Wednesday, 28 December 2016

सायंकाळ

सायंकाळ

मला किनई ब-याचदा एखाद्या छानश्या डोंगरउतारावर जावसं वाटतं. जिथे पर्यटकांची वा इतरही कुठलीच वर्दळ नाहीये. समोर, आजुबाजूला डोंगररांगा नि भरगच्च झाडं...
...मावळतीच्या सूर्याची पसरलेली पिवळसर-नारिंगी आभा, त्याचा कमी होत जाणारा प्रखरपणा अस्ताच्या समीपतेची चाहूल देतो; प्रत्येकवेळी..क्षणोक्षणी... पक्षीही घरट्याकडे परतताहेत. थकलेला जीव विसावा घेतोय.. सगळच शांत होतयं.. Mature होतयं.. Be Silent, keep silence... काहीतरी सुटलयं-निसटलयं..काही धरलयं..काही मिळवायचयं..काही सोडून द्यायचयं... पण आत्ता त्यापैकी कुठलाच विचार नाही. अनिमिष नेत्रांनी फक्त पाहणं, अस्ताला जाणा-या त्या सूर्याकडे, बस्सं...
...मधूनच हवेची मंद झुळूक येते. खूप आपलसं वाटतं. मनाला रिझवतो तिचा सुखद स्पर्श.. भावनांच्या आवेगाला तिची तरल साथ मिळते. रोमांच फुलतो, उत्साह संचारतो.., तरी शांत असतो आपण.. एकाजागी, एकटक पाहत असतो ढळणा-या सूर्याकडे. नजरच हलत नाही त्याच्यावरुन. अशावेळी कितीही 'क्लिक्-क्लिकाट' केला तरी नाविन्य काही संपत नाही त्यातलं! सूर्य तोच.. पण दरवेळी त्याचा उदयास्त एक वेगळाच फिल देऊन जातो. वेगळं म्हणजे खूप काही भन्नाट आणि युनिक असतं, असं नाही. पण असतं बुवा काहीतरी चुंबकीय तत्त्व, जे नेहमीच आकर्षित करतं आपल्याला!...
... त्या एकटक बघण्यात मग तंद्रीच लागते. स्वतःला switch off  करतो. रादर, नकळतच स्वतःला विसरुन जातो. आजुबाजूचं शांत-निवांत वातावरण.. त्याला पाहण्यात गढून गेलेली आपली नजर नकळतपणे स्वतःवरच रोखली जाते. बाह्यतः जरी स्वतःला पूर्ण विसरलेलो असलो तरी अंतर्गत संवाद सुरु होतो.., नि चालूच राहतो अव्याहतपणे.. प्रत्येकवेळीच सादेला प्रतिसाद, क्रियेला प्रतिक्रिया नाही दिली जात. तरीही संवाद चालूच राहतो... खोल तळातून काहीतरी निघत असतं.., अस्फुट-अबोल.., तरीही अर्थमय!.. अर्थांची शृंखला नसते; पण त्यातलं गमक कळत जातं. तो हळूहळू उलगडत जातो.., नि त्याचं संपूर्ण आकलन होणार तोच आपली नजर सूर्यावरुन हटलेली असते, एका वेगळ्याच विश्वात गुंगून गेलेली असते.. आणि नजरेआडच सूर्य गुडुप होतो... कदाचित् म्हणूनच त्याला पाहण्याची ओढ नेहमीच दाटून येते.
... सूर्यास्त होतो. नकळतच.. पण काहीतरी देऊन जातो. अस्तानंतरच्या उदयाची जणु ग्वाहीच असते ती.., पुन्हा नव्याने नाविन्य जोपासण्यातली गंमत असते त्यात!.. आणि आपली पावलंही मग सहजतेने परतीची वाट धरतात... ...पुन्हा आपल्या गावात., आपल्या शहरात.., आपल्याच विश्वात...

सांजसखी

रंगताना रंग ओले रंगवेड्या नभावरी  पाहता श्रांत बैसते सांजसखी काठावरी पसरते भवताली  संध्यामग्न सायधुके  जळांत वाहून जाते  घनगर्द नवलाई उरता क...