं मुख्य कारण म्हणजे साधं-सोपं-सहज-सुंदर असं कथानक, कमीत-कमी संवाद आणि प्रत्येक व्यक्तीरेखेच्या हावभावावर दिलेला जास्तीत-जास्त भर. त्यामुळे सबटायटल्स वाचण्यात प्रेक्षक कंटाळून न जाता त्यांना चित्रपटातील निसर्गाच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचा छान आस्वाद घेता येतो.
 चित्रपटाचा शेवटही काहीसा साहित्यिक पण बोधपर आहे. तो मराठीतून काहीसा असा-
‘आकाश हे नेहमी एकाच रंगाचं नसतं. कधी ते निळेशार, कधी तांबूस, कधी पिवळंफटक, कधी पांढरंशुभ्र, कधी काळकुट्टं; तर कधी रंगमिश्रित असतं. आपलं आयुष्यही असच अनेकानेक रंगांनी बहरलेलं आहे. या रंगसंगतीचा आपण स्वतः किती आनंद घेतो आणि दुस-याला तो किती देतो, यावरच आपलं माणूसपण ठरतं.’
- 'Color Of The Sky'

काय चाल्लयं आयुष्यात?

नमस्कार मंडळी! सर्वांना नववर्षाच्या आणि एकूणच सुंदर आयुष्याच्या सुंदर शुभेच्छा!! आणि हो, माझ्या या आधीच्या ब्लॉगवर दिलेल्या सुंदर-सुंदर प्रतिक्रियांबाबत मनःपूर्वक धन्यवाद!
तर मंडळी, आयुष्यात शुभेच्छांसाठी सण-उत्सवादी निमित्तच लागतात, ही संकल्पनाच आता काहीच्या काही कालबाह्य ठरली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला केवळ भारतीय सण, मग त्यात पाश्चात्त्य सणांचा झालेला समावेश, मग जसजसा मध्यमवर्ग विस्तारत गेला तसतसा ‘वर्षाखेरा’सोबत ‘महिनाखेर’ही साजरा करणं, मग फोफावलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने सप्ताह-अंताच्या खास नियोजनाचा पायंडा घालणं ते आता दिवसाची सुरुवात-मध्य-शेवट व त्याचबरोबरीने अधला-मधला चहाचा वेळ, यांतलं काहीही आयुष्यात शुभेच्छा देण्यासाठी पुरून उरतं. प्रेषक-प्रतिला केवळ त्यांच्या देवाण-घेवाणीचा उत्साह असला की आयुष्य कसं अगदी शुभेच्छांनी ओसंडून वाहतं!😁😁
पण मंडळी, असं शुभेच्छादित आयुष्य असल्यावर ते प्रत्येकासाठीच ‘लय भारी’ असणार, हा समज मात्र अत्यंत चुकीचा. म्हणजे कसयं ना, आतापर्यंतच्या मी केलेल्या मर्यादित क्षेत्रफळातील मर्यादित लोकसंख्येच्या सर्वेक्षणातून जो अंतिम निष्कर्ष समोर आला आहे, त्यानुसार...😨😨😏... बापरे! हे फारच भयानक आहे!!😎 थोडक्यात ‘काय मग, काय चाल्लयं आयुष्यात?’, असं विचारल्यावर ज्या हटके प्रतिक्रिया मला आजवर मिळाल्या, त्यात माझा हा बिचारा प्रश्न हटकून तोंडावर आपटला.😆😆
तर मंडळी, त्यातील काही आत्यंतिक नमुनेदार अशा प्रतिक्रियांचे नमुने मी आपल्यामसोर पेश करते. कृपया गौर फर्माईये... (गझलांच्या शब्दांकित मैफलीचा प्रभाव, दुसरं काही नाही!😉)
‘काय मग, काय चाल्लयं आयुष्यात?’
-    - ‘सध्या कटींग मारतोय.’ (ते मलाही दिसतयं. दृष्टिकोन विस्तारण्याची गरज.😏 असो!)
-   -  ‘बस का भाई! आपला आशीर्वाद असल्यावर अजून काय हवं?’ (या केसमध्ये प्रश्नच न कळणे, हा मुलभूत लोच्या आहे.😌😝)
-   -  Had break-up… single life सुरुए... आणि enjoy करतेय.’ (No comments…🙊)
-    ‘आयुष्यात काय चाल्लयं?!.. मीच बंद पडलोय!!’ (या केसमध्ये हे विधान स्वघोषित विनोद ठरवून त्यावर माझ्या टाळीसाठी हात पुढे केला जातो.😌😅)
-    - ‘आयुष्यात काय चाल्लयं!! बोंब लागलीये, बोंब! झाला का इंटर्नलचा अभ्यास?’ (माझ्या निखळ प्रश्नावरील या उत्तराने मीही असंख्य ‘बोंबावळी’त सामील होते.😟)
-   -  ‘हाहा... चाल्लयं आयुष्य.. काय आता!’ (इथे मात्र मला जामच राग येतो...😡)
एका रुईय्येटने तर मलाच प्रतिप्रश्न केला, ‘अरेव्वा! एकदम आयुष्यात काय चाल्लयं वगैरे!!.. नाट्यवलयमध्ये होतीस की काय?’ ()
अर्थात हा प्रश्न मी अजून केजोंना विचारला नाहीये. त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी भन्नाट उत्तर मिळेल. आणि माझ्या या प्रश्नास ‘नव-संजीवन’ या प्रकारातलं काहीतरी प्राप्त होईल.😌😀.. एकदा तर ‘काय चाल्लयं आयुष्यात?’ यावर ‘फिलहाल तो फॉग चल रहा है|’, असंही अनपेक्षित उत्तर मिळालेलं.😵😵 
तर मंडळी मला मिळालेल्या- मिळत असलेल्या या प्रतिक्रिया. आता प्रतिक्षा आहे आपल्या प्रतिक्रियांची.. आणि त्याचबरोबर ‘Color of the sky आणि ‘पै-पैशाची गोष्ट- एक दीर्घांक’ हे माझे दोन ब्लॉगही मी लगोलगच पोस्ट करीत आहे. तेही जरुर वाचावेत. धन्यवाद!! 

Friday, 3 March 2017

'धक्का'तंत्र

नमस्कार मंडळी! सर्वांना मराठी राज्यभाषादिनाच्या, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक आणि 'Belated' शुभेच्छा. आणि हो, या आधीच्या ब्लॉगवरील सुंदर-सुंदर प्रतिक्रियांसाठी अगदी मनापासून धन्यवाद. BTW लीना, ब्लॉग पोस्ट करायला जरा उशीरच झाला. त्यामुळे.., माफी मागतेय म्हणून क्षमस्व! 😁😀😀 ( बहुदा यांस विनोद म्हणणं, हेच कदाचित विनोदी ठरेल, नाही!.. असो.)
तर मंडळी, आपल्या आजुबाजुला ब-याचदा अनपेक्षित गोष्टी घडतात. ज्याचा आपल्याला 'धक्का' बसतो. कारण 'धक्का' ही गोष्टच मुळात अनपेक्षित असणं अपेक्षित आहे. कारण तिथेच तिचं अस्तित्त्व असतं.., तिथेच ती वास्तव्य करते.., तिथेच तिचं.., असो!.., आणि बरंच काही..! (भा.पो) (कारण एवढच सुचलं. म्हणून विसरायच्या आत पटकन लिहून टाकलं!!😝) तर मंडळी कधी-कुणाला-कुठे-कशाप्रकारचा धक्का बसेल, काही सांगता येत नाही. म्हणजे 'स्वप्नांच्या पलीकडले', असं काही अस्तित्त्वात असेलच तर ते म्हणजे एकतर 'चित्रपट'; नाहीतर हे 'धक्के'...
... 'अहो वझे, आता मोठा शिशूवर्गही झाला. वार्षिक परीक्षाही संपली. तुमच्या चारुश्रीला अजूनही अक्षरज्ञान नाहीये. रडण्यापलीकडे दुसरं करतेच काय ती? तिची पाटीही ऋत्विजाच पूर्ण करते. माझं ऐका. तिचं वय तसंही कमीच्चे. एवढ्यात पहिलीत पाठविण्याची घाई करु नका. अजून एक वर्ष तिला पुन्हा एकदा मोठ्या शिशूतच बसवा',- गोरे बाईंनी त्यांच्या खास सडेतोड शैलीत सांगितलं. ( सांगितलं कसलं, सुनावलच असेल कदाचित! हंsss खवट्टं!! एवढं बदड-बदड-बदडायच्या. रडणार नाही, तर काय हर्षभराने नाचायला हवं होतं मी?!) मग काय? मातोश्री तशाही अतिहळव्या- 'अरे देवा, कसं होणार हिचं?' ( मला वाटतं, ह्या प्रश्नाची व्युत्पत्ती अंदाजे तेव्हाच झाली असावी. ज्याप्रमाणे प्रवाह बदलला, तरी नदी मात्र तिच असते; अगदी त्याचप्रमाणे प्रसंग बदलले, पण हा प्रश्न मात्र अजूनही आपलं अस्तित्त्व राखून आहे! असो.) आणि बाबांनी तर मनोधारणाच केलेली- ' काही हरकत नाही! पुन्हा एकदा तिला मोठ्या शिशूत बसवुयात. तसंही जरा लवकरच शाळेत घातलयं आपण तिला.'
एवढं सगळं माझ्या आजुबाजुला घडत होतं. मला मात्र याचा थांगपत्ताही नव्हता! माझ्यासाठी मोठ्या शिशुतून पहिलीत जाणं म्हणजे पाटी-पेन्सिलऐवजी वही-पेन्सिल वापरण्यातलं अप्रूप आणि 'चला, आता काही आपल्याला त्या गोरे बाईंचा मार मिळणार नाही', हा निरागस-निखळ आनंद!! त्यामुळे अज्ञानात सुख असतं, हे मी या बाबतीत तरी मान्य करीनच. कारण  या हर्षभरातच मी त्या दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीत 'अ' ते 'ज्ञ'पर्यंतची मुळाक्षरं-व्यंजने, बाराखडी सगळंच्या सगळं मोठमोठ्याने बडबडून लिहिलं. इतक्यांदा लिहिलं-इतक्यांदा लिहिलं की, आई-बाबांना.., 'धक्का'च बसला. आणि अर्थातच माझी रवानगी पहिलीत झाली!😊😊...
... नववीत असताना मी एक लेख लिहिलेला. नाव होतं- 'छंद व उद्दीष्ट- त्यातील आपली ओळख'. लेख-स्वरुपात लिहिण्याचा तो पहिलाच प्रयत्न. त्यामुळे अतिशय उत्साहाने तो मी काळे मॅडमना दाखविला. काळे मॅडम आमच्या कार्येकर क्लासमधल्या मराठी-संस्कृतच्या शिक्षिका. शीर्षक वाचताच त्या कौतुकाने- 'अरेव्वा! आता घरी गेल्यावर सविस्तर वाचून सांगते', असं म्हणाल्या. मीही आनंदाने मान डोलावली. मला वाटलेलं आता दुस-या दिवशी त्या माझं कौतुक करतील, काही सुधारणा असल्यास सांगतील; आणि विषय तिथेच संपेल. पण दुस-या दिवशी त्या वर्गात आल्या. त्यांचं मराठीचं लेक्चर होतं आमच्यावर. आल्या-आल्या त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ज्या काही सूचना होत्या, जिथे सुधारणा आवश्यक होती त्याची नोंदही त्यांनी लेखातच लाल पेनाने केलेली. तो लेखाचा कागद घेऊन मी जागेवर बसणार तितक्यात त्यांनी तो माझ्याकडून परत घेतला. आणि सबंध वर्गासमोर त्यांनी स्वतः तो लेख मोठ्याने वाचला. तासाभराचं त्यांचं लेक्चर. त्या तासाभरात एखाद्या कवितेचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे त्यांनी माझ्या लेखाचं विवेचन केलं. साहजिकच हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धक्काच होता. मला तर खांदे उडवून आम्हा मुलींच्या गणवेशाला नसलेली कॉलरही टाईट कराविशी वाटली!😊😊...
... कॉलेजला जेव्हा दादरवरून जायचं असतं, तेव्हा मधला टिळक ब्रीजखालचा रस्ता ओलांडावा लागतो. आपल्याकडे कुठल्याही ब्रीजखाली निर्वासितांची वस्ती ही हमखास असते. काहींना त्यांची कीव येते; काहींना त्यांचा राग येतो. मला हे दोन्हीही अधून-मधून किंवा कधी सलग  एकामागोमाग एक वाटतं. तर त्या टिळक ब्रीजखालीही अशी वस्ती साहजिकच आहे. त्यांच्या त्या घराला ना भिंत ना दरवाजा. छप्पर म्हणून काय तो टिळक ब्रीज! एखादी फाटकी कळकट्ट-मळकट्ट अंथरलेली चादर, त्याच्या बाजूला छोटीश्शी शेगडी ( त्यावर काय शिजत असेल, देवच जाणे!), त्यामागे असलेला आरसा-कंगवा, एका तान्ह्या बाळाच्या हातात असलेलं भांडं, जे ते नेहमी तोंडात धरून ठेवायचं ( कदाचित तेव्हा त्याचे दात येत असल्याने त्याच्या हिरड्या शिवशिवत असाव्यात.), अशी त्यांची संसारिक सामग्री आणि एकूणच संसार! कधी तिथे लहान मुलांच्या रडण्याचे-भांडण्याचे आवाज असतात. कधी तिथली मोठी मंडळी जोरजोराने एकमेकांना शिव्या घालत असतात. आणि या सगळ्यात वाहने-पादचा-यांची ये-जा मात्र अव्याहत सुरू असते. 'प्रायव्हसी' हा शब्दच या मंडळींच्या गावी नसेल, नाही!  तर असा हा टिळक ब्रीज आला की, माझ्या पावलांची गतीही वाढायची. झरझर चालून तो ओलांडल्यावर हुश्शं वाटायचं.
एकदा तिथूनच जात होते. नेहमीप्रमाणे झर्रर्रदिशी तो ब्रीज ओलांडण्याचं ठरवलं अन् तोच माझी नजर नेमकी तिथे घडत असलेल्या एका दृश्यावर पडली.., आणि स्थिरच झाली. घटना होती, 'त्या मंडळींचं फोटोशूट'! त्यांच्यातलं एक 'कपल' त्यांच्यातल्याच एका इसमाकडून मोबाईलवर फोटो काढून घेत होतं. कधी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, कधी एकमेकांकडे पाहून, कधी एका बाळाला मांडीवर बसवून; तर कधी त्यांच्यातल्याच साधारण चौदा-पंधरा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन त्यांचं जणु 'फॅमिली फोटोशूट'च चाल्लेलं. त्या फोटोशूची लोकेशन्स म्हणजे ब्रीजखालची पत्र्याची गाळावजा झोपडी, ब्रीजच्या पाय-या आणि त्या समोरचा इलेक्ट्रीक पोल. तो 'कॅमेरामन' जेव्हा 'स्माईल' असं म्हणायचा, तेव्हा तोही त्यांच्यासोबत हसायचा. त्यांचे एरव्हीचे विचकटलेले-त्रासलेले चेहरे त्यावेळी ओठांचा मोठ्ठा 'ई' करून मात्र फारच गोंडस दिसत होते. मीही नकळतच तिथे पाच-सात मिनिटं घुटमळले. एक 'धक्का'च होता तो माझ्यासाठी...
... तर असे बरेच धक्के. धक्क्यांची यादीच सांगायची झाली तर मला एखादं 'धक्का सदर'च लिहावं लागेल कदाचित. अर्थात प्रत्येकाची स्वतःची एक धक्का- यादी असतेच. नसेल तर कधीतरी खास वेळ काढून जरुर करून पाहा. ती यादी कधी खळखळून हसवेल, कधी अंतर्मुख करेल, कधी डोळ्यातून टचकन् पाणीही आणेल. पण राव, बहुत मजा आएगा! नक्कीच!!😊😊😊    

Tuesday, 3 January 2017

नववर्षाभिनंदन

नववर्षाभिनंदन
                                                       (शुभेच्छुक- शाननशोनन)


नमस्कार मंडळी! सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा!!! (त्यासाठीही तीन तारीख उजाडावी लागली! असोत.. क्षमस्व!) आणि मुख्य म्हणजे माझ्या या आधीच्या लेखावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप-खूप मनःपूर्वक धन्यवाद!
...तर या नववर्षाच्या उत्साहपूर्ण शुभेच्छांची देवाण-घेवाण सर्वांनीच आपल्या आप्तस्वकीयांसमवेत आपापल्या परीने, खास शैलीत, ऑनलाईन-बिनलाईन राहून- 'आता इथवर तर आलोय; वाटलच तर पुढे ढकला' अशा स्वरुपातील निरोपांसह (अर्थात Forwarded Messages ने) केली असणार...
... माझ्याही नववर्षाची सुरुवात मामाकडे रंगलेल्या 'नॉट अॅट होम'च्या डावाने झाली. रात्री बाराच्या ठोक्याला  डाव मध्येच थांबवून आम्ही सर्वांना 'Virtual Wish' करु लागलो. ओळखीचे-जवळचे-अधिक जवळचे- सर्वांना शुभेच्छा दिल्या. ... सर्वांना?... खरचं?.. काहीतरी चुकल्यासारखं.., अनावधानाने राहून गेल्यासारखं वाटलं...
... अरे हो! खरचं की!! म्हणता-म्हणता तीन वर्ष झाली की आता!!!... पण जर आज आज्जी असती तर...
हा केवळ विचार मनात आला; आणि तिच्याबद्दल लिहिण्यासाठी हात अधीर झाला...

आज्जी... आज्जीचा केवळ विचार मनात येणं म्हणजेच.., दिवसाची अतिशय सुंदर सुरुवात, दुपारच्या जेवणानंतरची तृप्त ढेकर आणि रात्रीची मनस्वी शांतता...(व्वा! सॉलिडच भन्नाट वाक्य सुचलं राव! पण खरयं) आज्जी किनई माझा सर्वात आवडता प्राणी! हो प्राणीच!! सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा काहीतरी हटके आणि इंटरेस्टींग अशा ह्युमन्सना जनरली 'अजब प्राणी' असचं म्हणतात. आज्जीही तशीच होती. मुळात 'आज्जी' या प्रवर्गाला साजेशी अशी कुठलीच गुणसूत्रे तिच्यात नव्हती. ना तिने मला कधी गोष्टी सांगितल्या, ना कधी ती माझ्यासाठी अंगाई गीत गायली. 'म्हातारपण अतिशय वाईट हो!' हे तिच्यासमोर तिच्याहूनही लहान आणि नुकत्याच आज्जी झालेल्या बायका म्हणायच्या; पण तिच्या हयातीत चुकूनसुद्धा हे वाक्य मी कधी तिच्या तोंडी ऐकलं नाही. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही, ती एकतर नीट समजावून तरी घ्यावी; नाहीतर 'आपल्याला त्यातलं काही कळत नाही बुवा', हे निदान मान्य तरी करावं. उग्गाच आपली अक्कल पाजळू नये, असा तिचा शिक्षकी खाक्या असल्याने ती रित्सर डॉक्टरांचे सल्ले घ्यायची आणि काटेकोरपणे औषधांचं वेळापत्रक आणि पथ्ये सांभाळायची. ना तिचा औषधांचा 'बटवा' होता; ना त्यामुळे कधी 'अहो, तुम्ही हे औषध घ्या, शेखर (माझे बाबा) तू हे घे रे, चारुश्री-अश्विनी तुम्ही हे घ्या गं' असा 'बटवारा' झाला. (व्वा! क्या बात है! 'बटवा'- 'बटवारा' जमतयं की!)
...तर अशी ही माझी आज्जी. ह्या तर काहीच नाही! अजूनही ब-याच गोष्टी होत्या, ज्या तिला आज्जी म्हणून अजिबातच 'डिफाईन' करायच्या नाहीत. (कवळ्या काढल्यावर मात्र ती गोडु-गोडुशी आज्जीबाईच दिसायची.)

आज्जी... सहावारी साडीतली गव्हाळ रंगाची, काहीश्या उभट आणि लंबगोलाकार चेह-याची, बसक्या अंगाची नि सदान्-कदा डोळ्यांवर चष्मा असलेली नकट्या नाकाची... वर्णन करायचच झालं तर हे असच काहीसं!  पण हे फारच वरवरचं... तिचं अंतरंग मात्र खूपच निराळं होतं... Quite interesting! उदाहरण द्यायचच झालं तर-
... तिला आजोबांविषयी नितान्त आदर. पण तिने कधीच वड पुजला नाही. कधीकधी तर ती मला असही म्हणायची, 'लग्न म्हणजेच सगळं काही नसतं. त्यापेक्षाही स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वत्व जपणं महत्त्वाचं. त्या लता दीदींकडे बघ'.., मीही त्यावर होकारार्थी मान हलवायचे. म्हणजे आमच्याकडे गाण्याचं वातावरण असूनही आज्जीने गाण्यासाठी कधी लता दीदींचा आदर्श घे असं सांगितलं नाही. वास्तविक लता-आशा वा माणिक वर्मा या तत्सम गानविदुषींपेक्षाही तिला वैजयंती माला आणि हेलन आवडायची. म्हणजे नाट्यक्षेत्रात ज्यांच्या नावे प्रदान केला जाणारा पुरस्कार शिरसावंद्य मानला जातो अशा नटवर्य मामा पेंड्से यांची कन्या आणि पं.भीमसेन जोशी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आजन्म संगीत-साधना करणारे दादा वझे यांची कुलवधू जेव्हा त्यांच्याच समक्ष 'मला हेलन अतिशय आवडते. अजूनही काय 'ग्रेसफुल' आहे ती', हे मला अगदी बिनदिक्कत सांगायची ना,.. तेव्हा जामच भारी वाटायचं राव! उग्गाच नाही ती माझा 'आवडता प्राणी'! अर्थात् यावर कुणाचाच कधी आक्षेप नसला तरी कन्या-कुलवधूपेक्षाही तिचा स्वतःचा शिक्षकी पेशाच तिला या अभिव्यक्ततेची मुभा देत असावा....
... आज्जी वेळेच्या बाबतीत इतकी काटेकोर होती की, त्याविषयी 'अस्मादिकांनी न वदलेलेच योग्य'! म्हणजे सकाळी उठलं की पहिले घर झाडणं, मग देवासमोरची रांगोळी, आंघोळ आटोपून देवाची पूजा, न्याहारी, दुपारचं जेवण, त्यानंतर अकरा वेळा ||श्री गणेशाय नमः|| वहीत लिहिणं (आज्जीची जणु ती रोजनिशीच होती), मग वामकुक्षी, संध्याकाळचा गणपती मंदीरावरुन ठरलेला फेरफटका आणि बुधवार असला की संध्याकाळचा भजनाचा क्लास. रिकाम्या वेळेत विणकाम करणं, ताक केलं की त्यातलं थोडं सुमन आत्यासाठी आठवणीने एका बाटलीत काढून ठेवणं, भजनांचा रियाज, मनःशक्ती-विवेक वाचणं, एखाद्या खास दिवसाचा बेत आखणं.., काही ना काही सुरुच असायचं.
... आज्जीच्या वागण्यात कमालीची शिस्तबद्धता, बोलणं स्थिर आणि प्रगल्भ, विचार तत्त्वनिष्ठ असले तरी त्यात काही ना काही नाविन्य आणि एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता असायची.स्वभाव कणखर आणि प्रॅक्टीकल असला तरी त्याहूनही ती संवेदनशील होती. म्हणजे बाबांचं गाणं ऐकताना किंवा माझे लेख-कविता वाचताना तिला आनंदाश्रू आवरायचेच नाहीत. आणि तिनेही कधी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आजोबांबद्दल बोलताना तर... इतकी हळवी व्हायची... एकदा तर मला म्हणालीसुद्धा- आमचं शेवटचच बोलणं होतं ते- 'अजून कुणालाच सांगितलं नाहीये. फक्त तुलाच सांगते बरं.., पुढचा जन्म असतो-नसतो माहित नाही. पण मला जर का पुढचा जन्म मिळाला; आणि तोही एक स्त्री म्हणून तर त्या जन्मीही मला पती म्हणून तुझेच आजोबा हवेत बरं'... आणि ती थांबली... तिचं स्वगत पूर्ण झालं असावं...
.
.
.
.
.
....hhhhh.... Sounds so emotional ना?
तर मंडळी, अशी ही माझी आज्जी. कुछ खट्टी-कुछ मिठी! पण 'लय भारी'!!!
So, my dear आज्जी... नववर्षाच्या तुला खूप-खूप शुभेच्छा! आणि I'm dam sure, की स्वर्गातल्या गंधर्वांना तू बाबांच्या गायकीबद्दल आणि रंभा-उर्वशींना हेलनच्या नृत्यकौशल्याबद्दलच सांगत असणार!..
                                                                                                                        -तुझीच
                                                                                                                     शाननशोनन

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...