Wednesday, 30 August 2023

सांजसखी

रंगताना रंग ओले
रंगवेड्या नभावरी 
पाहता श्रांत बैसते
सांजसखी काठावरी

पसरते भवताली 
संध्यामग्न सायधुके 
जळांत वाहून जाते 
घनगर्द नवलाई

उरता काहीबाही 
बुडते खोल डोही
परतीचा मार्ग धरिते 
सांजसखी निर्मोही 

----------------------

नेमका निखळतो चंद्र 
नेमकी साधतो वेळ
सांजेच्या वळत्या पाऊली
ओथंबते चंद्रावळ

---------------------- 

थबकते सांज देखता
खोल-सखोल तळाशी
रंगल्याली कोर चमके
तरळती युगराशी 

ती बिंब बिंब स्पर्शुनी
जाता पाण्यावर ओलावुनी
चंद्र लख्खं लख्खं गहिवरतो
तिच्या ढळत्या समयी

----------------------

रंगांत रंगल्या जळांत
आता एकसंध रंग
निथळे शुभ्र चंद्रकांती
सखीच्या ओलखुणांत

- चारुश्री

Saturday, 1 July 2023

कविता

आज पाऊस अचानक... कविता झाला...
कैक अंतरावरून माझ्यापाशी सांडत राहिला...

पहिले काही अंतरे तसेच वाहून गेले...
सोबत काहीबाही घेऊनही गेले...

काही ओळींचा संतत शिडकावा होत होता...
शिंपडीत राहिल्या त्या सरी 
ओळखी-अनोळखीसे थेंब...

जरा सभोवार अंगणात डोकावून पाहिलं,
क्षणार्धात उघड-मिटणारी 
शुभ्र पर्जन्यफुलं
कुठलेसे शब्द मातीत जिरवीत होती...
दडवण्यासाठी किंवा खोलातून उमलण्यासाठी...

कैक अर्थांचे रव असेच निनादत राहिले
कितीतरी वेळ...

मनसोक्त कोसळून घेतलं पावसाने...
वरलं आकाशही अखेर 
निरभ्र, कोरं-करकरीत झालं... 

तरीही पुन्हा नीट निरखून पाहिलं 
तर पुसटशी नक्षी हलताना दिसली...
मग नजर आणिक बारीक करून पाहिलं...
अरे!! ही तर माझीच कविता!!!
तीच पाऊस होऊन पडली की काय?
असं म्हणेपर्यंत 
आभाळ पुन्हा एकदा गच्च दाटून आलं...

- चारुश्री

Wednesday, 21 June 2023

भिन्न षड्ज



गर्द वृक्षाच्या निबीड शाखेत 
निपचित पहुडलेलं एक पान,
अनाहूत स्त्रवावी त्याच्या पर्णरेखांतून 
उष्ण रंगांची ओली सळसळ...
गच्च व्हावी शीर अन् शीर, 
भेदावे सर्वच फाटे...
सुषिर होऊन प्राण श्वासावा
प्राणपणाने; 
नि फाटून जावं 
पडलेल्या सखोल चिरेतून आरपार...
मग पुन्हा तरारून यावं,
चिरांसहीत - खाचांसहीत 
वळणदार रेघांसहीत
एकसंध प्राणासहीत
तल्लीन व्हावं,
व्यामिश्रतेच्या उष्ण रंगांत...
पानभर पसरावी 
सजीव थरथर, 
सशब्द व्हावीत पर्णकंपने...
ऐकताना भिन्न षड्ज, 
गानसरस्वतीचा!

- चारुश्री

Sunday, 23 April 2023

- - (अपरिचिता.)



प्रिय कृष्णा,
कालचक्रास आरपार भेदून
तू राहिला आहेस अगदी नितळ!
का मीच तशी होऊन पोहोचल्येय इथवर? 
माहीत नाही.

काळाच्या पल्याड -
क्षितिजसमान झालेली तुझी नौका
आणि अद्याप कालतीरावरली मी...
मिटल्या डोळ्यांत 
सारंच विरघळून जात असलं;
तरी पापणी उचलता क्षणी 
अथांगाच्या टोकाशी भरून राहिलेला तू 
दिसतोस मला.
पण राहा तिथे - तसाच... 
तुझ्या जागी अढळ...

मी आहे इथे या किनाऱ्यावर. 
पाण्यात पाय सोडून बसल्येय.
तुझ्या निळाईकडे बघतच रिती करत्येय 
युगानुयुगे प्राणपणाने जपलेली
माझी ओंजळ... 
त्वदियम् वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्प्यते।

नीरव लाटा 
वाहून नेताहेत
माझे कित्येक जड श्वास संथपणे...
ते लुप्त होताना -
क्षितिजावर उमटणाऱ्या आर्त तरंगांनी, 
सरसरत मागे येऊन पावलांना लुचणाऱ्या
नाजूक - हळव्या लहरींनी, 
अंतर्बाह्य शहारत्येय मी! 
पण मग सावरते स्वतःला.

खूप चाल्ल्येय आजवर!
अविरत... अव्याहत...

आता मात्र या इथे 
अशीच बसून राहणारे...
तूही तिथेच राहा. तसाच...
तुझ्या जागी अढळ...

दरम्यान बरेच कालप्रवाह
सरायचे बाकीयेत...
सरत राहतील...
काहीबाही वाहून आणतील -
बरंचसं घेऊन जातील -
नितळ होत राहील
सगळंच!...

या प्रदीर्घ प्रवासात
यथावकाश लिहीन पुन्हा कधीतरी... 
किंवा 
लिहावसं वाटावं 
असं काही उरणारच नाही कदाचित!...

तूर्तास रजा घेते.

तुझी, 
---
---
-- (अपरिचिता.)



- चारुश्री वझे

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...